Sunday, 17 February 2019

अग्रलेख- हलगर्जीपणाची किमंत


काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा केला जात आहे. दहशतवादमुक्त जिल्हे होत आहेत. आता फक्त दोनशे अतिरेकी उरले आहेत, असे दावे केंद्र सरकार करीत असताना देशाच्या इतिहासातला सर्वांत मोठा दहशतवादी हल्ला काश्मीरमध्ये व्हावा, ही दुर्दैवाची बाब आहे. दोन वर्षांपासून जिल्हावार दहशतवाद्यांचे आकडे दिले जात असताना तसेच आयएसआय, लष्कर-ए-तैयब्बा यांच्यावर लक्ष केंद्रीत केले जात असताना दुसर्‍या दहशतवादी संघटना सक्रीय झाल्या आहेत, याकडे दुर्लक्ष करण्यात आले, त्याची मोठी किमंत गुरूवारच्या हल्ल्याने मोेजावी लागली. त्यातही नियमांना बगल देत लष्कराच्या हालचाली केल्याचा परिणाम अशा हल्ल्यात होतो. वास्तविक एकाच वेळी लष्कराच्या किंवा केंद्रीय सीमी सुरक्षा दलाच्या तुकड्यांचे स्थलांतर करू नये, असा नियम आहे. शिवाय त्याबाबत कमालीची गुप्तता पाळली जावी, असा संकेत आहे. लष्कराचा ताफा जात असलेल्या भागाची तपासणी केल्याशिवाय ताफा पुढे नेऊ नये, असा ही नियम आहे. त्यातही धक्कादायक म्हणजे, गुप्तचर विभागाने 8 फेब्रुवारी रोजी आईडी हल्ल्याची शक्यता व्यक्त करून काळजी घेण्याची सूचना केली होती. ही बाब लक्षात घेऊन केंद्रीय सीमा सुरक्षा दलाचा एवढा मोठा ताफा एका ठिकाणाहून दुसरीकडे हलविणे जोखमीचे होते. सुरक्षा यंत्रणा दिमतीला असली, तरी अलीकडच्या काळात सीरिया, अफगाणिस्तान तसेच युरोपमध्ये जे आत्मघाती हल्ले झाले, ते लक्षात घेऊन पुरेशी तपासणी आणि सर्वती काळजी घेऊन ताफ्याचे स्थलांतर करणे आवश्यक होते. जम्मू काश्मीर पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी एका खासगी ट्विटर अकाऊंटवर अपलोड करण्यात आलेली गुप्त सूचना सुरक्षा यंत्रणांना दिली होती. त्यामध्ये पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश ए मोहम्मदने सुरक्षा दलावर आत्मघातकी हल्ला करण्याची धमकी दिली होती. त्यामध्ये, एका ट्विटर अकाऊंटवरून अपलोड करण्यात आलेला एक केवळ 33 सेकंदाचा व्हिडिओ आहे. ज्यामध्ये दहशतवादी सोमालियात जवानांवर हल्ला करताना दिसत आहेत. धक्कादायक म्हणजे, या व्हिडिएओत ज्या पद्धतीने दहशतवादी हल्ला होताना दिसतो आहे, तसाच हल्ला गुरूवारी दक्षिण काश्मीरच्या पुलवामात सीआरपीएफ जवानांना घेऊन जाणार्‍या एका बसवर करण्यात आला. हल्ल्याअगोदरच्या घटना पाहिल्या, तर छोट्या छोट्या गोष्टींकडे कानाडोळा केल्याची किमंत जवानांच्या बलिदानांत मोजावी लागते, हे स्पष्ट झाले. पूर्वींच्या घटनांतून किंवा सूचक इशार्‍यातून आपण काहीच शिकत नाही, हे त्यातून सिद्ध झाले.

जम्मू काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात केंद्रीय सीमा सुरक्षा दलाच्या तुकडीवर गुरुवारी झालेल्या हल्ल्यात 40 हून अधिक जवानांना प्राण गमवावे लागले. काश्मीर प्रश्‍नाचे जाणकार आणि संरक्षणतज्ज्ञ या हल्ल्याला भारत सरकारचे सर्वात मोठे अपयश असल्याचे मानतात. अशा प्रकारचा मोठा हल्ला म्हणजे कट्टरवाद्यांना संपवण्यात आलेले अपयश स्पष्टपणे आधोरेखित करते. शिवाय असा हल्ला काश्मीर प्रश्‍न आणखी गुंतागुंतीचा करू शकतो. गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी वेळोवेळी असा दावा केला, की काही दिवसांत काश्मीरमधील कट्टरवादी कायमचे नष्ट होतील; मात्र तसे झाले नाही. काश्मीरमधील स्थिती आणखी खराब होताना दिसत आहेत. लष्कराचा काश्मीरमध्ये झालेला वापर आणि तशा पद्धतीची रणनीती ही स्थिती सांभाळण्यात अपयशी ठरल्याचे दिसते. काश्मीरमधील परिस्थिती सामान्य आहे, असे म्हणता येणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या आठ दिवसांपूर्वीच काश्मीरचा दौरा करून अनेक बाबतीत मतप्रदर्शन केले होते; परंतु अटलबिहारी वाजपेयी यांनी जसा काश्मीरवासीयांचा विश्‍वास संपादन केला होता, तसा विश्‍वास मोदी यांना संपादन करता आला नाही. उलट, गेल्या साडेचार वर्षांत घेतलेल्या उलट सुलट भूमिकांमुळे काश्मीरमधील राजकारणी, उद्योजक, सामान्य जनता ही गोंधळलेली होती. काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासारखे काही घडले नाही. बुर्‍हाण वाणी चकमकीत मारला गेल्यानंतर हिज्बुल मुजाहिदीनच्या अन्य अतिरेक्यांचाही खात्मा करण्यात आला. दहा अतिरेकी मारले गेले, म्हणजे काश्मीरमध्ये अन्य नावांनी अतिरेकी कारवाया करणारच नाहीत, असा समज कदाचित सरकारने करून घेतला गेला असावा. फुटीरतावाद्यांविषयी सहानुभती असलेल्या पीडीपीबरोबर तीन वर्षे संसार करताना त्यांच्या बाबत ब्र शब्दही न काढलेल्या भाजपने अचानक पाठिंबा काढून घेताना मात्र त्यांच्या काळात दहशतवादाला आळा घालण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवला. आता पाच महिने अगोदर राज्यपाल राजवट आणि नंतर राष्ट्रपती राजवट लागू असताना दहशतवाद का कमी झाला नाही, याचे उत्तर मिळत नाही. गेल्या काही वर्षांमध्ये दहशतवाद्यांचे आत्मघातकी हल्ले जवळपास बंद झाले होते. त्यामुळे असे हल्ले होणार नाहीत, असे गृहीत धरून आपण बेसावध राहिलो. दहशतवादी मात्र अशा संधीची वाट पाहत होते. काश्मीरमधील संघर्ष हा गोळीला गोळीने प्रत्युत्तर देऊन संपणारा नाही. तसेच तो एक-दोन महिन्यात संपून जाणारा नाही. जेव्हापासून या लढाईत वहाबी मुस्लिम तरुण जास्त प्रमाणात उतरले आहेत, तेव्हापासून काश्मिरातील लढाई आणखी अवघड झाली आहे.

गेल्या काही वर्षांपासून काश्मिरी तरुण 'इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया' (इसिस) तसेच वहाबी विचारधारेकडे आकृष्ट होत आहेत. त्यात उच्चशिक्षितांचे प्रमाणही जास्त आहे. ही स्थिती सर्वात चिंताजनक आहे. भारत सरकारला त्याकडे गांभीर्याने पाहावे लागेल. यावर वेगळा उपाय शोधावा लागेल. भारत सरकारला काश्मीरमधील तरुणांशी, लोकांशी संवाद साधावा लागेल. जे लोक नाराज आहेत, त्यांच्याशीही बोलावे लागेल. दहशतरवाद्यांपासून दूर आहेत, अशा लोकांशी संवाद वाढवायला हवा; परंतु त्याबाबतीत नेमके सरकार कमी पडते आहे. वाटाघाटीचे, चर्चेचे दरवाजे बंद केले, तर त्यातून काहीच साध्य होत नाही. याबाबतीत तरी वाजपेयी यांचा आदर्श घ्यायला हवा. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबासारख्या अतिरेकी संघटनांच्या विचारधारांना काश्मिरी तरुण बळी पडताना दिसत आहेत. त्यांना आत्मघातकी हल्लेखोर बनवले जाते आहे. काश्मिरी युवकांना रोजगार आणि सन्मान मिळाला, की ते दहशतवादापासून दूर जातील. शाळकरी वयापासून त्यांंच्या आणि पालकांच्याही समुपदेशनावर भर द्यायला हवा. विकास प्रक्रियेचे आपण भागीदार आहोत, याचा विश्‍वास त्यांना वाटला आणि काश्मीरमध्ये विकासाचे पर्व सुरू आहे, असे दिसले, तरी युवक दहशतवादापासून दूर राहतील. जवानांच्या सुरक्षेत मोठी चूक झाली की नाही, हे यावर चर्चा करण्यापेक्षाही ही घटना का आणि कशी झाली याची चौकशी झाली पाहिजे. गुरूवारचा हल्ला दहशतवाद्यांना प्रोत्साहनासारखा ठरेल. गेल्या दोन वर्षांत या भागात लष्कराने कडक कारवाया केल्या आहेत. सुरक्षा दलांनी जवळपास 500 हून अधिक दहशतवाद्यांना ठार केल्याचे सांगितले जाते आहे.
काश्मीर खोर्‍यातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये काही वर्षांमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या कारवाया लक्षणीय प्रमाणात वाढल्या आहेत. पाकिस्तानातूनही काश्मीर खोर्‍यामध्ये घातपात करण्यासाठी जैश-ए-मोहम्मदला मदत करण्यात येत आहे. जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांमध्ये वाढ झाल्याचे काश्मीर खोर्‍यामध्ये कार्यरत सुरक्षा अधिकार्‍यांनीही मान्य केले आहे. तसेच, जैश-ए-मोहम्मदच्या कारवायांमध्ये स्थानिक मदतही होत असून, या संघटनेमध्ये स्थानिक तरुण सहभागी होत असल्याकडे काही तज्ज्ञांनी लक्ष वेधले आहे. पुलवामा जिल्ह्यामध्येच गेल्या वर्षी जानेवारीमध्ये जैश-ए-मोहम्मदने 'आईडी'चा स्फोट घडवला होता. त्यामध्येही केंद्रीय राखीव पोलिस दलाचे पाच जवान हुतात्मा झाले होते. 'आईडी'चा वापरही गेल्या वर्षीच करून जैश-ए-मोहंमदने आपले इरादे दाखवून दिले होते. आपणच त्याकडे फारशा गांभीर्याने पाहिले नाही. पठाणकोट असो, की अवंतीपुरा; या दोन्ही हल्ल्यामागची संघटना पाहिली, त्यांची कार्यपद्धती पाहिली, तर असे आत्मघाती हल्ले होणार नाहीत, अशी काटेकोर व्यवस्था आपल्याला करावी लागेल. विकास, चर्चा आणि त्याचवेळी दहशतवाद्यांविरोधात कारवाई अशा त्रिसूत्रीचा वापर केला, तर त्या त्यांची कार्यपद्धती पाहिली, तर असे आत्मघाती हल्ले होणार नाहीत, अशी काटेकोर व्यवस्था आपल्याला करावी लागेल. विकास, चर्चा आणि त्याचवेळी दहशतवाद्यांविरोधात कारवाई अशा त्रिसूत्रीचा वापर केला, तर त्यातून मार्ग निघू शकतो.

Dailyhunt

No comments:

Post a Comment