Sunday, 17 February 2019

लढण्यासाठी आम्ही पण सीमेवर जावू ..!


सकाळ वृत्तसेवा

इचलकरंजी - 'पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सैनिकांची केलेली हत्या अत्यंत चिड आणणारी आहे. आम्हीही भारतीय आहोत. आम्हाला मागे पुढे कोणीही नाही. कुणाचीही काळजी नाही. गरज पडली तर देशभरातील आम्ही एकत्र येवून दहशतवाद्यांच्या विरोधात लढण्यासाठी सीमेवर जावू,' असा निर्धार तृतीयपंथीयांनी व्यक्त केला.

येथील मलाबादे चाैकात तृतीय पंथीयांनी एकत्र येवून देशप्रेमासाठी प्रथमच आंदोलन करीत पाकिस्तांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. समाजाच्या विविध प्रवाहातून नेहमीच थोड्याशा बाजूला असलेल्या 'ते'ही आज एकत्र आले. हुतात्मा झालेल्या भारतीय जवांनाना त्यांनी श्रध्दांजली वाहिली आणि तीव्र शब्दात दहशतवाद्यांचा धिक्कार केला.

समाजातील तृतीय पंथीयांना संविधांनाने अधिकार दिले आहेत. या अधिकाराचा वापर करीत शहरात अनेक तृतीय पंथीय संघटीत झाले आहेत. आधार कार्डापासून ते रेशन कार्डापर्यंत सर्व कागदपत्रे आता त्यांनीही तयार करुन आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शहरात तृतीय पंथीयांची 'मैत्री' ही संघटना कार्यरत आहे. या संघटनेच्या कायदेशीर सल्लागार अ‍ॅड. दिलशाद मुजावर यांच्या नेतृत्वाखाली आज सांयकाळी 'ते' सर्वजण मलाबादे चौकात एकत्र आले. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदूस्थान जिंदाबाद अशा घोषणांनी त्यांनी चौक दणाणून सोडला. तृतीयपंथीय एकत्र येवून अशा पध्दतीने देशभक्ती दाखवित असतांना या चौकातून जाणारे अनेकजण त्यांच्या या आंदोलनाच्या ठिकाणी सहभागी झाले. सर्व हुतात्म्यांना दोन मिनिटे स्तब्धता पाळून श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी अ‍ॅड. मुजावर यांनी काश्मीर मधील घटनेचा तीव्र निषेध करुन सरकारने दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्यावे, अशी मागणी केली.

' देशाच्या वीर जवानांवर पाकिस्तानने अत्यंत भ्याड हल्ला केला आहे. या हल्ल्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. यापुढे आम्ही ही देशप्रेमापोटी रस्तावर उतरु.'
- मस्तानी नगरकर

No comments:

Post a Comment