नाशिक -ठिकठिकाणी पूर्वीप्रमाणे चेकपोस्ट राहिल्या असत्या तर कदाचित ही घटना टळली असती. पुलवामामध्ये गुरुवारी झालेल्या आत्मघातकी हल्ल्याच्या कारणांचा शोध घेतला जात असताना श्रीनगरमध्ये केंद्रीय राज्य राखीव दलात १३ वर्षे उच्च पदावर जबाबदारी सांभाळलेले आणि तब्बल ३३ वर्षे विशेष सुरक्षा दलात शाैर्य गाजवलेले अॅड. दिलीपसिंग राणा यांनी माध्यमांना ही माहिती दिली.
श्रीनगरपासून ते काझीगुंडपर्यंत पूर्वी अनेक चेकपोस्ट होत्या. त्यामुळे कोणीही तेथे संपूर्ण तपासणीशिवाय येणे शक्य होत नव्हते. काही वर्षांपूर्वी श्रीनगर येथील पंथ चौकाजवळ एका भरधाव वाहनाबाबत संशय आल्यानंतर चेक पोस्टवरील एका जवानाने टायरवर गोळी झाडून ती गाडी थांबवली होती. मात्र वाहनात स्थानिक नागरिक होते. हे प्रकरण थेट न्यायालयापर्यंत गेले आणि देशाच्या सुरक्षिततेसाठी गोळी झाडणाऱ्या जवानाविरुद्धच खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला. याच संवेदनशील प्रकरणाची दखल घेत स्थानिक सरकारने या ठिकाणी असलेल्या सर्व चेक पोस्ट हटवल्या. या निर्णयास तेव्हाही तीव्र शब्दांत सैन्य दलाने विरोध केला होता. मात्र तत्कालीन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले होते. तेव्हापासून तेथे वाहनांची कसून तपासणी होत नाही. त्यामुळे पुलवामापर्यंत सहज वाहन घेऊन जात हल्ला करणे दहशतवाद्यांना सोपे गेले, असे राणा यांनी सांगितले.
स्थानिकांशी संपर्क महत्त्वाचा
आपल्या कार्यकाळातही असाच कट दहशतवाद्यांनी अनेकदा आखला. मात्र, श्रीनगरच्या रहिवाशांशी असलेल्या संबधांमुळे हल्ल्यापूर्वीच माहिती मिळून आम्ही सजग व्हायचो. त्यामुळे अनेक हल्ले होण्यापूर्वीच त्याची माहिती मिळत असे. म्हणून जवानांनी स्थानिक लोकांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवायला हवेत, असे राणा म्हणाले.
No comments:
Post a Comment