संदीप जगदाळे
पुणे - ज्या समाजात आपण राहतो, त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, या उदात्त भावनेतून बॅंक ऑफ महाराष्ट्रातील निवृत्त लेखनिक कमलाकर बाळकृष्ण देशपांडे यांनी बचत करून २० लाख ७० हजार रुपयांची आर्थिक मदत वेळोवेळी विविध सेवाभावी संस्थांना करून सामाजिक बांधिलकी जपण्याचे उत्तम उदाहरण समाजापुढे ठेवले आहे.
देशपांडे यांनी १९८० मध्ये बॅंकेत पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचे खाते काढले. त्या खात्यात दरवर्षी ते पैसे भरतात. त्यामध्ये साठलेले पैसे व त्यावरील व्याज यातून ते सामाजिक संस्थांना मदत करतात. विद्यार्थी सहायक समिती, सकाळ रिलीफ फंड, सह्याद्री हॉस्पिटल, संपर्क सामाजिक संस्था, मानव्य सामाजिक संस्था, निवांत अंध मुक्त विकासालय, वंचित विकास, नाम फाउंडेशन, सुतिका सेवा मंदिर, कोरेगाव पार्क येथील पुणे अंधशाळा यांसह अनेक सामाजिक संस्थांना त्यांनी लाखो रुपयांची आर्थिक मदत केली आहे. त्यासाठी गृहिणी असलेल्या त्यांच्या पत्नी प्रीती देशपांडे यांचे त्यांना विशेष सहकार्य मिळते.
देशपांडे सध्या पेन्शनर आहेत. त्यांनी पुण्यात ४० वर्षे केवळ सायकल हे वाहन वापरले. २००५ मध्ये एका गरीब माणसाला त्याची गरज पाहून सायकलदेखील देऊन टाकली. तेव्हापासून ते सर्वत्र पायी चालत जातात.
एकट्याच्या पगारातून अतिशय काटकसर करून साठविलेले पैसे ते सेवाभावी संस्थांना देत असल्याने त्या पैशांचा विनियोग योग्य कारणासाठी व काटकसरीने व्हावा, असा त्यांचा आग्रह असतो.
सध्या समाजात घेण्याची वृत्ती झपाट्याने वाढत चालली आहे. ती थोडी कमी होऊन देण्याची वृत्ती वाढायला हवी. असे झाले तर चांगले काम करणाऱ्या संस्थांना पैशाची कमतरता भासणार नाही. निराधार, गरजू, गरीब, दिव्यांग व्यक्तींना योग्य वेळेत मदत मिळेल. हे सर्व आपले सहप्रवासी आहेत. त्यांना दुःखी ठेवून आपण सुखी, समाधानी होणार नाही.''
- कमलाकर देशपांडे
No comments:
Post a Comment