Sunday, 17 February 2019

अतिरेक्यांची शिक्षा जवानच ठरवतील; मोदी यांचे स्पष्टीकरण; यवतमाळला विकासकामांचे भूमिपूजन


यवतमाळ / प्रतिनिधीः
पुलवामा दहशतवादी हल्ल्याला जबाबदार असलेल्यांना कोणती शिक्षा दिली जाईल, हे आमच्या देशाचे जवान ठरवतील, असे जाहीर करतानाच दहशतवाद्यांना शिक्षा कशी, कुठे, केव्हा दिली जाईल, तसेच ती कोण देईल हेदेखील आमचे जवानच ठरवतील, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र दौर्‍यावर असलेल्या मोदी यांनी यवतमाळ येथे आयोजित कार्यक्रमात अजनी-पुणे रेल्वेला हिरवा झेंडा दाखवला. त्या वेळी ते बोलत होते. पुलवामा हल्लयाचा बदला घेण्याचा पुनरुच्चार करीत पंतप्रधान मोदी यांनी भारतीय लष्करावर पूर्ण विश्‍वास असल्याचे म्हटले आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या पाठिशी संपूर्ण देश असून शहिदांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, दहशतवाद्यांना शिक्षा नक्कीच होईल, याचा पुनरुच्चार मोदी यांनी केला. माझा आपल्या देशाच्या सैनिकांबाबत फक्त अभिमानच नाही, तर विश्‍वासही आहे. दहशतवाद्यांना अद्दल घडवण्याची भारतीय सुरक्षा दलांना पूर्णपणे सूट देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्राच्या दोन सुपुत्रांनीही देशाची सेवा करत असताना पुलवामा येथे आपल्या प्राणांची आहुती दिली, असे नमूद करून त्यांनी हुतात्म्यांना वंदन केले. ज्या कुटुंबांनी आपले पुत्र गमावले आहेत, त्यांचे दु:ख मी अनुभवत आहे, असेही पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी पुलवामा हल्ल्यावरून पाकिस्तानला खडे बोलही सुनावले. पाकिस्तानात दहशतवादाला आश्रय दिला जातो. फाळणीनंतर अस्तित्त्वात आलेल्या या देशाची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे, असे म्हणत पाकिस्तान हा दहशतवादाचे दुसरे नाव आहे, अशा शब्दांत पंतप्रधानांनी पाकिस्तानला सुनावले. देशाने धैर्य बाळगावे, तसेच आपल्या जवानांवरही विश्‍वास ठेवावा असे आवाहन पंतप्रधानांनी या वेळी केले.
मोदी यांच्या विरोधात यवतमाळमध्ये बॅनर्स
यवतमाळमध्ये कार्यक्रम सुरू होण्याआधीच मोदी यांंच्याविरोधात बॅनरबाजी करण्यात आली. मोदी सकाळी 10 वाजता नागपूरला पोहोचले होते. त्यानंतर ते हेलिकॉप्टरने यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथे पोहोचले. याआधी पांढरकवडा येथे त्यांच्या विरोधात बॅनरबाजी करण्यात आली. कोंगरा मार्गावर मोदी यांना विरोध दर्शवत 'मोदी गो बॅक'चे बॅनर्स लावण्यात आले होते. मोदी यांच्याविरोधात बॅनर लागले असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत ते हटवले. युवक काँग्रेसने हे पोस्टर लावले होते, अशी माहिती मिळते आहे.

No comments:

Post a Comment