Sunday 17 February 2019

दहशतवादाविरोधात सर्वपक्षीय बैठकीत त्रिसूत्री प्रस्तावाला मंजुरी


नवीदिल्लीः पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात सगळा देश एकवटला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत दहशतवाविरोधात लढण्यासाठी सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचे विरोधी पक्षांनी मान्य केलं.
या बैठकीत राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पुलवामा हल्ल्याची माहिती दिली. आपल्या देशातून दहशतवाद उखडून टाकण्यासाठी आपण एकत्र येऊ, असे आवाहन त्यांनी केले.
त्याला सर्वपक्षीयांनी मान्या दिली. या बैठकीत पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच एक त्रिसूत्री प्रस्तावही मंजूर करण्यात आला. 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवतो. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत सगळा देश आहे, त्यांच्या दुःखात सहभागी आहे. देशाच्या सीमेवर वाढणार्‍या दहशतवादी कारवायांचाही निषेध नोंदवण्यात आला. गेल्या तीन दशकांपासून भारत सीमेवरच्या दहशतवादी कारवायांचा सामना करतो आहे. भारतात पसरलेल्या दहशतवादाला सीमेवर खतपाणी मिळते आहे. भारत या आव्हानांचा सामना नेटाने करतो आहे, या लढाईत संपूर्ण देश एकवटला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सुरक्षादलांसोबत, सैन्यासोबत सगळा देश उभा आहे, असे या वेळी सांगण्यात आले.
सर्वपक्षीय बैठकीत गृहसचिव राजीव गौबा, केंद्रीय राखीव पोलिस दलाचे वरिष्ठ अधिकारीही हजर होते. त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, डाव्यांचे नेते डी. राजा, शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा आदी या वेळी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment