Friday 15 February 2019

थंड डोक्‍याने धडा शिकवा !! - मेजर जनरल शशिकांत पित्रे (निवृत्त)

"जैशे महंमद' ही दहशतवादी संघटना आहे. ती पाकिस्तानमधून कारवाया करते, हे तर जगजाहीर आहे. हे सगळे लक्षात घेता उरीनंतर पुन्हा दुसरा "सर्जिकल स्ट्राइक' करणार का, हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्याचे समाधानकारक उत्तर देण्याची वेळ आली आहे. पण असा हल्ला कोणताही उतावीळपणा न करता, अत्यंत थंड डोक्‍याने, आपण निवडलेल्या जागी, आपण निवडलेल्या वेळी आणि आपण ठरविलेल्या संख्येत केला पाहिजे.

pulwama

गेल्या वर्षात भारतीय लष्कराने सुमारे 250 पाकिस्तानपुरस्कृत दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, त्यात वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे 19 स्थानिक कमांडर होते. ते निःसंशय मोठे यश होते. काही गौण घटना वगळता काश्‍मीर खोरे बरेचशे शांत होते. परंतु केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या (सीआरपीएफ) एका ताफ्यावर झालेला भ्याड आणि भीषण हल्ला पाहता ही केवळ वादळापूर्वीची शांतता ठरली आहे.

"आता हे खूप झाले' असे म्हणायची वेळ आली आहे काय? जम्मू-काश्‍मीर महामार्ग (एनएच-1) ही काश्‍मीर खोऱ्याला उर्वरित भारताशी जोडणारी एकमेव जीवनरेखा आहे. त्यावर लष्करी आणि मुलकी वाहनांची अखंड वाहतूक चालू असते. लष्करी गाड्यांचा ताफा जाण्याआधी आणि दरम्यान घेण्याच्या खबरदारीबद्दल एक परिपूर्ण कार्यपद्धती (standard operating procedure) घालून देण्यात आली आहे. त्याचे दक्षतापूर्वक पालन केले, तर असे प्रसंग टाळता येतात. "सीआरपीएफ'च्या ताफ्यामध्ये 78 गाड्या आणि सुमारे 2500 जवान होते. इतका मोठा ताफा नेण्यात काही हलगर्जीपणा झाला आहे काय, याची कसून चौकशी व्हायला हवी.

पण त्याचबरोबर दोन विशेष बाबींकडे दुर्लक्ष होता कामा नये. पहिली बाब, त्या भागात गेले काही दिवस बर्फ पडत असल्याने वातावरण खराब आहे. आणि याचाच फायदा दहशतवाद्यांनी घेतलेला दिसतो. दुसरी बाब म्हणजे, हा एक आत्मघातकी हल्ला आहे, त्यामुळे त्यातील लवचिकता, आश्‍चर्यजनकता व अचानकपणाचा फायदा दहशतवाद्यांना झाला. "जैशे महंमद' या हल्ल्याचा कट गेले दोन-तीन महिने आखत असणार. हे काही एकट्यादुकट्याचे काम नाही, याची माहिती किंवा कुणकुण लागली नसेल तर ते गंभीर अपयश आहे. या मुद्याकडे दुर्लक्ष होता कामा नये.

पण पुढे काय? उरीनंतर पाकिस्तानला कठोर धडा शिकवण्याचा पायंडा पाडला आहे. हल्ल्यामागे "जैशे महंमद' ही दहशतवादी संघटना आहे. ती पाकिस्तानमधून कारवाया करते, हे तर जगजाहीर आहे. हे सगळे लक्षात घेता उरीनंतर पुन्हा दुसरा "सर्जिकल स्ट्राइक' करणार का, हा प्रश्‍न उपस्थित होतो. त्याचे समाधानकारक उत्तर देण्याची वेळ आली आहे. पण असा हल्ला कोणताही उतावीळपणा न करता, अत्यंत थंड डोक्‍याने, आपण निवडलेल्या जागी, आपण निवडलेल्या वेळी आणि आपण ठरविलेल्या संख्येत केला पाहिजे. त्यातील सर्वांत अग्रगण्य घटक म्हणजे "तो हल्ला यशस्वी होईल', याबद्दल तसूभरही संशय असता कामा नये. याला बराच वेळ लागू शकेल; परंतु या भ्याड क्रूरतेचे फळ "जैशे महंमद' आणि परभारे पाकिस्तानला भोगावे लागेल, याची बरीच शाश्‍वती आता वाटायला हरकत नाही. हुतात्म्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे.


No comments:

Post a Comment