Tuesday 27 September 2016

काश्‍मीरचे दिवास्वप्न पाहू नका - सुषमा स्वराज

न्यूयॉर्क - ‘जम्मू-काश्‍मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे; तो बळकविण्याचे दिवास्वप्न पाकिस्तानने बघू नये,’’ अशा शब्दांत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी आज पाकिस्तानला ठणकाविले. त्याचप्रमाणे दहशतवादाला आश्रय देणाऱ्या पाकिस्तानला जगाने एकटे पाडण्याचे आवाहनही त्यांनी केले. जम्मू-काश्‍मीरमध्ये कुरापती करण्यापेक्षा स्वत:च्या देशातील बलुचिस्तानमध्ये काय चालू आहे याकडे लक्ष द्यावे, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या ७१व्या आम सभेत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांचे आज भाषण झाले. स्त्री-पुरुष समानता, मेक इन इंडिया, स्वच्छ भारत अभियान, जनधन योजना याबाबत माहिती देत त्यांनी भाषणाला सुरवात केली. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी गेल्या बुधवारी संयुक्त राष्ट्रसंघात केलेल्या भाषणाचा समाचार त्यांनी घेतला. त्या म्हणाल्या, ‘‘जगातील अनेक देश  दहशतवादाला बळी पडले आहेत. आज २१ व्या शतकाच्या सुरवातीपासून जग दहशतवादाचा मुकाबला करीत आहे. ब्रिटन, फ्रान्स, अमेरिका, भारत त्याचप्रमाणे सीरिया या देशांनी दहशतवादाची झळ सोसली आहे. दहशतवादाविरोधात लढण्याची एखाद्या देशाची तयारी नसेल तर आंतरराष्ट्रीय समूहातून त्याला दूर केले पाहिजे.’’

चर्चा करण्यासाठी भारत अटी घालत आहे, असा उल्लेख शरीफ यांनी त्यांच्या भाषणात केला होता. त्याचा समाचार स्वराज यांनी घेतला. भारत नेहमीच पाकिस्तानशी मैत्रीने वागला आहे. आमचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शपथविधीसाठी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना निमंत्रण देताना कोणती अट घातली होती, काबूलहून भारतात परतत असताना शरीफ यांची सदिच्छा भेट घेतली त्या वेळी कोणती अट घातली होती, अशा प्रश्‍नांची सरबत्ती त्यांनी केली. ईद, क्रिकेट सामने अशा अनेक प्रसंगी भारताने मैत्रीचाच हात पुढे केला होता.

स्वराज म्हणाल्या, ‘‘न्यूयॉर्कमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या ९/११ च्या भीषण हल्ल्याला याच महिन्यात १५ वर्षे पूर्ण झाली. काही महिन्यांपूर्वी पॅरिससह इतर शहरांमध्येही हल्ले झाले. आमच्यावरही पठाणकोट आणि उरीमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद हा मानवाधिकारांचे सर्वांत मोठे उल्लंघन आहे, ही गोष्ट सर्वांनी मान्य करायलाच हवी. दहशतवाद  कोणत्याही एका देशापुरता मर्यादित नाही. तो संपूर्ण मानवतेचा शत्रू आहे. या दहशतवाद्यांना आश्रय कोण देतो, त्यांना आर्थिक रसद कोण पुरवतो आणि प्रशिक्षण कोण देतो, याचाही विचार झाला पाहिजे. काही देश दहशतवाद्यांना आश्रय आणि समर्थन देत आहेत. काही दिवसांपूर्वी याच मंचावरून अफगाणिस्ताननेही अशीच भूमिका मांडत चिंता व्यक्त केली होती. दहशतवाद्यांमध्ये ‘चांगला-वाईट’, ‘आमचा-तुमचा’ असे वर्गीकरण करता येणार नाही. दहशतवादाशी लढायचे असेल तर सर्वांनी एकत्र यायला हवे. यासाठी आपसांतील मतभेद दूर करावे लागतील. हे अशक्‍य काम नाही. इच्छाशक्ती असेल तर करता येईल. ही लढाई कठीण असली, तरी पुढच्या पिढीसाठी आपल्याला ती करावी लागेल.’’

स्वराज म्हणाल्या...

- जिनके अपने घर शीशे के हो, उन्हें दूसरों के घर पत्थर नहीं फेकने चाहिए

- काश्‍मीर बळकावण्याचे स्वप्न पाहणे पाकिस्तानने सोडून द्यावे

- बलुचिस्तानात काय चालले आहे याकडे  पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी लक्ष द्यावे

- बहादुर अली हा तर दहशतवादाचा जिवंत पुरावा

- जगभरातील दहशतवाद हा मानवाधिकाराचे सर्वांत मोठे उल्लंघन

- सर्वांनी मतभेद विसरून दहशतवादाच्या विरोधात एकत्र येऊन लढा द्यावा

- छोट्या छोट्या संघटनांनी दहशतवादाचे भीषण स्वरूप धारण केले आहे

- - वृत्तसंस्था

No comments:

Post a Comment