Thursday, 9 March 2017

मोफत गॅस जोडणी मिळण्यासाठी आधार अनिवार्य

नवी दिल्ली - प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत गरिब महिलांना मोफत गॅस जोडणी मिळण्यासाठी आता आधार कार्ड अनिवार्य असणार आहे. गॅसचे अनुदान मिळण्यासाठी गेल्यावर्षी ऑक्‍टोबर महिन्यापासून आधार क्रमांक अनिवार्य करण्यात आला होता. आता ही व्याप्ती वाढवून दारिद्रयरेषेखालील महिलांना मोफत गॅस जोडणी मिळण्यासाठीही आधार अनिवार्य करण्यात आले आहे.

प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत देशभरातील दारिद्ररेषेखालील 5 कोटी महिलांना पुढील 3 वर्षात मोफत गॅस जोडणी दिली जाणार आहे. जळाऊ लाकडाचा इंधन म्हणून वापर कमी करून गॅसचा वापर वाढवण्यासाठी ही योजना सुरु करण्यात आली आहे. आता या महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार क्रमांक देणे किंवा आधार नोंदणी झाल्याचा पुरावा देणे अनिवार्य असेल, असे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.

दारिद्रय रेषेखालील ज्या महिलांना अद्याप आधार क्रमांक मिळालेला नसेल त्यांनी 31 मे पर्यंत त्यासाठी अर्ज करण्याची सूचना करण्यात आली आहे. या अर्जाच्या पावतीच्या आधारेही मोफत गॅस जोडणी मिळू शकणार आहे. या अर्जाबरोबर छायचित्र असलेले बॅंकेचे पासबुक, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, पॅन क्रमांक, पासपोर्ट, वाहन चालवण्याचा परवाना, किसान फोटो पासबुक किंवा राजपत्रित अधिकाऱ्याकडून मिळवलेले फोटो ओळखपत्र यासारख्या कागदपत्राची जोड आवश्‍यक असेल.

No comments:

Post a Comment