Saturday 11 March 2017

दर १२ वर्षांनी पोलिसांना बढती मिळालीच पाहिजे !

मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने पोलिसांच्या सक्षमीकरणासाठी पोलिसांच्या कामाचे तास कमी करा आणि त्यांच्यावरील ताण कमी करा, असे स्पष्ट केले असून पोलिसांना दर १२ वर्षांनी पदोन्नती द्यायला हवी, असेही उच्च न्यायालयाने सांगितले. अंडरवर्ल्डच्या गुंडांकडे एके-४७ सारखी आधुनिक शस्त्र असल्यामुळे राज्यातील पोलिसांना आधुनिक गुन्हेगारीचा बिमोड करण्यासाठी रिव्हॉल्वरऐवजी ऑटोमॅटिक हत्यारे द्या, असा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. विद्यासागर कानडे आणि न्या. पी. आर. बोरा यांच्या खंडपीठाने पोलिसांसंदर्भातील एका जनहित याचिकेवरील सुनावणीदरम्यान चिंता व्यक्त करत पोलिसांना रिव्हॉल्व्हर ऐवजी ऑटोमॅटीक हत्यार द्या असा सल्ला देखील उच्च न्यायालयाने दिला.

अंडरवर्ल्डच्या माफियांकडे एके-४७ सारखी शस्त्र आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांना जुन्या पद्धतीच्या रिव्हॉल्वरऐवजी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची ऑटोमॅटिक पिस्तुले द्यावी.

पोलिसांना रिव्हॉल्वरपासून मुक्ती देण्यात यावी असे उच्च न्यायालयाने सुचविले आहे. या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने पोलिस दलात काम करत असलेल्या कर्मचाऱयांच्या बढतीसाठी प्रभावी धोरण बनवण्याचा सल्लाही दिला आहे. कॉन्स्टेबल पदावरचा पोलिस हेड कॉन्स्टेबल होऊन निवृत्त होतो. त्यामुळे दर १२ वर्षांनी पोलिसांना पदोन्नती द्यायला हवी, असे उच्च न्यायालयाने सांगितले.

या सोबतच चांगले काम करण्यासाठी पोलिसांना उत्तम वातावरण देण आवश्यक असल्याचे मत न्यायालयाने नोंदवले. तसेच पोलीस दलातील कर्मचारी आठवडय़ाचे ७ दिवस २४ तास काम करतात. त्यामुळे पोलिसांच्या कामाचे तास कमी आणि त्यांच्यावरील ताण कमी करा, असेही न्यायालयाने सांगितले आहे. त्याचप्रमाणे खंडपीठाने सध्या या प्रकरणाची सुनावणी चार आठवडय़ांसाठी स्थगित केली आहे. पुढील सुनावणीत गफहविभागाला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश देखील देण्यात आले आहेत.

Dailyhunt

No comments:

Post a Comment