सातारा, दि. 15 (प्रतिनिधी) : अन्न व्यवसायिकांनी आपल्या व्यवसाय वृध्दीसाठी मालाचा ब्रॅन्ड तयार करुन बाजारपेठेत आणावा. माल तयार करताना स्वच्छता, सुरक्षितता व गुणवत्तेबाबत तडजोड करु नका, असे आवाहन प्रविण मसाले कपंनीचे व्यवस्थापकीय संचालक आनंद चोरडीया यांनी केले.
अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत येथील राधिका पॅलेसमध्ये अन्न व्यवसायिकांसाठी अन्न सुरक्षा विषयी कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त राजेंद्र रुणवाल, नाफारी रिसर्च सेंटरचे विनय ओसवाल, राजन शहा उपस्थित होते.
आपल्याकडे येणार्या प्रत्येक ग्राहकाचे समाधान करणे हे महत्वाचे आहे, असे सांगून चोरडीया म्हणाले, आमचा गेली 50 वर्षापासून व्यवसाय सुरु असून आमची तिसरी पिढी काम करत आहे.
आज आम्ही गुणवत्ता, सुरक्षितता व विपणनच्या जोरावर बाजारपेठेत भक्कमपणे उभे आहोत. तुम्हाला पुढे जाण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. त्याचा तुम्ही लाभ घ्यावा. ग्राहकांचा विश्वास संपादन करा, स्वच्छता राखा, गुणवत्तेशी तडजोड करु नका आपोआप आपल्याकडे ग्राहक येतील. तयार केलेला माल ग्राहकांपर्यंत पोहचविण्यासाठी मोठ्या प्रमाणात समाज माध्यमांचा उपयोग करा. महाराष्ट्रात भरणार्या विविध प्रर्दशनांमध्ये आपला स्टॉल लावा. तुम्ही तयार केलेले पदार्थ पुण्यामध्ये पोहचविण्याची जबाबदारी घेतो, अशी ग्वाही चोरडीया यांनी दिली.
रुणवाल म्हणाले, प्रत्येक व्यवसायिकांनी परवाना घेणे बंधनकारक आहे. कार्यालयात न येता ऑनलाईन अर्ज सादर करुन परवाना मिळवू शकता. ऑनलाईन अर्ज करताना काही त्रुटी राहिल्या तर त्या तुम्हाला ऑनलाईन कळविण्यात येतात. तुम्हाला कार्यालयात येण्याची गरज नाही. त्यामुळे तुमचा वेळ वाचतो. कायदे बदलत आहेत, देश बदलत आहे अन्न व्यवसायिकांनी आपले जीवनमान उंचविण्यासाठी बदलले पाहिजे.
अन्न व्यवसायिकांनी परवाने काढूनच व्यवसाय केला पाहिजे. ग्राहकांची सुरक्षा व समाधान करणे तुमचे काम आहे. परवाने काढणे ही सुटसटीत प्रक्रिया आहे. तुम्हाला काही अडचणी आल्यास कार्यालयाकडून पूर्ण मदत केली जाईल. परवाने काढूनच कायदेशीर व्यवसाय करा, असे आवाहन त्यांनी केले.
या कार्यशाळेस अन्न सुरक्षा अधिकारी डी. एस. साळुंखे, आय. एस. हवालदार, आर. आर. काकडे, आर. एम. खंडागळे, व्ही. व्ही. रुपनवर व अन्न व्यवसायिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment