नवी दिल्ली - अवकाशात १०४ उपग्रह एकाचवेळी प्रक्षेपित करणे, हे भारताचे यश उल्लेखनीय असले तरी ते मर्यादित आहे, अशी प्रतिक्रिया चीनकडून व्यक्त करण्यात आली आहे. बुधवारी स्वदेशी बनावटीच्या पीएसएलव्ही सी-३७ या प्रक्षेपकाच्या सहाय्याने इस्रोने अवकाशात एकाचवेळी १०४ उपग्रह सोडत विक्रम प्रस्थापित केला होता. आजवर जगातील कोणत्याही देशाला अशी कामगिरी जमलेली नाही. इस्रोने जगभरातील अनेक देशांचे लक्ष या कामगिरीने वेधून घेतले होते. चीनी सरकारकडून चालविण्यात येणाऱ्या 'ग्लोबल टाईम्स' या वृत्तपत्रातून या पार्श्वभूमीवर भाष्य करण्यात आले आहे. एका उड्डाणात १०४ उपग्रह अवकाशात सोडणे, हा भारतीयांच्यादृष्टीने अभिमानाचा क्षण आहे.
मात्र, अंतराळात सोडलेल्या उपग्रहांची संख्या हा यशाचा मापदंड ठरू शकत नसल्यामुळे हे यश मर्यादितच आहे, असे म्हणावे लागेल. भारतातील सामान्य लोकांपेक्षा शास्त्रज्ञांना याची अधिक जाणीव असेल, असे 'ग्लोबल टाईम्स'मधील संपादकीय लेखात म्हटले आहे.
याशिवाय, अमेरिका आणि चीन या देशांशी भारताच्या अंतराळ कार्यक्रमाची तुलना करणाऱ्यांचीही या लेखात खिल्ली उडविण्यात आली आहे. भारत चीनपेक्षा अंतराळात मानवाला पाठविण्याच्याबाबतीत खूपच मागे आहे. भारताने अंतराळ तंत्रज्ञानत केलेली प्रगती ही देशाची प्रतिमा उजळवणारी आहे. शुक्र ग्रहावर यान पाठविण्याची भारताची योजना असल्याच्या अफवा अनेकदा ऐकायला मिळतात. मात्र, भारत या क्षेत्रात अमेरिका आणि चीनपेक्षा खूप पिछाडीवर आहे. व्यापक अंतराळ संशोधनासाठी भारताकडे अजूनपर्यंत संपूर्ण व्यवस्था नाही. भारत अजूनही स्पेस स्टेशन उभारू शकलेला नाही, अशा अनेक बाबींचा या लेखात उल्लेख करण्यात आला आहे. तरीही मर्यादित आर्थिक गुंतवणुकीच्या बळावर भारताने केलेली कामगिरी ही उल्लेखनीय आहे. भारताचे हे यश इतर देशांना विचार करायला लावणारे असल्याचे चीनने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment