नवी दिल्ली : दहशतवाद्यांना ठार करण्यासाठी पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून भारताने केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'बाबत लष्कराने एका इंग्रजी वृत्तपत्राला माहिती दिली आहे. त्यामध्ये या कारवाईबाबतची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
असा झाला 'सर्जिकल स्ट्राईक'!
- उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकव्याप्त काश्मिरमध्ये घुसून दहशतवाद्यांचा तळ उध्वस्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. तशी तयारीही सुरू करण्यात आली.
- लष्करातील चौथ्या आणि नवव्या बटालियनमधील एक कर्नल, पाच मेजर, दोन कॅप्टन, एक सुभेदार, दोन नायब सुभेदार, तीन हवालदार, एक लान्स नायक आणि चार पॅराटूपर्स यांचा 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये सहभाग होता.
- प्रत्यक्ष हल्ला करण्यापूर्वी दहशतवाद्यांच्या तळाची माहिती घेण्यासाठी 48 तास आधी एका मेजरच्या नेतृत्वाखाली एका पथकाने सीमारेषा ओलांडली होती. या पथकाने दहशतवाद्यांच्या स्वयंचलित शस्त्रांच्या स्थानांची माहिती घेतली. दहशतवाद्यांवर हल्ला करण्यासाठी सुरक्षित जागेचाही शोध घेतला.
- घनदाट अंधारात दहशतवादी बेसावध असताना हल्ला चढविण्याच्या उद्देशाने 'सर्जिकल स्ट्राईक' करण्यासाठी भारतीय लष्कराने 28 आणि 29 सप्टेंबरदरम्यानची घनदाट अंधाराची आमावस्येची रात्र निवडली.
- हल्ल्याच्या काही वेळ आधी मेजर रोहित सूरी यांनी ज्याठिकाणी हल्ला करायचा आहे. त्या परिसराची जाऊन रेकी केली.
- त्यानंतर सूरी आणि त्यांचे सहकारी दहशतवाद्यांच्या तळापासून 50 मीटर अंतरावर पोहोचले. त्यावेळी सूरी यांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले.
- हल्ला सुरू असताना शत्रूने शस्त्रास्त्रांच्या साठ्याच्या ठिकाणाहून हल्ल्याला सुरूवात केली. या संकटाचा सामना करण्यासाठी एका मेजरने स्वत:च्या जीव धोक्यत घालून या स्थानाकडे धाव घेत तेथून हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना ठार केले.
- कारवाई सुरू असताना भीतीने जंगलाच्या दिशेने पळून जाणाऱ्या दोन दहशतवाद्यांवर भारतीय लष्कराने हवाई हल्ला करत त्यांना ठार केले.
- या हल्ल्यात भारताची कोणतीही जीवित हानी झाली नाही. केवळ 'सर्जिकल स्ट्राईक'मधील गस्ती पथकातील एक सैनिक कारवाईदरम्यान जखमी झाला.
- हल्ल्यादरम्यान एका नायब सुभेदाराने आपल्या सहकाऱ्यांच्या बचावासाठी हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना प्रत्यक्ष सामोरे जात दोन दहशतवाद्यांना ठार केले.
- या कारवाईत सहभागी झालेल्या सर्वांचा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी सत्कार करण्यात आला.
वृत्तसंस्था गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017
No comments:
Post a Comment