सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
प्रजासत्ताक दिनी नवी दिल्लीत हल्ला करण्याचा कट दहशतवादी संघटनांनी आखला असून तो अंमलात आणण्यासाठी तीन दहशतवादी जामा मशिदीजवळ लपल्याची खळबळजनक माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. कॉल इंटरसेप्टवर दहशतवाद्यांच्या संभाषणावरून ही माहिती समोर आली आहे. यानंतर दिल्लीतील सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह देशातील प्रमुख शहरांमध्ये हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
प्रजासत्ताक दिनी दिल्लीत प्रमुख पाहुणे म्हणून आसियान देशांचे दहा विशेष अतिथी येणार आहेत. यामुळे त्यांच्यासमोर हिंदुस्थानची प्रतिमा मलिन करण्याचा डाव लष्कर -ए-तोयबा व हिज्बुल मुजाहिद्दीन या संघटनांनी आखला आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती. तेव्हापासून दहशतवाद्यांचा कसून शोध घेण्यात येत आहे. याच दरम्यान कॉल इंटरसेप्टवरून काही दहशतवाद्यांच्या संभाषणातून या हल्ल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांना मिळाली. हे संभाषण पश्तुन भाषेतील आहे.
२६ जानेवारीला दिल्लीत दहशतवादी हल्ले घडवण्याची कामगिरी तीन अफगाणिस्तानी दहशतवाद्यांना देण्यात आली असून सध्या हे तिघे जामा मशिदीजवळ लपल्याचे संभाषणातून स्पष्ट झाले आहे. तसेच हल्ल्यासंदर्भात जम्मू-कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातून त्यांना सूचना मिळत आहेत. दिल्लीत घातपाती कारवाया करण्यासाठी या दहशतवाद्यांना पाकिस्तानी लष्कराने प्रशिक्षण दिल्याचेही या संभाषणातून समोर आल्याचे गुप्तचर यंत्रणांनी सांगितले आहे. या संभाषणाची एक ध्वनिफीत दिल्ली पोलिसांनाही देण्यात आली आहे.
Dailyhunt
No comments:
Post a Comment