पाकिस्तानमध्ये लष्करी तळ उभारण्याचा चीनचा प्रयत्न
पेंटॅगॉनच्या अहवालातील माहिती
वॉशिंग्टन (पीटीआय )- पाकिस्तान सह जगातल्या काही मित्र देशांमध्ये लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न चीनने सुरू केला आहे अशी माहिती पेंटॅगॉनच्या अहवालात देण्यात आली आहे. पेंटॅगॉनने अमेरिकन संसदेला सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली. दिजीबौती येथे चीनने लष्करी तळ उभारायला सुरूवात केली आहे हा त्याच प्रयत्नाचाच एक भाग आहे असे यात नमूद करण्यात आले आहे. या तळानंतर अन्य मित्र देशांमध्ये तळ उभारण्याचे काम करण्याची चीनची योजना आहे. हिंदी महासागर, भूमध्य सागर आणि ऍटलांटिक समुद्र या समुद्रातील बंदरांना लक्ष्य करून तेथे आपला वावर वाढवण्याचा चीनचा विचार आहे. याच धोरणातून पाकिस्तानात मोठा लष्करी तळ बांधण्याची योजना चीनने आखली आहे अशी माहिती यात देण्यात आली आहे. तथापी असे असले तरी चीनच्या लष्कराचा आपल्या देशात वावर सुरू करण्यास अनेक देशांची तयारी नाही. त्यांना कसे राजी करायचे ही एक मोठी समस्या त्यांना भेडसावत आहे.
अहवालात म्हटले आहे की फेब्रुवारी 2016 मध्ये चीने दिजीबौती येथे जो लष्करी तळ उभारण्याची योजना सुरू केली आहे त्याचे काम पुढच्या वर्षी पुर्ण होईल अशी अपेक्षा आहे. संयुक्त राष्ट्रांच्या शांतीसेनेसाठी नौदल व लष्कराची मदत त्वरेने पाठवणे सुकर व्हावे यासाठी आम्हीं तेथे हा तळ बांधत आहोत असा आव चीनने आणला आहे. हा तळ सोमालिया जवळ अडेनच्या आखातात आहे. त्याद्वारे मानवतावादी मदत करण्याचे कामही चीनी लष्कराला हाती घेणे शक्य होईल असेही त्यांनी भासवले आहे असे पेंटॅगॉनने म्हटले आहे.
No comments:
Post a Comment