Thursday, 8 June 2017

पीएमपीला मिळाले गुगलचे स्थानक

ई कनेक्‍ट ऍपची सुविधा, एका क्‍लिकवर मिळणार माहिती

पुणे – सध्या पीएमटी बस आहे कुठे…आपल्याजवळ कोणते बसस्टॉप आहे आणि कोणत्या बस कधी येणार….तिला किती वेळ लागणार…त्या मार्गावर अन्य कोणत्या बस आहेत ही सर्व माहिती प्रवाशांना आता एका क्‍लिकवर मिळणार आहे. कारण, “पीएमपीएमल’ने नव्याने विकसित केलेल्या “पीएमपी ई कनेक्‍ट’ या ऍपवरून प्रवाशांना ही सुविधा मिळणार असून, “पीएमपी’ आता “गुगल’वर आली आहे. या ऍपमुळे प्रवाशांना बसच्या सर्व स्टेटसची माहिती आहे त्या जागेववरून मिळणार असून, त्यांना वेळेची बचत आणि सुखाचा प्रवास करता येणार असल्याची माहिती पीएमपीएमलचे अध्यक्ष तुकारम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

“पीएमपी ई कनेक्‍ट’ हे ऍप आज (दि. 7) पासून सुरू झाले असून त्यामध्ये बस ट्रॅकर आणि तक्रार निवारण हे दोन ऑप्शन आहेत. गुगल प्ले स्टोअरमधून हे ऍप डाऊनलोड केल्यानंतर सुरवातील लॉगीन करावे लागणार आहे. त्यानंतर हे ऍप सुरू होईल. त्यातील बस ट्रॅकरवर क्‍लिक करताच व्यक्ती ज्या ठिकाणी उभा आहे त्याचे लोकेशन येईल. तेथून जवळपास कोठे बसस्टॉप आहे याची नावासह माहिती येते. व्यक्तीने त्यावर इच्छितस्थळी जाण्याचे ठिकाण टाकताच कोणती बस उपलब्ध आहे, सध्या ती कुठे आहे, बसस्टॉपवर येण्यासाठी कितीवेळ लागेल, तेथून पुढे इच्छितस्थळी जाण्यासाठी कितीवेळ लागेल याची सविस्तर माहिती प्रवाशाला मिळणार आहे. एखादी बस निघून गेल्यावर परत बस किती वाजता आहे त्याचे स्टेटस काय याचीही माहिती प्रवाशांना एका क्‍लिकवर मिळणार आहे.

या ऍपवरील दुसरा ऑप्शन तक्रार निवारण असा आहे. त्यावर क्‍लिक करताच सात वेगवेगळ्या प्रकारचे पर्याय प्रवाशांसमोर येतात. त्यामध्ये प्रवाशांची ज्या प्रकारची तक्रार आहे त्यावर क्‍लिक करून त्यांना त्यांची तक्रार नोंदवता येणार आहे. त्यामध्ये बसचा क्रमांक टाकताच संबधीत विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ही तक्रार तात्काळ पोहचेल. तक्रार नोंदवताच तक्रारीबाबत एक ट्रॅक नंबर मिळेल. तसेच ही तक्रार कोणत्या अधिकाऱ्याकडे वर्ग झाली त्याचे नाव व पद याचीही माहिती प्रवाशाला त्वरीत समजेल. त्या तक्रारीवर 24 तासाच्या आत कारवाई होणे आवश्‍यक आहे. संबधीत अधिकाऱ्याने ती तक्रार पाहिली नाही तर 24 तासानंतर त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे ती तक्रार वर्ग होईल. त्यानंतर पुढील तीन ते सात दिवसात या तक्रारीचे निवारण होणे आवश्‍यक आहे. अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागणार हे निश्‍चित. दरम्यान या ऍपमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे, बसची पूर्ण माहिती सहज उपलब्ध होणार आहे आणि प्रवाशांच्या संख्येतही वाढ होण्यास मदत होणार असल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे होणार रॅकींग

या ऍपमध्ये रॅकींग सीस्टीमही आहे. त्यामध्ये 5 स्टार म्हणजे चांगले काम आणि 1 स्टार म्हणजे कामाकडे दुर्लक्ष केले. त्यानुसार संबधीत अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात येणार आहे. दरम्यान, प्रवाशांकडून एखादी तक्रार पीएमटीच्या अधिकाऱ्याकडे येते त्यावेळी ती 24 तासाच्या आत पाहणे बंधनकारक आहे. अन्यथा 24 तासानंतर ती तक्रार त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वर्ग होते. तक्रार सोडविल्यानंतर त्याला एक संदेश जाईल. यावर प्रवाशाने समाधान व्यक्त केले तरच तक्रार बंद करण्यात येईल. अन्यथा ती तक्रार पुन्हा उघडण्यात येईल आणि संबधित अधिकाऱ्यांना 1 स्टार देऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल. त्यांच्या या रॅकींगचा विचार भविष्यात पदोन्नतीसाठी ग्राह्य धरण्यात येईल, असे मुंढे यांनी सांगितले. यामुळे कोणता अधिकारी चांगले काम करतो, कोण करत नाही याची माहिती समोर येईल.

महिलांच्या सुरक्षिततेसाठी “एसओएस’ सुविधा

महिलांच्या सुरक्षिततेसाठी “एसओएस’ ही सुविधा या ऍपमध्ये आहे. ज्यावेळी विद्यार्थी, तरूणी, महिला किंवा वृध्द व्यक्ती बसमध्ये बसतील त्यावेळी त्यांनी “एसओएस’ हे ऑप्शन क्‍लिक करावे. त्यानंतर त्यांनी पहिल्या पाच व्यक्तींचे जे मोबाईल नंबर सेव केले त्यांना “आय एम इन ट्रबल’ हा मेसेज जाईल. त्यावरून तुमच्या घरच्यांना किंवा तुम्ही जे नंबर सेव केले त्यांना तुम्ही बसमध्ये कोठून बसला, बस सध्या कोठे आहे याची माहिती जीपीआरएसद्वारे मिळणार आहे. यामुळे प्रवासही सुरक्षित होणार आहे. ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध आहे.

बस येताच अलार्म वाजणार

पीएमटीच्य नेहमीच्या प्रवाशांना बसची वेळ माहित असते. मात्र, ती बस कोठे आहे याची माहिती नसते. त्यामुळे ते दहा ते पंधरा मिनटे अधीच धावत-पळत बसस्टॉपवर येतात. यापुढे ऍपवर बसचे लोकेशन ट्रेस केल्यावर ती कोठे आणि बसस्टॉपवर किती वाजता येणार याची माहिती मिळणे शक्‍य झाले आहे. त्यामुळे घर, ऑफीस किंवा अन्य ठिकाणी व्यक्ती बसून अलाराम सेट करू शकतात. बस दोन किंवा तीन मिनटांच्या अंतरावर असल्याचे तो आलाराम वाजेल. प्रवाशांनी त्यांच्या सोयीनुसार अलाराम लावल्यामुळे नक्कीच त्यांचा वेळ वाचणार आहे.

कस्टमर केअर नंबरमध्ये बदल

ऍपचा वापर करून न शकणाऱ्या प्रवाशांसाठी देखील पीएमपी प्रशासनाने कस्टमर केअर नंबरची सोय उपलब्ध केली आहे. यापुर्वी असलेला 24503355 हा क्रमांक बंद झाला आहे. आता 24545454 या नंबरवर कॉल करता येणार आहे. एकावेळी 12 प्रवाशी या नंबरवर फोन करू शकता व मराठी आणि हिंदी अशा दोन भाषांमधून त्याला माहिती देण्यात येईल. पुर्वीच्या कस्टमर केअर नंबरच्या तुलनेत ही सेवा अधिक जलद असून प्रवाशांना त्वरीत योग्य माहिती देण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment