माजी सैनिकांच्या विधवांना मालमत्ता करात सवलत; प्रशासनाचा स्थायी समितीपुढे प्रस्ताव
पुणे : शहरात वास्तव्यास असलेल्या माजी सैनिकांच्या विधवांना आणि शौर्यपदकाने सन्मानित करण्यात आलेल्या शहीद जवानांच्या नावे असलेल्या मालमत्तेवर आकारण्यात येणाऱ्या करात सवलत देण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीपुढे ठेवला आहे. शौर्यपदक धारक सैनिक आणि माजी सैनिकांच्या विधवांच्या नावे असलेल्या एका मालमत्तेवरील करातून सवलत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. या निर्णयाची कार्यवाही महापालिकेतर्फे केली जात आहे.
माजी सैनिकांच्या विधवा आणि शौर्यपदक धारक जवानांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या करातून सवलत देण्याची मागणी माजी सैनिकांच्या विविध संघटनांनी केली होती. त्यानुसार सात एप्रिल 2016 रोजी नगरविकास खात्याने यासंदर्भातील निर्णयाला मान्यता दिली होती. या राज्यसरकारच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही करण्यासाठी महापालिका आणि नगरपरिषद यांना आदेश प्राप्त झाले होते. त्यानुसार, माजी सैनिकांच्या विधवा आणि देशाचे संरक्षण करताना शहीद झालेले शौर्यपदकधारक अविवाहित जवान यांच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या करातून म्हणजेच सर्वसाधारण कर, पाणीपट्टी, सफाई कर, अग्निशामक कर, वृक्षसंवर्धन कर, विशेष सफाई कर, मनपा शिक्षण उपकर आदी करातून सवलत देण्यात यावी, असा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीमार्फत मुख्य सभेपुढे मंजुरीसाठी ठेवला आहे. या सवलतीस पात्र ठरणाऱ्या व्यक्तीने जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे, असे प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे
No comments:
Post a Comment