Saturday, 17 June 2017

इस्रोची अस्मानी झेप : भारतीयांचा अभिमान उंचावणारा उपग्रह 'जीसॅट 19'

आपल्या देशाला नुकतच स्वातंत्र्य मिळालं होतं तेव्हा "भारत अजून सायकलयुगात आहे," असं म्हटलं जायचं. ते खरंय! भारताचा पहिला अग्निबाण 21 नोव्हेंबर 1963 रोजी केरळमधील थुंबा या छोट्या नारळीबनातील एका चर्चच्या आवारातून आकाशात सोडायचं ठरलेलं होतं. या सांदीकोप-यातील खेड्यात जायला धड रस्ता आणि एकही वाहन नव्हतं. सहाजिकच त्यावेळी सायकल सारख्या छोट्या आटोपशीर वाहनाच्या कॅरिअर वरून नियोजित रॉकेट दोन कर्मचा-यांनी आणलेलं होतं. आकाशात झेपावणारं हे रॉकेट जेमतेम 10 किलोग्रॅम वजनाचं होतं. त्याला "पेन्सिल रॉकेट" म्हटलं गेलं. तरीही त्याच्या प्रक्षेपण सोहळ्यासाठी शास्त्रज्ञ डॉ. होमी भाभा आवर्जून उपस्थित होते. देशी अग्निबाण प्रज्वलित होताच झपाट्याने सोडियमच्या पिंगट वाफा आणि धूर सोडत आकाशाकडे झेपावला आणि काही किलोमीटर वरती गेला. त्याच बरोबर आजूबाजूच्या खेड्यातील असंख्य गावक-यांचा माना आणि अभिमानही उंचावला. नंतर रॉकेट किंवा पार्टस काहीसे मोठे असल्याने बैलगाडीतून आणावे लागले. लवकरच सायकल आणि बैलगाडीयुग मागे पडून देशाने अवकाशयुगात प्रवेश केला.

या वाटचालीत अभिमान बाळगण्यासारखे अनेक टप्पे भारतीय अवकाश संस्थेने (इस्रोने) ओलांडले आहेत. चांद्रयान, मंगळयान तसेच पीएसएलव्हीच्या साहाय्याने एकाच उड्डाणात 104 उपग्रह नियोजित कक्षेत सोडण्याच्या अचाट तंत्रामुळे इस्रोबद्दल जगभरात आदर (किंवा दबदबा म्हणा हवं तर) वाढला आहे. इस्रोने 23 देशांचे 180 उपग्रह नियोजित कक्षेत सोडलेले आहेत आणि त्यात अमेरिकेसारख्या प्रगत देशाचे 115 उपग्रह आहेत. मात्र ते सर्व पीएसएलव्ही मार्फत सोडण्यात आले. यात भर म्हणून 5 जून 2017 रोजी गोरज मुहूर्तावर इस्रोने जीएसएलव्ही मार्क 3 मार्फत आता पर्यंतच्या वाटचालीतील सर्वांत जड (640 टन) प्रक्षेपकाचं यशस्वी प्रक्षेपण केलंय. दोनशे हत्तीचं वजन तेवढं असतं! इस्रोचे तंत्रज्ञ एवढ्या विशाल प्रक्षेपकाला गमतीने "फॅट बॉय" म्हणायचे. त्याच्यामार्फत भूसंलग्न कक्षेत पाठवायच्या जीसॅट-19 उपग्रहाचे वजन तीन हजार एकशे छत्तीस किलोग्रॅम आहे आणि हा आत्ता पर्यंतच्या सर्व उपग्रहात सर्वांत जड आहे. पण ही एक केवळ "वजनदार" कामगिरी आहे असं नाही, तर अवकाशात अंतराळवीर पाठविण्याच्या तयारीचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे. जीसॅट-19 उपग्रह दळणवळणाशी संबंधित असून त्याला एचटीएस (हाय थ्रू पुट) म्हणतात कारण तो माहितीची देवाण-घेवाण उच्च क्षमतेने करतो. याचा अर्थ त्यातील ट्रान्सपॉण्डर शक्तिशाली आहे. तथापि ही "कामयाबी" हासील करताना आपल्या वैज्ञानिकांना हताश करणारे अनेक अपयशी प्रसंग समोर उभे ठाकले होते. भारतरत्न अब्दुल कलाम म्हणत असत, "अपयश या रोगावर मात करायची असेल तर आत्मविश्वास आणि कठोर मेहनत ही दोन औषधे हमखास उपयोगी पडतात". ते खरे ठरले.

No comments:

Post a Comment