नवी दिल्ली: नागरिकांना यापुढे बँकेत खाते उघडताना किंवा 50,000 रुपयांवरील व्यवहार करताना आधार क्रमांक सादर करणे बंधनकारक असेल, असे सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. विद्यमान खातेधारकांना 31 डिसेंबर, 2017 पर्यंत बँकेत आधार कार्डाचा तपशील सादर करावा लागणार आहे, नाहीतर खाते रद्द केले जाणार आहे.
या बदलांची अंमलबजावणी 1 जूनपासून सुरु झाली आहे. यानंतर बँक खाते उघडताना ज्यांच्याकडे बँक खाते नसेल त्यांना किमान आधार नोंदणी क्रमांक सादर करावा लागेल. त्यानंतर सहा महिन्यांच्या आधार कार्ड बँकेकडे जमा करावे लागेल.
सरकारने कर चुकवेगिरी प्रतिबंधक कायद्यात काही बदल केले आहेत. याअंतर्गत कोणत्याही व्यक्ती, कंपन्या तसेच पार्टनरशिप फर्म्सना 50,000 रुपयांपेक्षा अधिक रकमेचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी पॅन किंवा फॉर्म 60 सोबत आधार कार्ड सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. याशिवाय, केवायसी कागदपत्र सादर न करता लहान बँक खाते उघडण्यासाठी कोअर बँकिंग शाखेत जावे लागेल. लहान खात्यामध्ये केवळ 50,000 रुपयांपर्यंतच्या ठेवी जमा करण्यास मंजुरी असते. तसेच या खात्यांमध्ये परदेशातून कोणतीही रक्कम आलेली नाही किंवा आर्थिक व्यवहारांची मासिक आणि वार्षिक मर्यादा ओलांडलेली नाही हे तपासता येते अशा शाखांमध्येही ही खाती उघडता येतील.
याआधी केंद्र सरकारने येत्या 1 जुलैपासून प्राप्तिकर विवरणपत्र भरताना पॅन कार्डासोबत आधार कार्ड जोडण्याचे आदेश दिले होते. याशिवाय, नव्या पॅन कार्डासाठी अर्ज करतानादेखील पॅन कार्ड आवश्यक असणार आहे. ज्यांच्याकडे आधारकार्ड नाहीच अशा लोकांना सर्वोच्च न्यायालयाकडून थोडा दिलासा देण्यात आला आहे. सध्यातरी अशा लोकांचे पॅनकार्ड रद्द केले जाणार नसल्याचे सरकारने सांगितले.
No comments:
Post a Comment