Saturday, 12 November 2016

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा राष्ट्राला उद्देशून संदेश

 

नवी दिल्ली, 8-11-2016

माझ्या देशबांधवानो, तुम्ही सर्वांनी आनंदाने दिवाळी साजरी केली असेल अशी आशा बाळगतो. देशातील काही गंभीर विषयांवर काही, महत्वपूर्ण निर्णयाविषयी मला आज तुमच्याशी संवाद साधायचा आहे.तुम्हाला आठवत असेल की २०१४ साली जेव्हा आम्हाला सत्ता मिळाली तेव्हा जागतिक अर्थव्यवस्थेत, ब्रिक्स मधल्या ‘आय’ म्हणजेच इंडियाविषयी असे म्हंटले जायचे की हा आय घसरतो आहे. सलग दोन वर्षांच्या देशव्यापी दुष्काळाच्या परिस्थितीतही, गेल्या अडीच वर्षात सवाशे कोटी भारतीयांच्या मदतीने भारताने जगात आज एका प्रकाशमान ताऱ्याप्रमाणे आपले अढळ स्थान निर्माण केले आहे. आणि हे आम्ही केले असा केवळ आमचा दावा नाही, तर आंतराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेनेही  हे म्हटले आहे. विकासाच्या या यात्रेत आमचा मूलमंत्र आहे, ‘सबका साथ-सबका विकास’! आमचे सरकार गरीबांना समर्पित आहे आणि समर्पित असेल. गरीबीविरोधात लढण्यासाठी आमचे सर्वात मोठे शस्त्र म्हणजे गरीबांचा अर्थव्यवस्थेत आणि संपन्नतेत सक्रीय सहभाग, गरिबांचे सशक्तीकरण करणे हे आहे. या आमच्या प्रयत्नाची झलक तुम्हाला प्रधानमंत्री जनधन योजना, जनसुरक्षा योजना, आर्थिक सक्षमीकरणासाठी मुद्रा योजना, दलित , आदिवासी आणि महिलांसाठी स्टँड अप ,स्टार्ट अप योजना, गरिबांच्या घरापर्यंत गॅसची शेगडी पोहोचवण्यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजना, शेतकऱ्यांचे उत्पन्न सुरक्षित राहावे यासाठी, प्रधानमंत्री पिक विमा योजना,प्रधानमंत्री सिंचन योजना, जमिनीच्या आरोग्यासाठी मृदा आरोग्य योजना आणि शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव आणि बाजारपेठ मिळावी यासाठी ई नाम ही पणन योजना, या सगळ्या योजना, गरीब आणि वंचित घटकांना सक्षम करण्यासाठीच आम्ही राबवतो आहोत. गेल्या अनेक दशकांपासून आपण पाहतो आहोत की देश भ्रष्ट्राचार आणि काळ्या पैशांच्या व्यवहाराने पोखरला गेला आहे. देशातील गरिबी दूर करण्यातला सगळ्यात मोठा अडथळा, हा भ्रष्टाचार, काळा पैसा, आणि गैरव्यवहार आहे. एकीकडे तर आपला देश जगात आपण सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत पहिल्या क्रमाकावर आहोत, मात्र त्याचवेळी दुसरीकडे, भ्रष्टाचार आणि काळ्या पैशांच्या जागतिक यादीत आपण दोन वर्षांपूर्वी १०० व्या स्थानी होतो. गेल्या दोन वर्षात हा भ्रष्टाचार आणि काळा पैसा नियंत्रणात आणण्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले, पावले उचललीत. यामुळे आम्ही आता या यादीत ७६ व्या क्रमाकांवर पोहचला आहोत. यावरून लक्षात येते की भ्रष्टाचाराची ही कीड किती खोलवर रुजली आहे. काही मूठभर लोकांनी आपल्या स्वार्थासाठी हा भ्रष्टाचार वाढू दिला आहे. गरिबांच्या कल्याणाकडे दुर्लक्ष करत काही लोकांनी हा भ्रष्टाचार सुरूच ठेवला आहे. अनेकांनी त्यासाठी आपल्या पदाचा दुरुपयोगही केला. दुसरीकडे काही प्रामाणिक लोक भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देत आहेत. काही लोकांनी संपूर्ण आयुष्य प्रामाणिकपणे घालवून एक आदर्श निर्माण केला आहे. आपण अनेकदा ऐकतो, की एखादा गरीब माणूस , अगदी ऑटोरिक्षावाला त्याच्या रिक्षात राहून गेलेली दागिन्यांची पिशवी मूळ मालकाकडे नेऊन देतो. अनेकदा , टॅक्सीमध्ये काही सामान, मोबाईल राहिला तर टॅक्सीचालक स्वतःचे पैसे खर्च करून हे सामान ग्राहकांपर्यंत पोहोचवतो. भाजीवाला, साधा दुकानदारही जर ग्राहकाकडून चुकून जास्त पैसे घेतले तर ते त्यांना बोलावून परत करतो. हा याच गोष्टीचा मोठा पुरावा आहे की भारताचा सर्वसामान्य नागरिक प्रामाणिक आहे. मात्र माझ्या प्रिय देशबांधवांनो, प्रत्येक देशाच्या विकास प्रक्रियेत असे काही क्षण आले की जेव्हा काही कठोर आणि निर्णायक पावले उचलण्याची गरज निर्माण झाली. या देशातल्या लोकांना हे नेहमीच जाणवले आहे की भ्रष्टाचार, काळा पैसा, हवाला आणि दहशतवाद असे रोग आहेत की ज्यांनी आपल्या देशाच्या विकासप्रकीयेत नेहमीच मोठे अडथळे निर्माण केले आहेत. याची पाळेमुळे इतकी खोलवर रुजली आहेत की जी देशाच्या विकासप्रक्रियेला मागे ओढतात. देशाला आतमधून वाळवी प्रमाणे पोखरत आहे.

माझ्या प्रिय देशवासियांनो, दहशतवादाचे भीषण स्वरूप कोणाला माहित नाही ? किती तरी निर्दोष लोकांना निर्दयपणे मारले जाते. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की या दहशतवाद्यांना  पैसा कुठून मिळतो? सीमेपलीकडचे आपले शत्रू खोट्या , बनावट नोटा बाजारात आणून आपल्या देशात हे काळे धंदे करतात. आणि हे गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. अनेकदा ५०० आणि १००० रुपयांच्या बनावट नोटांचा काळाबाजार करणारेही पकडले गेले आणि नोटाही जप्त केल्या गेल्या.

बंधू भगिनीनो, एकीकडे दहशतवाद आणि बनावट नोटांचे हे जाळे देशाला बरबाद करत आहे, तर दुसरीकडे भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला थांबवण्याचे आव्हान देशापुढे आहे. आम्ही सत्तेवर आल्यावर लगेचच भ्रष्टाचार आणि काळ्यापैशाविरुद्ध अनेक प्रभावी पावले उचलली. जसे, काळ्या धनाच्या शोधासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली विशेष तपास पथकाची स्थापना केली. परदेशात जमा असलेल्या काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी २०१५ साली एक सशक्त कायदा करण्याचे काम आम्ही केले. परदेशात असलेला काळा पैसा परत आणण्यासाठी, विविध देशांशी असलेल्या करारात बदल केले. काही नवे करार केले. अमेरिकेसह वेगवेगळ्या देशांसोबत या माहितीची देवाणघेवाण होऊ शकेल अशी व्यवस्था केली. भ्रष्टाचारी लोकांची बेनामी संपत्ती बाहेर काढण्यासाठी , ऑगस्ट २०१६ साली, आणखी एक मजबूत कायदा केला. या सगळ्या कायद्यांमुळे, प्रयत्नातून एक मोठा चोर दरवाजा बंद केला गेला. देशातली अघोषित संपत्ती दंडाच्या रकमेसह उघड करण्याच्या योजनेंतर्गत बरीच मोठी अघोषित संपत्ती बाहेर आली. माझ्या प्रिय देशबांधवांनो, या सगळ्या प्रयत्नातून गेल्या अडीच वर्षात आम्ही भ्रष्टाचारी लोकांकडून जवळपास सव्वा लाख कोटी रुपये काळा पैसा बाहेर काढला, ही रक्कम कमी नाही मित्रांनो, खूप मोठी रक्कम आहे. देशातील असे कोट्यवधी नागरिक, जे प्रामाणिक आहेत, त्यांना मनापासून असे वाटते की भ्रष्टाचार, काळा पैसा, बेनामी संपत्ती, बनावट नोटा आणि दहशतवादाविरोधात निर्णायक लढाई व्हायला हवी. कोणत्या प्रामाणिक नागरिकाला, अधिकाऱ्यांच्या घरातील गाद्यांमध्ये किंवा पोत्यात भरलेल्या काळ्या पैशांच्या बातम्या वाचून राग येत नसेल, दुःख होत नसेल? आज देशात चलनव्यवस्थेची ही स्थिती आहे की देशातील एकूण चलनातील ५०० आणि हजाराच्या नोटांचे प्रमाण जवळपास ८० टक्क्यापर्यंत पोहोचले आहे. देशात रोख व्यवहारांच्या ,चलनी नोटांच्या व्यवहाराचा थेट संबंध भ्रष्टाचाराशी आहे. भ्रष्टाचारातून होणाऱ्या ह्या रोखीच्या व्यवहाराचा मोठा परिणाम महागाईवरही होतो आहे. त्याचा फटका गरिबांना बसतोय. याचा थेट परिणाम गरीब आणि मध्यमवर्गाच्या क्रयशक्तीवर पडतो. तुम्हाला स्वतःलाही अनुभव आला असेल, जेव्हा तुम्ही घर किंवा जमीन घेण्यासाठी जात असाल तेव्हा तुम्हाला सांगितले जात असेल, अर्धे पैसे चेकने घेणार आणि अर्धे पैसे रोख. काहीही घ्यायचे असेल, एखाद्या मध्यमवर्गीय व्यक्तीला घर घ्यायचे असेल आणि त्याच्याकडे काळा पैसा नसेल, तर त्याला अडचण येते. मग काहीही घ्यायचे असो, घर, जमीन, वस्तू, वैद्यकीय सेवा , ह्यासगळ्या गोष्टीची किंमत काळ्या पैशामुळे कृत्रिमरीत्या वाढली जाते.

पैशांच्या या रोख व्यवहारामुळे हवाला सारख्या अनिष्ट गोष्टीनांही वाव मिळतो. याचा थेट संबंध काळा पैसा आणि शस्त्रांस्त्राच्या अवैध खरेदीशी आहे. निवडणुकामधे होणाऱ्या काळ्या पैशाच्या वापराविषयी तर कित्येक वर्षांपासून चर्चा सुरु आहे.

माझ्या बंधू भागिनिंनो,

काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या या विळख्यातून देशाला मुक्त करण्यासाठी आम्ही असा निर्णय घेतला आहे की पाचशे आणि एक हजार रूपयाच्या सध्या चलनात असलेल्या नोटा आज मध्यरात्रीपासून म्हणजेच 8 नोव्हेंबर 2016 पासून रद्दबातल ठरवल्या जातील, या नोटा आता चलन समजले जाणार नाही.याचा अर्थ, या नोटा आज मध्यरात्रीपासून व्यवहारात स्वीकारल्या जाणार नाहीत. पाचशे आणि हजाराच्या ज्या बनावट नोटा काही देश विघातक आणि समाजकंटकानी बाजारात आणल्या होत्या ,त्या आता फक्त एक कागदाचा तुकडा बनल्या आहेत.
मात्र जे प्रामाणिक आणि कष्टाळू लोक आहेत , त्यांच्या हितांचे पूर्ण संरक्षण केले जाईल. मी तुम्हाला आश्वस्त करतो की शंभर, पन्नास, वीस, दहा, पाच ,दोन आणि एक रूपयाच्या नोटा आणि सर्व नाणी वैध चलन म्हणून कायम राहतील. या निर्णायचा त्यांच्यावर काहीही परिणाम होणार नाही.
या निर्णयामुळे बनावट चलन, काळा पैसा आणि भ्रष्ट्राचाराशी लढा देणाऱ्या सर्वसामान्य माणसाचे हात बळकट होतील. ह्या परिवर्तनाच्या पुढच्या काही काळात नागरिकाना कमीतकमी अडचणी व्हाव्यात म्हणून आम्ही अनेक उपाययोजना केल्या आहेत.

1. ज्यांच्याकडे पाचशे आणि हजार रुपयांच्या जुन्या नोटा आहेत ते येत्या 10 नोव्हेंबरपासून ते 30 डिसेंबर 2016 ला बँक बंद होईपर्यंत या नोटा त्यांच्या बँक खात्यात किंवा पोस्ट खात्यात जमा करू शकतात. हा पैसा जमा करण्यासाठी काहीही मर्यादा नाही.

2. म्हणजेच तुमचा पैसा जमा करण्यासाठी तुमच्याकडे 50 दिवसांचा वेळ आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही.

3. तुमचा पैसा तुमच्यापाशीच सुरक्षित राहणार आहे.तुम्हाला याविषयी अजिबात काळजी करण्याची गरज नाही.

4. तुमच्या खात्यात एकदा तुम्ही पैसे जमा केले की तुम्ही केव्हाही पैसे काढू शकाल.

5. नव्या चलनाचा पुरवठा होण्यास लागणारा वेळ लक्षात घेता, सुरुवातीचे काही दिवस दररोज दहा हजार रुपये तर त्यानंतर काही दिवस दर आठवड्याला 20 हजार रुपये इतकी मर्यादा राहील .भविष्यात ही मर्यादा वाढवली जाईल.

6. तुमचा पैसा तुमच्या बँक खात्यात जमा करण्याशिवाय आणखी एक पर्याय उपलब्ध आहे.

7. तुमच्या महत्वाच्या गरजासाठी तुम्ही कुठल्याही बँकेत किंवा टपाल कार्यालयात जाऊन 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता.मात्र त्यासाठी तुम्हाला तुमचे ओळखपत्र पुरावा म्हणून दाखवावे लागेल. आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र, रेशन कार्ड, पासपोर्ट, पॅन कार्ड किंवा इतर कुठलेही मान्यताप्राप्त ओळखपत्र तुम्ही दाखवू शकता.

8. ह्या नोटा बदलण्यासाठी 10 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर या काळात 4 हजार रुपयांची मर्यादा आहे.२५ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या काळात ही मर्यादा शिथिल केली जाईल. ज्या लोकांना या काळात बँकेत नोटा जमा करणे शक्य होणार नाही, ते ३० डिसेंबर २०१६ नंतर रिझर्व बँकेच्या कार्यालयात जाऊन या नोटा जमा करू शकतील. ३१ मार्च २०१७ पर्यंत ही सुविधा उपलब्ध असून त्यासाठी नागिरकांना एक अर्ज भरावा लागेल.

9. ९ नोव्हेंबर ला देशभरातील ए टी एम केंद्र आणि १० नोव्हेंबर ला काही ठिकाणी ए टी एम केंद्र बंद राहतील. त्यानंतर पहिले काही दिवस दररोज एका ए टी एम कार्ड वर २००० रुपये काढता येतील. नंतर ४००० रुपये काढता येतील.

५०० आणि १००० रुपयांच्या नोटा आज मध्यरात्रीपासून चलनातून बाद होणार आहेत. मात्र नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी मानवतेच्या दृष्टिने सरकारने पुढच्या ७२ तासांसाठी म्हणजेच ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत काही विशेष सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्यानुसार या काळात सरकारी रुग्णालयांमध्ये ५०० आणि १०० रुपयांच्या नोटा स्वीकारल्या जातील. सरकारी रुग्णालयांमधल्या औषध विक्री केंद्रांवर डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधं घेण्यासाठीही या नोटा स्वीकारल्या जातील. तसचं रेल्वे तिकीट, बस आणि विमान प्रवासासाठीच्या तिकिटांसाठी हे चलन स्वीकारलं जाईल. सध्या प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी सरकारनं ही व्यवस्था केली आहे. सार्वजनिक तेल कंपन्यांच्या पेट्रोल पंपांवर आणि गॅस भरणा केंद्रांवर ५०० आणि १००० च्या नोटा स्वीकारल्या जातील. त्याशिवाय केंद्र आणि राज्य सरकारांच्या सहकारी ग्राहक केंद्रांवर, दुध केंद्रांवर आणि स्मशानभूमीत हे पैसे स्वीकारले जातील. मात्र या संपूर्ण काळात झालेल्या व्यवहारांचे तपशील आणि पैसे संबंधितांना ठेवावे लागतील.

अंतरराष्ट्रीय विमानतळांवर येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्या ५०० आणि १०० च्या नोटा बदलून घेण्यासाठी व्यवस्था केली जाईल. मात्र ही व्यवस्था ५००० रुपयांच्या रकमेपर्यंतच मर्यादित असेल. परदेशी पर्यटकही त्यांचं परदेशी चलन किंवा जुन्या नोटा विमानतळावर बदलून घेऊ शकतील. त्याचीही मर्यादा ५००० रुपये इतकी असेल.

आणखी एक गोष्ट मला आवर्जून सांगायची आहे. ती म्हणजे या संपूर्ण प्रक्रियेत धनादेश, डिमांड ड्राफ्ट, डेबिट/ क्रेडीट कार्ड आणि ई बँकिंग सुविधा उपलब्ध असून त्यांच्या व्यवहारावर कुठलेही बंधन नाही. 

या सर्व प्रयत्नांनंतरही नागरिकांना काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. मात्र देशाच्या फायद्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी नेहमीच अडचणींचा सामना करण्याची आणि त्याग करण्याची तयारी ठेवली आहे असा अनुभव आहे. जेंव्हा एखादी गरीब विधवा स्त्री तिचं गॅस अनुदान सोडते, जेंव्हा एखादा सेवानिवृत्त शिक्षक त्याचे सर्व निवृत्ती वेतन स्वच्छ भारत अभियानाला देतो, जेंव्हा एखादी गरीब आदिवासी माता शौचालय बांधण्यासाठी आपल्या बकऱ्या विकते, जेंव्हा एखादा सैनिक त्याचे गाव स्वच्छ करण्यासाठी ५७००० रुपयांची मदत देतो अशा सर्व सामान्य नागरिकांमध्ये मला देशासाठी काही करण्याचा दृढ निश्चय नेहमीच जाणवतो. आणि अशा नागरिकांमुळेच देशाचा विकास होणार आहे.

म्हणूनच माझ्या मित्रांनो, भ्रष्टाचार, काळा पैसा, बनावट चलन आणि दहशतवादाविरुध्दच्या या लढाईत सुरुवातीला येणारी संकटे झेलण्यासाठी तुम्ही सर्व लोक सामील होणार नाही का? देशाच्या शुद्धीकरणाच्या या महायज्ञात सर्व नागरिक पाठिंबा देतील आणि सहभागी होतील असा मला विश्वास वाटतो. माझ्या देश बांधवांनो, दिवाळीचा उत्सव साजरा केल्यानंतर प्रामाणिकपणाचा हा उत्सव आपण सगळे मिळून साजरा करूया.

मला खात्री आहे की सर्व राजकीय पक्ष, सर्व सरकारी आणि सामाजिक सेवा संस्था, प्रसारमाध्यमे आणि अर्थातच समाजातल्या सर्व स्तरातील लोक या परिवर्तनात उत्साहाने भाग घेतील आणि हे अभियान यशस्वी करतील.

माझ्या प्रिय देशबांधवांनो,

हा निर्णय घेताना गुप्तता पाळणे अतिशय आवश्यक होते. आज जेंव्हा मी तुमच्याशी बोलतो आहे त्याच वेळी विविध संस्था म्हणजे बँका, टपाल कार्यालये, रेल्वे, रुग्णालये आणि ईतर संस्थांना ही आत्ताच ही माहिती कळते आहे. रिझर्व बँक, ईतर बँका आणि टपाल कार्यालये यांना अतिशय थोड्या काळात खूप मोठी तयारी करावी लागणार आहे. अर्थातच यासाठी त्यांना वेळेची गरज आहे. म्हणूनच देशातल्या सर्व बँका उद्या म्हणजेच ९ नोव्हेंबर ला बंद राहणार आहेत. यामुळे कदाचित तुम्हाला त्रास होऊ शकतो. मात्र, मला पूर्ण विश्वास आहे की बँका आणि टपाल कार्यालये हे महत्वाचं कार्य यशस्वीपणे पार पाडतील. याच वेळी मी सर्व बँका आणि टपाल कार्यालयांना आवाहन करतो की त्यांनी देशहितासाठी हे आव्हान निष्ठेने पेलावे.

माझ्या प्रिय नागरिकांनो,

वेळोवेळी चलनाच्या गरजेनुसार रिजर्व बँक केंद्र सरकारच्या परवानगी नंतर उच्च मूल्याचे चलन व्यवहारात आणत असते. २०१४ साली रिजर्व बँकेनं ५००० आणि १०००० रुपयांच्या नोटा चलनात आणण्याची शिफारस केली होती. मात्र भरपूर विचारांती ती शिफारस न स्वीकारण्याचा निर्णय घेतला गेला. आता चलनाचे परिवर्तन करतांना २००० रुपयांची नोट चलनात आणण्याचा रिजर्व बँकेचा प्रस्ताव सरकारने मंजूर केला आहे. त्यामुळे आता ५०० रुपयांच्या आणि २००० रुपयांच्या नव्या रूपातल्या नोटा चलनात येणार आहेत. मात्र जुने अनुभव लक्षात घेता या पुढे उच्च मूल्याच्या नोटा एकूण चलनाच्या व्यवहारात अतिशय कमी राहतील याची काळजी रिजर्व बँक घेणार आहे.

देशाच्या इतिहासात नेहमीच असे क्षण येतात जेंव्हा प्रत्येक व्यक्तीला वाटते की आपण या क्षणाचा भाग व्हावे. त्याला वाटतं की देशाच्या प्रगतीत आपणही काही योगदान द्यावे. मात्र, अशी संधी क्वचितच मिळते. आज आपल्याला ही संधी मिळाली आहे. जेंव्हा आपण देशासाठी परिवर्तनाच्या या महायज्ञात सहभाग देऊ शकतो, भ्रष्टाचार, काळा पैसा, आणि बनावट चलनाविरुद्धाच्या या लढाईत तुम्ही जितकी अधिक साथ द्याल तितका हा लढा यशस्वी होईल.

भ्रष्टाचार आणि काळा पैसा हा जीवनाचा भाग झाल्याप्रमाणे त्याला भारतीयांनी स्वीकारले होते ही अतिशय चिंतेची बाब आहे. आपले राजकारण, आपले प्रशासन आणि आपल्या संपूर्ण समाजात भ्रष्टाचार वाळवी प्रमाणे पसरतो आहे. आपली एकही सार्वजनिक संस्था या वाळवीपासून सुरक्षित नाही.

वेळोवेळी मी हे अनुभवले आहे की सर्व सामान्य माणसांना जेंव्हा अप्रामाणिकपणा आणि अव्यवस्था यात एकाची निवड करायची असते तेंव्हा ते कधीही अप्रामाणिकपणाला पाठिंबा देत नाही. पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांना आवाहन करतो की तुम्ही या प्रक्रियेत योगदान द्या. जसे दिवाळीत तुम्ही तुमची घरे आणि आसपासचा परिसर स्वच्छ केला तसच आज देश स्वच्छ करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हा.

त्यासाठी होणाऱ्या तात्कालिक त्रासाकडे दुर्लक्ष करा.

एकात्मता आणि विश्वसनीयतेच्या या उत्सवात सहभागी व्हा.

येणाऱ्या पिढ्यांना त्यांचे आयुष्य प्रतिष्ठेने जगता येईल अशी व्यवस्था निर्माण करा.

भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाशी लढा द्या.

देशाच्या संपत्तीचा उपयोग गरिबांना होईल याची काळजी घ्या.

कायद्याचे पालन करणाऱ्या नागरिकांना देशातल्या सुविधांचा लाभ मिळेल अशी व्यवस्था निर्माण करा.

माझ्या 125 कोटी भारतीयांवर मला पूर्ण विश्वास आहे आणि आपला देश यशस्वी होईल अशी मला खात्री आहे.

खूप खूप धन्यवाद ! धन्यवाद !

नमस्कार
भारत माता की जय

No comments:

Post a Comment