Tuesday, 18 August 2015

स्टेट बँक-बडी मोबाईल वॉलेटचे उद्‌घाटन

     भारतीय स्टेट बँकेच्या ‘स्टेट बँक बडी मोबाईल वॉलेट’चे आज केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते मुंबईतील स्टेट बँक भवन येथे उद्‌घाटन करण्यात आले. केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा, स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, आर्थिक सेवा विभागाचे सचिव हसमुख अधिया तसेच अन्य मान्यवर यावेळी उपस्थित होते.
     स्टेट बँकेचे मोबाईल वॉलेट बँकिंग ग्राहकांच्या व्यवहारविषयक सवयीत बदल घडवून आणेल, असा विश्वास केंद्रीय अर्थमंत्राी अरुण जेटली यांनी यावेळी व्यक्त केला. स्टेट बँकेच्या लाखो ग्राहकांना आता पासबुक, धनादेश अशा पारंपरिक गोष्टींवर अवलंबून रहावे लागणार नाही. या मोबाईल वॉलेटमुळे रोखीचे व्यवहार कमी होऊन विनिमय तसेच लेखा विभागाचे काम सोपे होणार आहे, असेही जेटली यावेळी म्हणाले. सामाजिक संस्थांना अर्थसहाय्य करताना पैशापेक्षाही व्यवस्थापन दृष्टीकोन, परस्पर विश्वासार्ह संबंध आणि त्यांच्या कामगिरीचा आढावा अशा गोष्टी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचे अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी नमूद केले.
     वित्तीय आणि बिगर वित्तीय ग्राहकांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी पसंतीची बँक बनण्याचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने टाकलेले हे आणखी एक पाऊल आहे. या बदलांमुळे मोबाईल केंद्रस्थानी असणार आहे आणि स्टेट बँक बडीमुळे आम्हाला या माध्यमाद्वारे आमचे स्थान सक्षम करण्यासाठी मदत होईल, असे स्टेट बँकेच्या अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य यांनी नमूद केले.
     स्टेट बँक ऑफ इंडियाने ॲक्सेंचर आणि मास्टरकार्ड यांच्या सहकार्याने स्टेट बँक बडी-मोबाईल वॉलेट तयार केले आहे. हे ॲप 13 भाषांमध्ये उपलब्ध असून ग्राहक कोणत्याही बँकेसोबत व्यवहार करत असले आणि कोणतेही कार्ड वापरत असले तरीही त्यांना ते वापरता येईल. सध्या ते गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करण्यात आले आहे आणि लवकरच ॲपल ॲप स्टोअरवरही उपलब्ध केले जाणार आहे.
मोबाईल वॉलेट ॲप्लिकेशनमध्ये नोंदणीकृत व नव्या युजरना पैसे पाठवणे, थकबाकी पूर्ण करण्यासाठी पैसे मागणे किंवा देणे, पसंतीच्या खात्यात अतिरिक्त पैसा हस्तांतरित करणे, तातडीने रिचार्ज करणे व बिले भरणे, सिनेमाची व विमानाची तिकिटे काढणे तसेच हॉटेलात व दुकानात खरेदी करणे अशी वैशिष्ट्ये आहेत.
     यावेळी एसबीआयच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी कार्यक्रमाची हाताळणी करणाऱ्या एसबीआय फाऊंडेशन बोधचिन्हाचे आणि संकेतस्थळाचे अनावरणही जेटली यांच्या हस्ते करण्यात आले.  www.sbifoundation.inwww.sbifoundation.co.in  असे या संकेतस्‍थळाचे नाव आहे.
     दरम्यान, याप्रसंगी सीएसआर अंतर्गत विविध सामाजिक उपक्रमांसाठी एसबीआयच्या वतीने वॉकहार्ट फाऊंडेशनचे मुख्य संचालक उझेका खोराकीवाला यांना स्वच्छता कार्यक्रमासाठी 97.37 लाख तर अगस्त्य इंटरनॅशनल फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रामजी राघवन यांना ग्रामीण भागात विज्ञान प्रसार कार्यासाठी 279.50 लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. तसेच या मान्यवरांना पुष्पगुच्छ, शाल आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
 
Source : PIB

No comments:

Post a Comment