Sunday, 16 August 2015

स्वातंत्र्य दिन २०१५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण


69 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लाल किल्ल्यावरुन देशाला उद्देशून केलेले भाषण


 भारताच्या  सव्वाशे कोटी  माझ्या प्रिय देशबांधवांनो,

स्वातंत्र्यांच्या या पवित्र दिनी आपल्या सर्वांना मनापासून अनेक अनेक शुभेच्छा!
15 ऑगस्टची ही पहाट म्हणजे केवळ नेहमीची सकाळ नाही तर जगातल्या सर्वात मोठया लोकशाहीच्या स्वातंत्र्याची  पहाट आहे, ही पहाट सव्वाशे कोटी देशवासियांच्या  स्वप्नांची पहाट आहे. ही पहाट, सव्वाशे कोटी देशवासिंयाच्या संकल्पाची पहाट आहे. या पवित्र पर्वात ज्या महापुरुषाच्या बलिदानामुळे, त्याग आणि  तपश्चर्येमुळे शेकडो वर्ष भारताच्या अस्मितेसाठी लढा देत राहिले, आपल्या प्राणांची बाजी लावत राहिले,  आपली उमेदीची  वर्ष तुरुंगात  काढत राहिले, यातना सोसत राहिले मात्र  आपल्या स्वप्नाची कास  सोडली नाही,  संकल्पापासून हटले नाहीत, स्वातंत्र्याच्या या सेनानींना आज माझे कोटी कोटी प्रणाम. गेल्या काही दिवसात आपल्या देशाच्या अनेक नागरिकांनी, युवक-युवतींनी, साहित्यिकांनी, समाजसेवकांनी जगभरात भारताचे नाव उज्वल करण्याचे अभिनंदनास पात्र काम केले आहे. या अगणित  लोकांना देशाचे नाव उंचावण्याबद्दल मी लाल किल्ल्यावरुन मनापासून अनेक शुभेच्छा देतो, अभिनंदन करतो. जगभरात भारताची विशालता, भारताच्या विविधतेचे गुणगान होत असते पण जशी भारताची अनेक वैशिष्टये आहेत, विविधता आहे, विशालता आहे तसेच  जनतेमध्ये साधेपणाही आहे. भारताच्या कानाकोपऱ्यात एकताही आहे आणि,  हीच आपली कमाई आहे. हीच राष्ट्राची शक्ती आहे. आपल्या राष्ट्राच्या या शक्तीला प्रत्येक युगात नवी झळाळी देण्याचे  प्रयत्न करण्यात आले. काळाच्या गरजेनुसार भविष्यातली स्वप्ने  साकार करण्याच्या आवश्यकतेनुसार त्यांना रुप देण्यात आले आणि त्यातून प्राचीन परंपरातून, नित्य नव्या  संकल्पाच्या साथीने आपला देश येथपर्यंत  पोहोचला आहे.

आपली एकता, साधेपणा, बंधुभावना, सद्‌भाव हीच आपली कमाई आहे आणि त्यावर डाग पडता  कामा नये, त्याला धक्का लागता कामा नये. देशाची एकता कायम राहिली नाही तर स्वप्नांचा चक्काचुर होईल आणि म्हणूनच जातीयवादाचे विष असो, धार्मिकतेचा उन्माद असो कोणत्याही स्वरुपात आपण त्याला थारा  देता कामा नये.

जातीयतेचे विष असो, धार्मिकतेचा उन्माद असो, विकासाच्या अमृताने आपल्याला तो शमवायचा आहे. विकासाची अमृतधारा पोहोचवयाची आहे आणि  त्याद्वारे नवी चेतना निर्माण करण्याचा प्रयत्न करायचा आहे.

बंधू- भगिनींनो,

हा देश टीम इंडियामुळे प्रगती करत आहे,  आणि ही टीम इंडिया म्हणजे सव्वाशे कोटी देशवासियांचा संघ आहे.  हा संघ टीम म्हणून कामाला लागतो तेव्हा देशाला नव्या उंचीवर नेऊन ठेवण्याचे कार्य करतो, राष्ट्र घडवतो, राष्ट्र वाढवतो, राष्ट्र वाचवतोही  याचा जगाने  विचार केलाय का  ? आणि म्हणून  आम्ही  जे काही करत आहोत जिथपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहोत तो या सव्वाशे कोटीच्या टीम इंडियामुळे आहे.

लोकशाहीत जनतेचा सहभाग सर्वात मोठी कमाई आहे. सव्वाशे कोटी  देशवासियांना ऐकमेकांबरोबर  घेऊन आपण देशाचा गाडा हाकला तर प्रत्येक क्षणी  देश सव्वाशे कोटी  पावले पुढे चालत  राहील आणि म्हणूनच  टीम इंडियाच्या या रुपात जनभागीदारीला प्राधान्य दिले गेले. मग इलेक्ट्रॉनिक प्लॅटफॉर्मच्या रुपातले mygov.in असू दे, नागरिकांची सातत्याने येणारी  लाखो पत्र असोत, मन की बात असू दे, नाही तर नागरिकांशी संवाद असू  दे. या मार्गातूनच दिवसेंदिवस ही जनभागीदारी वाढत चालली आहे. दूरदूरच्या दुर्गम गावातल्या लोकांकडूनही मोठया प्रमाणात  आम्हाला सूचना मिळतात आणि हीच टीम इंडियाची ताकद आहे. माझ्या प्रिय  बांधवानो, हे निश्चित  आहे की टीम इंडियाला एकच जनादेश आहे आणि तो जनादेश आहे की आपली संपूर्ण व्यवस्था,  आपल्या सगळया  योजना, देशातल्या गरीबांच्या उपयोगात आल्या पाहिजेत. गरीबीपासूनच्या मुक्तीच्या लढाईत गरीबांना ताकद दिली, त्यांना सामर्थ्य दिले तर देशातला कोणताही गरीब, गरीबीतच   आपले जीवन जगू इच्छित नाही,  तोही गरीबीविरुध्द  लढा  देऊ इच्छितो आणि म्हणूनच आपली व्यवस्था, आपली साधनसंपत्ती, आपल्या योजना, आपले कार्यक्रम गरीबांच्या कल्याणासाठी कसे उपयोगी ठरतील यातच शासन व्यवस्थेचे यश सामावले आहे. माझ्या बंधू-भगिनींनो गेल्‍या 15 ऑगस्ट रोजी मी तुमच्यासमोर काही विचार मांडले होते, तेव्हा मी नवखा होतो. मी जे सुरुवातीला पाहिले होते, ते मी नि:संकोचपणे खुल्या मनाने सव्वाशे कोटी देशबांधवांच्या समोर मांडले होते.

              मात्र आज एका वर्षानंतर त्याच लाल किल्ल्यावरुन पवित्र तिरंग्याच्या साक्षीने मी देशवासियांना  विश्वास देतो की एका वर्षात  टीम इंडिया, सव्वाशे कोटी देशवासीय नव्या विश्वासाने नव्या सामर्थ्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करत निर्धारित वेळेत स्वप्न साकार करण्यात गुंतले. नवीन विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. मी गेल्या 15 ऑगस्टला प्रधानमंत्री जनधन योजनेची घोषणा केली होती. देशाला 60 वर्षे  झाली. गरीबांसाठी बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. मात्र 60  वर्षाहून अधिक काळानंतर  गेल्या  15 ऑगस्ट पर्यंत देशातील  40 टक्के  लोक बँक खात्यापासून वंचित  होते. गरीबांसाठी बँकांचे दरवाजे बंद होते. आम्ही संकल्प केला की हा कलंक  दूर करायचा आहे. जगभरात  आर्थिक समावेशकतेबाबत जे बोलले जाते, त्यासाठी गरीबातील गरीब व्यक्तीला आर्थिक घडामोडींच्या मुख्य प्रवाहात आणावे लागेल, आणि बँक खाती हा त्याचा आरंभबिंदू आहे. आपण ठरवले होते, करुया, करु, विचार करु, पाहू असे होत नाही. आम्ही म्हटले होते 26 जानेवारी रोजी जेव्हा देश पुन्हा एकदा तिरंग्यासमोर उभा असेल तोपर्यंत  निर्धारित वेळेत काम पूर्ण करु. माझ्या देशबांधवांनो, मी आज अभिमानाने सांगतो की आम्ही निर्धारित वेळेत काम पूर्ण केले. 17 कोटी लोकांनी प्रधानमंत्री जनधन  योजनेअंतर्गत खाती उघडली आणि आम्ही म्हटले होते, गरीबांना संधी दयायची होती म्हणून म्हटले होते, एकही पैसा नसला तरी बँक खाते उघडू. बँकांना खाती उघडण्यासाठी कागदाचा खर्च झाला तरी चालेल. शेवटी बँका कुणासाठी आहेत, गरीबांसाठी बँका असायला हव्यात. म्हणूनच शून्य शिल्लक  असलेली खाती उघडण्याचा संकल्प केला होता. मात्र देशातील श्रीमंतांना आम्ही पाहिले होते, यावेळी देशाने गरीबांनाही पाहिले आणि गरीबांच्या श्रीमंतीलाही पाहिले आणि मी या गरीबांच्या श्रीमंतीला आज लाल किल्ल्यावरुन शतदा सलाम करु इच्छितो. कारण शून्य शिल्लक असलेली खाती उघडायची सांगूनही या गरीबांनी 20 हजार कोटी रुपये  बँक खात्यात जमा  केले. जर ही गरीबांची श्रीमंती नसती तर कसे शक्य झाले असते  ?  आणि म्हणूनच या गरीबांच्या श्रीमंतीमुळे  ही टीम इंडिया पुढे मार्गक्रमण करेल असा मला आज विश्वास वाटतो.

              माझ्या बंधू-भगिनींनो, आपल्या देशात कुठेही बँकेची एखादी शाखा उघडली किंवा बँकेची इमारत उभी राहिली, तर एवढी चर्चा होते, वा मोठे काम होत आहे, मोठा विकास होत आहे, मोठी प्रगती होत आहे. कारण गेल्‍या 60 वर्षापर्यंत आपण याच निकषावरुन देशाच्या विकासाचे मूल्यमापन केले. मोजण्याची पट्टी हीच राहिली  आहे की, बँकेची एक शाखा उघडली, खूप वाहवा होते, जयजयकार होतो. मात्र माझ्या प्रिय देशबांधवांनो, बँकेचे खाते उघडणे, बँकेची शाखा उघडणे, कठीण काम नाही,  सरकारी तिजोरीतून ही कामे  होतात. मात्र 17 कोटी लोकांना बँकेच्या दारापर्यंत आणणे,  हे खूप मोठे कठीण काम असते. खूप परिश्रम लागतात. जीव ओतून काम करावे लागते, क्षणाक्षणाचा हिशोब मागावा लागतो. आणि टीम इंडियाचे माझे महत्त्वपूर्ण सहकारी असलेल्या बँक कर्मचाऱ्यांचे, बँकेचे हार्दिक अभिनंदन करतो, कारण त्यांनी बँकेला गरीबांसमोर आणून ठेवले आणि ही गोष्ट आगामी काळात खूप मोठा बदल घडवून आणणार आहे. जगभरात आर्थिक विचारधारांमध्ये एक विचारधारा, अशी आहे की आर्थिक समावेशकता ही नेहमीच चांगली असत नाही आणि त्यामुळे गरीबांचा बोजा व्यवस्थेवर पडतो.  मी या मताशी सहमत नाही. भारतासारख्या  देशात जर आपण विकासाचा पिरॅमिड पाहिला, तर  आपल्या लक्षात येईल की, पिरॅमिडच्या सर्वात  खाली जो पृष्ठभाग असतो, तो सर्वात रुंद असतो. जर तो मजबूत असेल, तर विकासाचे संपूर्ण पिरॅमिड मजबूत असेल. आज विकासाच्या पिरॅमिडमध्ये  आपल्या देशाची दलित, शोषित, पीडित, वंचित, उपेक्षित व्यक्ती त्या तळाशी बसलेली आहे. आपल्याला विकासाच्या पिरॅमिडचा हा पाया मजबूत करायचा आहे, कारण आर्थिक समावेशकतेच्या माध्यमातून  जर तो मजबूत असेल तर विकासाचे पिरॅमिड कधी हलणार नाही. कितीही  वादळे आली तरीही त्यावर आपत्ती येणार नाही आणि विकासाचे हे पिरॅमिड आर्थिक भक्कम पायावर उभे राहिले की त्याची क्रय शक्ती खूप वाढेल आणि जेव्हा समाजाच्या शेवटच्या घटकाची क्रयशक्ती वाढते,  तेव्हा या अर्थव्यवस्थेला पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकणार  नाही. ती खूप  जलद गतीने देशाच्या विकासाला नव्या उंचीपर्यंत घेऊन जाते आणि म्हणूनच आमचा हा प्रयत्न आहे की आपण त्यावर भर दयावा आपण सामाजिक  सुरक्षेवर भर दिला आहे. गरीबांच्या कल्याणावर भर दिला  आहे.

              प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, अटल पेन्शन योजना आणि जीवन ज्योती योजना, आपल्या देशात कोटयावधी लोक आहेत, ज्यांच्याकडे विमा सुरक्षा कवच नाही. विम्याचा लाभ देशातल्या निम्न मध्यम वर्गापर्यंतही पोहोचलेला नाही, गरीबांची तर गोष्टच सोडा. आम्ही योजना तयार केली, एक महिन्यासाठी एक रुपया, जास्त नाही एक महिन्यासाठी एक रुपया 12 महिन्यांचे  12 रुपये आणि तुम्ही प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेत सहभागी होऊ शकता. आपल्या कुटुंबावर एखादे संकट आले तर  आपल्या कुटुंबाला दोन लाख रुपये मिळतील. आम्ही प्रधानमंत्री  जीवन ज्योती विमा योजना  आणली. एका दिवसासाठी 90 पैसे, एक रुपयापेक्षाही कमी, वर्षभरासाठी 330 रुपये आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आरोग्यासाठी आपल्या परिवाराच्या सुरक्षिततेसाठी दोन लाख रुपयांचा विमा रोज 90 पैसे भरल्यावर  आम्ही दिला.

              माझ्या बंधू-भगिनींनो, भूतकाळात योजना तर तयार करण्यात आल्या, असे कोणते सरकार असेल, जे योजना बनवत नसेल. प्रत्येकजण बनवतो. कोणते सरकार असेल, ज्यांनी घोषणा केल्या नसतील, प्रत्येकजण करतो. कोणते सरकार आहे, ज्यांनी उद्‌घाटन करताना दीप प्रज्वलन केले नसेल, फीत कापली नसेल, सर्वजण करतात. मात्र परीक्षा या गोष्टीची असते की आपण जे बोलतो, ते पूर्ण करतो की नाही? आम्ही एका नव्या कार्यसंस्कृतीवर भर दिला आहे आणि बंधू-भगिनींनो, आपल्या देशाच्या अनेक योजना, ज्या 40 वर्षे जुन्या आहेत, 50 वर्षे जुन्या आहेत, त्या 5 कोटी, 7 कोटी लोकांपेक्षा पुढे पोहोचू शकत नाहीत. या योजनेला आता तर 100 दिवस पूर्ण झाले आहेत, 100 दिवस. 100 दिवसांत 10 कोटी नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे, 10 कोटी नागरिकांनी. आपल्या देशात हे 10 कोटी नागरिक म्हणजे 10 कोटी कुटुंबे आहेत. याचाच अर्थ हा कि देशभरात जी 30-35 कोटी कुटुंबे आहेत, त्यापैकी 10 कोटी कुटुंबे 100 दिवसांत या योजनेत सहभागी झाली.

 

              माझ्या बंधू-भगिनींनो, आमच्या सरकारचे, टीम इंडियाचे, गेल्या वर्षभरातील जे वैशिष्ट्य आहे, टीम इंडियाचा जो पराक्रम आहे, त्या सव्वाशे कोटी बांधवांची टीम इंडिया आहे. त्यांनी ठराविक मुदतीत निर्धारित कामे पूर्ण करण्याचे सर्वात मोठे काम केले आहे. मी गेल्या वेळी लाल किल्ल्यावरुन शौचालयाबद्दल बोललो होतो, स्वच्छतेबद्दल बोललो होतो. देशासाठी पहिले एक-दोन तास ही आश्चर्याची बाब होती, की कसे पंतप्रधान आहेत. जे लाल किल्ल्यावरुन शौचालय बनवण्यासाठी वेळ फुकट घालवत आहेत. मात्र आज संपूर्ण देशभरात जितकी सर्वेक्षण होतात, त्यातील प्रत्येक सर्वेक्षणात एक गोष्ट प्रामुख्याने समोर आली आहे, ती ही कि या टीम इंडियाची सर्वात महत्त्वपूर्ण आणि जनतेला भिडणारी कोणती गोष्ट असेल तर ती आहे स्वच्छता अभियान.

              माझ्या बंधू-भगिनींनो, स्वच्छतेच्या अभियानाला प्रोत्साहन देण्यासाठी आम्ही समाजातील लोकांना आवाहन करत होतो, 9 जणांची नावे निश्चित केली, एक टप्पा पार पडला. मात्र आज या टीम इंडियाचे मला अभिनंदन करायचे आहे, मग ते सेलिब्रिटी असोत किंवा राजकारणी असोत, किंवा समाजसेवक असोत, शिक्षणतज्ञ असोत, धार्मिक जीवनाशी संबंधित, आध्यात्मिक जीवनाशी निगडीत मोठी माणसे असतील, आमच्या प्रसारमाध्यमातील मित्रमंडळी असतील, सर्वांनी कुणावरही टीका न करता, वाईट गोष्टी न शोधता, जनसामान्यांना प्रशिक्षित करण्याचा मोठा विडा उचलला आहे. ज्यांनी हे काम केले आहे, त्या सर्वांचे मी हार्दिक अभिनंदन करतो. मात्र एक गोष्ट मला सांगायची आहे कि स्वच्छ भारत अभियानाला हे सर्वात मोठे पाठबळ कुठून मिळते? त्याचे सर्वात मोठे राजदूत कोण आहेत? तुमचे लक्ष गेले नसेल पण तुम्ही आठवा, तुमच्या कुटुंबात काय घडले होते. भारतात अशी कोट्यावधी कुटुंबे आहेत, ज्यांच्या कुटुंबांमध्ये 5 वर्षांची, 10 वर्षांची, 15 वर्षांची मुले या स्वच्छ भारत अभियानाचे सर्वात मोठे सदिच्छा दूत बनले आहेत. घरात कोणी कचरा इथे-तिथे फेकते, तेव्हा ही मुलं आई-वडिलांना रोखतात, कि कचरा फेकू नका, घाण करू नका. एखाद्या पित्याला गुटखा खायची सवय असेल आणि जेव्हा तो गाडीची काच खाली करतो तेव्हा मुलगा त्यांना अडवतो आणि म्हणतो बाबा, बाहेर थुंकू नका. भारत स्वच्छ रहायला हवा. हे कार्यक्रमाचे यश त्या लहान-लहान मुलांमुळे आहे. मी माझ्या देशाच्या भविष्यासाठी, त्या बालकांसाठी नतमस्तक होऊ इच्छितो. नतमस्तक होऊन प्रणाम करू इच्छितो. जी गोष्ट समजण्यासाठी मोठ्या माणसांना वेळ लागतो, ती गोष्ट भोळ्याभाबड्या निष्पाप मुलांनी पटकन आत्मसात केली आणि मला विश्वास आहे, ज्या देशाचा बालक इतका सजग आहे, स्वच्छतेसाठी वचनबध्द आहे, तो देश नक्की स्वच्छ होईल. अस्वच्छतेबद्दल नक्कीच तिरस्कार निर्माण होईल.

              2019 साली आपण महात्मा गांधींची 150 वी जयंती साजरी करणार आहोत आणि महात्मा गांधींच्या 150 व्या जयंतीदिनी आपण त्यांना स्वच्छ भारत अर्पण करणार आहोत. महात्मा गांधी यांना 150 व्या जयंतीदिनी यापेक्षा मोठी कोणतीही श्रद्धांजली असू शकत नाही आणि म्हणूनच आता तर काम सुरू झाले आहे, मात्र मला ते पुढे न्यायचे आहे. ते थांबवायचे नाही, समाधान मानायचे नाही. मी प्रयोग म्हणून टीम इंडिया हे करू शकते की नाही? हे तपासण्यासाठी, मी इथून कार्यक्रमाची घोषणा केली. कुणाशी सल्ला-मसलत करून घोषणा केली नव्हती. जिल्ह्यांकडून, गावांकडून माहिती घेऊन घोषणा केली नव्हती. माझ्या मनात आले आणि मी बोलून टाकले की पुढल्या 15 ऑगस्टपर्यंत आपल्या शाळांमध्ये मुले आणि मुलींसाठी वेगवेगळी शौचालये बांधण्यात येतील आणि नंतर जेव्हा आम्ही काम सुरू केले, टीम इंडियाने आपली जबाबदारी ओळखली, लक्षात आले की या देशात 2 लाख 62 हजार शाळा अशा आहेत, ज्यात सव्वाचार लाखांहून अधिक शौचालये बांधावी लागणार होती. हा आकडा इतका मोठा होता की कोणत्याही सरकारने विचार केला असता की, नाही साहेब! यासाठी वेळ वाढवून द्या. मात्र टीम इंडियाचा संकल्प पाहा, कुणीही वेळ वाढवून देण्याची मागणी केली नाही आणि आज 15 ऑगस्ट रोजी मी त्या टीम इंडियाचे अभिनंदन करतो कि त्यांनी भारताच्या तिरंगी झेंड्याचा मान राखत हे स्वप्न पूर्ण करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आणि जवळपास सर्व शौचालये बांधण्याच्या कामात टीम इंडियाने यश मिळवले.

मी यासाठी राज्य सरकारांचे अभिनंदन करतो, जिल्हा कार्यालयात बसलेल्या सरकारी अधिकाऱ्यांचे अभिनंदन करतो, शिक्षण संस्थांमध्ये बसलेले धोरणकर्ते असोत किंवा संचालक असोत, या सर्वांचे अभिनंदन करतो. मुद्दा सव्वा चार लाख शौचालये बांधण्याचा नाही. जे निराशेचे वातावरण आहे, काही होऊ शकत नाही, कसे होणार, कसे करणार, हे जे वातावरण आहे, त्यासाठी हा मुद्दा आत्मविश्वास निर्माण करू शकतो. आम्ही सुध्दा काही कमी नाही, टीम इंडिया मागे हटणार नाही, टीम इंडिया यश मिळवेल हा संकेत यातून मिळतो आहे आणि म्हणून आत्मविश्वासाच्या भरवशाने देश चालतो. देश चालतो तो नवीन संकल्प पूर्ण करून, नवीन नवीन स्वप्ने पाहून. आपण कुठेही थांबू शकत नाही, आपल्याला सतत पुढे जायचे आहे आणि म्हणूनच बंधू-भगिनींनो, आपल्या देशातल्या मजुरांसाठी आम्ही योजना तयार केली ‘श्रमेव जयते’. भारताच्या गरीब मजुराकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन खचितच शोभादायी नाही. कोट, पॅन्ट, टाय लावलेली व्यक्ती किंवा लांब कुर्ता, जाकिटवाली व्यक्ती भेटली तर आपण उभे राहून त्याला अभिवादन करतो. पण कोणी ऑटोरिक्षावाला, सायकल रिक्षावाला, पेपरवाला, दूधवाला आला तर या गरीबांकडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन योग्य नसतो. सव्वाशे कोटी देशवासियांनी संकल्प करून देशाचे हे न्यून दूर करायचे आहे. ज्यांच्यामुळे आपण चांगले राहू शकतो, ज्यांच्यामुळे आपले काम चांगले होते त्यांच्यापेक्षा आपला कोणी मोठा हितचिंतक नसतो आणि म्हणूनच डिग्नीटी ऑफ लेबर, श्रमिकांचा सन्मान, श्रमिकांचा गौरव हे आपले राष्ट्रीय कर्तव्य ठरायला हवे, आणि तोच राष्ट्र स्वभाव बनायला हवा. ही जनतेची वृत्ती आणि प्रवृत्तीही बनायला हवी. गेल्या काही दिवसात काही योजनांअंतर्गत असंघटित कामगारांसाठी विशेष ओळखपत्र द्यायला आम्ही सुरुवात केली आहे. या ओळखपत्राद्वारे त्याला काही सुरक्षा योजनांचा लाभ मिळणार आहे. या असंघटित मजुरांकडे कोणी लक्ष देत नव्हते.  आपल्या देशाच्या मजुरांनी आपल्या मेहनतीने सरकारच्या तिजोरीत आपला हिस्सा जमा केला. हळूहळू ही रक्कम 27 हजार कोटी रुपयांपर्यंत पोहोचली. पण तो गरीब मजूर 6-8 महिने नोकरी करून दुसऱ्या कुठेतरी जातो. दोन वर्षानंतर आणखी कुठे जातो. जिथे पैसे कापले जातात त्याचा हिशोब राहत नाही. हाती पैसाही जास्त नसल्याने 200 रुपये गाडीभाड्यावर खर्च करून परत जाऊन पैसे घेऊन यायालाही मन राजी नसते आणि यामुळे देशातल्या गरिबांचे, देशाच्या मजुरांची, त्यांच्या घामाचे, अशी 27 हजार कोटी रुपयांची कमाई सरकारी तिजोरीत पडून राहिली आहे. यावर आम्ही उपाय शोधला, मजुरांना, श्रमिकांना आम्ही विशेष ओळखपत्र क्रमांक दिला आणि त्यांना सांगितले की आता आपली बदली कुठेही होऊ दे, एक नोकरी सोडून आपण दुसऱ्या कुठेही जा, एक कारखाना सोडून दुसऱ्या कारखान्यात जा, एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जा हा क्रमांक आपल्याबरोबर राहील आणि तो पैसाही आपल्याबरोबरच येत राहील. आपला एक रुपयाही कोणी हडपणार नाही. 27 हजार कोटी रुपये गरीबांना परत करण्याच्या दृष्टीनेही आम्ही प्रयत्न केले.

              आपल्या देशात एक नवी फॅशन आली आहे. प्रत्येक गोष्टीत कायदे करत रहा, कायदे करत रहा आणि आपल्या न्यायालयांना गुंतवून ठेवा.  एकाच विषयावरच्या दोन कायद्यात मतांतरे असतात. गोंधळ निर्माण करणे हेच काम आपल्याकडे चालत राहिले. गुड गव्हर्नन्स अर्थात सुप्रशासनासाठी ही चांगली गोष्ट नाही आणि म्हणूनच कायदा स्पष्ट हवा, तो कालबाह्य नसावा तरच समाजाला गती प्राप्त होते. आपल्या मजुरांसाठी विविध प्रकारच्या 44 कायद्यांचा डोंगर आहे यातून बिचारा मजूर आपल्या हिताची गोष्ट कुठे शोधेल. आम्ही यात बदल घडवला, 44 कायद्यांना चार आचारसंहितेत सामावून घेत, गरीबातला गरीब, अगदी अडाणी मजूरही आपल्या हिताची गोष्ट शोधू शकेल या योजनेवर आम्ही भर दिला आहे.

बंधू-भगिनीनो, आपल्या देशात भ्रष्टाचाराविषयी खूप गप्पा होतात. आपण पाहिलेत की काही आजारी व्यक्तींनादेखील दुसऱ्याने तंदुरुस्त कसे राहावे यावर सल्ला द्यायची सवय असते. स्वत: स्वत:ला सांभाळू शकत नाही परंतु प्रत्येक माणसाचा स्वभाव असतो. तुम्ही हे कराल तर बरे व्हाल ते कराल तर बरे व्हाल. भ्रष्टाचाराचे पण असेच आहे. जे यामध्ये गुंतले बरबटलेले आहेत ते ही सल्ले देतात, जो त्यामुळे त्रासलेला आहे तोही सल्ला देतो व एक प्रकारे एकमेकांना सल्ला देण्याचे काम असेच चालू राहते.

              बंधू - भगिनींनो, मी ही घोषणा कधीच केली नाही. परंतु, आज हिशेब मांडू इच्छितो. मी देशातील नागरिकांना विश्वास देऊ इच्छितो, मी सव्वाशे कोटी भारतीयांच्या टीम इंडियाला सांगू इच्छितो, की देश भ्रष्टाचार मुक्त होऊ शकतो. अनुभवाच्या आधारावर मी हे सांगतो आहे की याला वरून सुरुवात केली पाहिजे.

              सोबतच भ्रष्टाचार आमच्या देशाला लागलेल्या वाळवी प्रमाणे आहे. वाळवी ज्याप्रमाणे पसरते, पहिल्यांदा दिसतही नाही. परंतु जेव्हा बेडरूम पर्यंत येऊन ठेपते, कपडे ठेवलेल्या कपाटापर्यंत येते तेव्हा समजते. या वाळवीपासून मुक्ती मिळवायची असेल तर प्रत्येक चौरस फुट जागेवर औषधाचे इंजेक्शन द्यावे लागते. एका ठिकाणी इंजेक्शन देऊन उपयोग होत नाही. वाळवी जर संपवायची असेल तर प्रत्येक चौरस फूट जागेवर प्रत्येक महिन्याला इंजेक्शन द्यावे लागते तेव्हा अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर वाळवीपासून कायमची मुक्ती मिळते. इतक्या मोठ्या देशात भ्रष्टाचाराच्या वाळवीपासून मुक्ती मिळवायची असेल तर अनेक प्रकारच्या कोटी कोटी प्रयत्नांची आवश्यकता आहे. हे करता येऊ शकते.

              कधी कधी मी जर असे म्हणेन की मी एलपीजी गॅस अनुदानात १५ हजार कोटी रुपये कपात करत आहे तर मी दाव्यानिशी सांगू शकतो की या देशात या सरकारची वाहवा करणारे शेकडो लेख लिहिले गेले असते की मोदीमध्ये खूप दम आहे की ज्यांनी १५ हजार कोटी रुपये गॅस अनुदान बंद केले. हाच माणूस असे कठोर निर्णय घेऊ शकतो जर ते नाही केले तर काहीच होत नाही, काहीच दिसत नाही. कधी कधी अनेक लोकांना निराशेच्या गर्तेत जायचा छंद असतो. जर त्यांनी चार लोकांशी निराशेच्या गप्पा नाही मारल्या तर त्यांना रात्री झोप येत नाही. त्यांना हे एक प्रकारचे व्यसन असते. काही आजारी लोकांना त्यांच्या आजाराविषयी विचारले असता आवडत नाही, त्यांच्या आजाराविषयी लोकांना कळेल हे त्यांना आवडत नाही परंतु काही असे असतात की ते वाट बघत असतात हा आला नाही, तो आला नाही विचारायला, मग त्याच्यासोबत तासनतास आजाराचे वर्णन करणार, असे झाले तसे झाले. मी बघत आहे काही लोक निराशेचे कारण शोधताना दिसतात. जितकी जास्त निराशा पसरेल तितकी जास्त त्यांना गाढ झोप लागेल. अशा लोकांसाठी ना योजना असतात ना कृती कार्यक्रम असतात, सव्वाशे कोटी लोकांची ही आपली टीम इंडिया अशा लोकांमध्ये वेळ गुंतवायला तयार नाही. परंतु होते कसे, एलपीजी अनुदान आम्ही थेट लाभ हस्तांतरण योजना आणली, जन धन खात्याचा फायदा घेतला, आधार कार्डचा फायदा घेतला, व ग्राहकांच्या खात्यात थेट अनुदान पोहोचविले. या कारणाने जे मधले दलाल होते त्यांचे दुकान बंद झाले. मध्यस्थांचे दुकान बंद झाले. जे काळाबाजार करत होते त्यांचे दुकान बंद झाले, योग्य व्यक्तीपर्यंत योग्य लाभ पोहोचविण्यात आला. कुणाचा एक रुपयाही कापला नाही. खूप वाहवा व्हावी अशा या घोषणा नाही, व्यवस्थेत सुधारणा आणल्या  ,  मी आज सव्वाशे कोटी भारतीयांच्या टीम इंडियाला सांगू इच्छितो की प्रती वर्षी १५ हजार कोटी रुपये जे गॅस अनुदानासाठी चोरी होत होते ते बंद झाले. भ्रष्टाचार बंद झाला, माझ्या देश बांधवांनो. वाटले होते काम कसे होत असेल, माझ्या बंधू भगिनींनो, १५ हजार कोटी रुपये देशासाठी सामान्य गोष्ट नव्हती. आम्ही करून दाखविले.आम्ही संकेतस्थळ बनविले त्याच्यावर विक्रेत्यांचे फलक लावले. एवढे करूनही जर कुणाला काही तक्रार असेल तर अर्ध्या रात्री त्याला गॅस सिलेंडर मिळेल, परंतु देशाला लुबाडणाऱ्या लोकांना परवानगी दिली जाणार नाही. गरिबांचे पैसे लुबाडणाऱ्या लोकांना परवानगी नाही. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईचे हे काम आहे की नाही? माझ्या बंधू भगिनींनो, मी नागरिकांना एक विनंती केली होती, की आपण जर आर्थिक दृष्ट्या संपन्न असाल तर आपण एलपीजी अनुदान का घेता? या ५००-७०० रुपयांची आपल्याला काय गरज आहे? ५००-७०० रुपये तर आपण रोजच्या चहापानावर खर्च करणारे लोक आहात मी आता ही गोष्ट सुरु केली आहे, अभियान नाही सुरु केले कारण टीम इंडिया वर माझा पूर्ण विश्वास आहे. जेव्हा ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचेल, परिणाम लगेच दिसून येईल. मी आज अभिमानाने सांगतो की, एलपीजी सिलेंडर अनुदान  ‘गिव्ह इट अप’ हे अभियान चालविले गेले व आतापर्यंत २० लाख लोकांनी अनुदान सोडले. हा आकडा कमी नाही.  हा छोटा आकडा नाही. आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी रांगेत जरी उभे राहिलो तरी वाटते की आपल्या लहान भावासाठी प्रसाद घेऊन जावा. हा आमचा स्वभाव आहे. हे २० लाख कुणी श्रीमंत लोक नाहीत सामान्य मध्यम वर्गातील लोक आहेत. कुणी शिक्षक आहे. पेन्शन वर उदरनिर्वाह आहे परंतु त्याने ऐकले जर हे सिलेंडर कुणा गरीब कुटुंबांना जाणार आहेत तर त्याने आपल्या अनुदानाचा त्याग केला. माझ्या बंधू भगिनींनो, जेव्हा गरिबांच्या कल्याणासाठी हे २० लाख गॅस सिलेंडर त्या गरीब कुटुंबात पोहचतील , जिथले स्वयंपाक घर धुराने भरलेले असायचे  ,  मला सांगा त्या आईला किती सुख मिळेल जिची छोटी छोटी मुले धुराने रडत असायची त्यांना किती सुख मिळेल. काम योग्य दिशेत केल्यावर परिणाम मिळतात. बंधू भगिनींनो मी जर कोळशाचा विषय काढला तर काही राजकीय पंडित त्याला राजकारणाच्या तराजूत तोलतील. ही जागा त्या कामासाठी नव्हे. त्यामुळे मी सर्व राजकीय पंडितांना प्रार्थना करतो की ज्या कोळशाची मी चर्चा करत आहे. त्याला राजकारणाच्या तराजूत कृपा करून तोलू नका. हा राष्ट्राच्या संकल्प शक्तीने केलेला पाठपुरावा आहे. जेव्हा कॅगने सांगितले की, कोळशाच्या खाणीची परवानगी दिल्यामुळे १ लाख ७६ हजार कोटींचे नुकसान झाले. आम्ही निवडणुकांदरम्यान बोललो होतो, परंतु मनात वाटत होते की इतके नुकसान नसेल झाले. बोलत तर होतो परंतु माझ्या बंधू भगिनींनो, आम्ही विशिष्ट वेळेत ठरवले की कोळसा असो, स्पेक्ट्रम असो वा अजून कुठली नैसर्गिक साधन संपत्ती असेल तर त्याचा लिलाव व्हावा  ,  माझ्या प्रिय देशवासियांनो, टीम इंडियाचा पराक्रम बघा, सव्वाशे कोटी लोकांचा संकल्प बघा, वेळेत कोळशाचा लिलाव झाला व जवळ जवळ ३ लाख कोटी रुपये सरकारच्या तिजोरीत येतील. बंधू भगिनींनो, आपल्या मनाला विचारा , भ्रष्टाचार गेला की नाही? दलालांचे राज्य गेले की नाही? हिंदुस्तानची संपत्ती लुटणाऱ्या लोकांना दरवाजे बंद झालेत की नाही? मी भाषण दिले नाही करून दाखविले.    

स्पेक्ट्रम मध्येही तेच झाले. आता एफएम रेडीओचा लिलाव सुरु आहे. मोठमोठे लोक चिंतेत आहे. माझ्यावर खूप दबाव टाकण्यात आला. सर्व प्रकारे माझे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न झाला की मोदिजी एफ एम तर सामान्य व्यक्तींच्या उपयोगात येते काही कमाई होत नाही. तुम्ही एफएम रेडीओचा लिलाव का करताहेत? खूप दबाव टाकला गेला. परंतु मी म्हटले की सव्वाशे कोटी भारतीय लोकांना पारदर्शकता हवी आहे. पारदर्शकता हवी आहे म्हणून एफएम रेडीओसाठी जवळ जवळ ८0-८५ शहरांसाठी लिलाव सुरु आहे. परवा मी जेव्हा विचारले तेव्हा लिलाव हजारो करोड रुपयांहूनही वर गेला होता. हा पैसा गरिबांच्या उपयोगात येईल. बंधू भगिनींनो, देश ठेकेदारांनी कसा चालविला होता. कशा प्रकारे लूट नीती वापरून प्रभाव टाकला गेला. आमच्या देशात कसा कारभार केला गेला. परदेशातून जो कोळसा आयात होतो, तो कोळसा समुद्री किनाऱ्यावरील वीज प्रकल्पांमध्ये पाठविला जात नाही. जिथे कोळशाच्या खाणी आहे त्याच्या आसपासच्या परिसरात हा कोळसा पाठविला जातो. कोळशाच्या खाणीमधला कोळसा समुद्र किनाऱ्यावरील प्रकल्पांसाठी दिला जातो. या देशातील छोट्या मुलालाही कळेल की जिथला माल तिथे वापरला पाहिजे इथला माल तिथे व तिथला इथे वापरण्यात काही अर्थ नाही. बंधू भगिनींनो, आम्ही हा निर्णय बदलला. कारखान्याच्या जवळ जे आहे त्याचा लाभ पहिल्यांदा त्या कारखान्याला मिळाला पाहिजे. मी सांगू इच्छितो, की या निर्णयामुळे दलालांची दुकाने बंद झाली व सरकारच्या तिजोरीत ११०० कोटी रुपये जमा झाले. माझ्या बंधू भगिनींनो, हे आता प्रत्येक वर्षी होईल.

भ्रष्टाचार एक प्रकारे व्यवस्थेचा भाग बनला आहे. जोपर्यंत त्याचे उच्चाटन केले जात नाही, बंधू भगिनींनो, मी आज तिरंग्याच्या साक्षीने बोलत आहे, लाल किल्ल्यावरुन बोलत आहे  ,  सव्वाशे कोटी भारतीयांची स्वप्ने जाणून बोलत आहे, १५ महिने होऊन गेले, आपल्या दिल्लीतील सरकारवर एका नव्‍या पैशाच्या भ्रष्टाचाराचा आरोप नाही. देशवासियांनो, आपण मला ज्या कामासाठी येथे बसविले आहे ते काम करताना मी सर्व त्रास सहन करत राहीन, प्रत्येक अडथळ्यांना झेलत राहीन, परंतु आपले आशीर्वाद घेऊन भ्रष्टाचार मुक्त भारताचे स्वप्न साकार करून दाखविन. आपल्याला हे सांगायला मी आलो आहे. परंतु मी म्हटले ही वाळवी आहे. फक्त दिल्ली सरकारमधून भ्रष्टाचार जाऊन हे साध्य होणार नाही. सध्या छोट्या छोट्या ठिकाणी लोकांना त्रास होत आहे. गरीब लोक त्यामुळे त्रासले आहेत. यासाठी, आम्हाला राष्ट्रीय चेतना जागविण्याची गरज आहे. आम्ही भ्रष्टाचाराचे हे रुप जाणून प्रत्येकाची यातून सुटका करण्यासाठी एकत्र जोडणार आहोत. तेव्हा आम्ही हा कलंक मिटवू शकतो.

बंधू - भगिनींनो,  मला असेही म्हणायचे आहे, काळा पैसा... काळ्या पैशाबाबत इतक्या कमी वेळात आम्ही एका पाठोपाठ एक अत्यंत महत्वपूर्ण पावले उचलली.  सरकार बनविल्यानंतर पहिल्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक तयार केले. तीन वर्षांपासून अडकलेले काम आम्ही पहिल्याच आठवड्यात पूर्ण केले. ते विशेष शोध पथक आज काम करत आहे. मी जी-२० परिषदेमध्ये गेलो, जगातील ते देश तिथे उपस्थित होते, ज्यांच्या मदतीने काळा पैसा परत येऊ शकतो. जी-२० परिषदेत भारताच्या आग्रहाखातर काळ्या पैशाबाबत प्रस्ताव मांडण्यात आला व काळा पैसा देशांना परत देण्यासाठी प्रत्येक देश एकमेकांना मदत करेल, असा संकल्प केला गेला.

 

अमेरिकेसोबत  FATCA  चा कायदा करून आम्ही नाते जोडले. आम्ही जगातील त्या देशांसोबत अशाप्रकारे करार केले आहेत, ज्यामुळे ते देश, आपल्याकडे असा कोणा भारतीय नागरिकाचा काळा पैसा असेल, तर त्याची माहिती आम्हाला तत्काळ देत राहतील. एकामागोमाग पावले उचलत राहिलो.  

 

बंधू-भगिनींनो, आम्ही एक कठोर कायदा मंजूर केला. आता कायदा मंजूर झाला, तर दर आठवड्याला कोणी न कोणी आमच्या सरकारशी संपर्क करतो आणि सांगतो तुमच्या सरकारने फार कठोर कायदा बनविला, कोणी म्हणतो की असा काळा कायदा बनवून टाकला. यामुळे अधिकाऱ्यांचा अत्याचार वाढेल. बंधू-भगिनींनो कधीकधी रोग जेव्हा बळावतो तेव्हा अशा इंजेक्शनची गरज पडते आणि जेव्हा हे इंजेक्शन घेतो, तेव्हा डॉक्टर देखील म्हणतात की दुष्परिणाम होतील पण हा रोग इतका भयंकर आहे की दुष्परिणाम सोसल्यानंतरही याच औषधाने मुक्ती मिळते.

 

मी हे जाणतो, हा काळ्या पैशांचा आम्ही जो कायदा बनविला आहे, त्यामुळे खूप लोक चिंतीत आहेत, खूप लोकांना संकट दिसत आहे. काळ्या पैशाची तीव्रता थोडी कमी व्हावी, थोडी नियमात ढील यावी, यासाठी आमच्यापर्यंत संदेश पोहचवले जात आहेत.

 

मी या टीम इंडिया, सव्वाशे कोटी देशवासीयांना आज सांगू इच्छितो, त्या दुष्परिणामांसोबतही काळ्या पैशाविरोधात कठोरतेने काम करण्याच्या दिशेने आम्ही पुढे गेलो आणि जात राहू आणि इतके झाले आहे की काळा पैसा परत आणण्याची लांबलचक प्रक्रिया सुरु आहे, पण इतके तर झाले आहे की आता कोणी काळा पैसा बाहेर पाठविण्याची हिंमत करत नाही.

 

हा फायदा तर झालाच झाला. कोणी मानो अथवा न मानो. एवढेच नाही, आता काही दिवसात जेव्हा हा वेळ दिला आहे की तुम्ही तुमचा काळा पैसा जाहीर करू शकता. मी आज सांगू शकतो जवळपास 65शे कोटी रुपये, अघोषित संपत्ती, लोकांनी स्वत:हून जाहीर करण्यास सुरुवात केली आहे.

 

हा पैसा भारताच्या तिजोरीत येईल. भारतातील गरीब माणसाच्या कामी येईल आणि बंधूभगिनींनो तुम्हाला जो विश्वास मी दिला आहे, तो पूर्ण करण्यासाठी संकल्पासह पुढे जात राहू.

              बंधू-भगिनींनो,  आमचे सरकार येण्यापूर्वी सीबीआयकडून एका वर्षात भ्रष्टाचाराची केवळ ८०० प्रकरणे दाखल झाली होती. ८००... बंधूभगिनींनो आम्ही सत्तेत आल्यानंतर, आम्ही तर नवीन आहोत... आतापर्यंत अठराशे प्रकरणे आम्ही दाखल केली आहेत आणि अधिकाऱ्यांविरुद्ध आम्ही कारवाई सुरु केली आहे.

सरकारने नोकरदारांविरुद्ध कारवाई सुरु केली आहे. तुम्ही कल्पना करू शकता आम्ही येण्यापूर्वी एका वर्षात ८०० आणि आम्ही आल्यानंतर १० महिन्यात १८००, हे सांगते की भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचा आमचा हेतू कसा आहे. या भ्रष्टाचाराविरोधात लढण्याची आमची कटिबद्धता दाखवते, पत्रकार परिषद घेऊन आम्ही नाही याची जाणीव करून दिली... आम्ही प्रत्यक्ष पावले उचलून जाणीव करून दिली आहे आणि आम्ही परिणाम पाहिले.

              आम्ही व्यवस्थांना बदलण्याचा प्रयत्न केला आहे, मनरेगा, जन-धन खात्यात थेट पैसा कसा जाईल, मुलांच्या शिष्यवृत्तीचा पैसा थेट बँक खात्यात कसा जाईल, कमीत कमी दलाली कशी होईल, त्या दिशेने आम्ही कामाचा आरंभ केला आहे आणि मला विश्वास आहे की या कामांमुळे देश, या गोष्टी पूर्ण करू शकेल. 

              माझ्या शेतकरी बंधू-भगिनींनो,  गेल्या वर्षी पावसाचे संकट आले होते, जितक्या प्रमाणात पाऊस पडायला हवा तितका तो पडला नाही, देशाच्या अर्थकारणाचे देखील नुकसान झाले होते आणि शेतकऱ्यांचेही नुकसान झाले होते. तरीही महागाई कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो.

              हे मान्य करावे लागेल की आम्ही येण्याआधी महागाई दोन अंकी होती, दोन अंकात चालत होती. आम्ही आल्यानंतर एका नंतर एक अशा प्रयत्नाने पाऊस कमी असूनही, शेतकरी चिंतीत झाला, तरीदेखील, महागाईला दोन अंकांवरून खाली आणता आणता, जवळपास ३-४ टक्क्यापर्यंत कमी करण्यात आम्ही यशस्वी झालो. महागाईला आणखी खाली आणण्याचा आमचा प्रयत्न सुरु राहील, कारण गरीबातील गरीबाच्या ताटात समाधानकारक अन्न मिळायला हवे, या स्वप्नांना घेऊन आम्ही मार्गक्रमण करत आहोत.

              आपल्या देशातील कृषी पद्धतीत फार मोठ्या सुधारणांची आवश्यकता आहे. जमीन कमी होत चालली आहे, पारिवारिक सदस्यांमध्ये जमिनीची वाटणी होत आहे, जमिनीचे छोटे-छोटे तुकडे होत आहेत. जमिनींची उत्पादनक्षमता वाढवली पाहिजे, उत्पादकता वाढवली पाहिजे, शेतकऱ्याला पाणी पाहिजे, वीज पाहिजे. या स्वप्नपूर्तीसाठी आम्ही मेहनत घेत आहोत. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी पन्नास हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे, शेतीला पाणी मिळेल अशी व्यवस्था करुन पाणी बचतही करावी लागेल. मी पाणी बचत, ऊर्जा बचत, खते बचत करेन हा मंत्र घेऊनच आपल्याला कृषी जीवनात चळवळ उभी करावयाची आहे व यासाठी, या कामाला पुढे  नेण्यासाठी प्रत्येक थेंबाला अधिक पीक (पर ड्रॉप मोअर क्रॉप) आणि यशस्वी शेतकरी या कामाला पुढे नेण्यासाठी, हा निधी खर्च करण्यासाठी पुढे सरसावला आहे. काही दिवसांपूर्वी जेंव्हा गारपीटीने शेतकऱ्यांचे नुकसान झाले, त्यावेळी नुकसानभरपाईसाठी असणाऱ्या 50 टक्क्यांच्या निकषात आम्ही बदल केला.  60 वर्षात एवढी मोठी झेप कधीच घेतली गेली नाही, एवढेच नाही तर नुकसान झाल्यास ते 50 टक्क्यांच्या निकषात असल्यासच भरपाई मिळत होती, आम्ही 50 टक्क्यांचा निकष 30 टक्क्यांवर आणला. शेतकऱ्यांसाठी मदतीचे एवढे काम मागील 60 वर्षांत कधीच झाले नाही. शेतकऱ्यांना युरिया पाहिजे, आम्ही नीम कोटींग युरिया, मी पुन्हा एकदा सांगतो भ्रष्टाचाराच्या विरोधात कसा लढा उभारता येतो, नीम कोटींग हा काही माझ्या डोक्यातून आलेला विचार नाही, हा शास्त्रज्ञांनी सुचवलेला विचार आहे, आणि हा विचार माझ्या सरकारसमोरच आला असे नाही, पूर्वीच्या सरकारांसमोरही आला होता. आपल्या देशात शेतकऱ्यांच्या नावाने युरिया जातो, अब्जावधी रुपयांचा युरिया जातो, परंतु त्यापैकी 15 टक्के, 20 टक्के, 25 टक्के रासायनिक कारखान्यांना कच्च्या मालाच्या स्वरुपात जातो. नाव शेतकऱ्याचे पण दलालाच्या माध्यमातून चोरी होते. नीम कोटींग शंभर टक्के केल्याशिवाय ही चोरी रोखली जाणार नाही. आणि यासाठी आम्ही सरकारच्या तिजोरीवर बोजा पडला तरीही युरियाची 100 टक्के नीम कोटींग करण्याचे काम पूर्ण केले आहे. यामुळे आता युरिया शेतीशिवाय इतर कुठल्याही कामासाठी वापरला जाऊ शकत नाही. रासायनिक कारख्यान्यांना यातून काहीही काढून घेता येऊ शकत नाही. यामुळे शेतकऱ्यांना जेवढा पाहिजे तेवढा युरिया मिळेल, आणि नीम कोटींग असल्यामुळे त्याचे पोषणमुल्य जरी जमिनीत 10 टक्के कमी युरिया असला तरीही त्याचा लाभ मिळणार आहे.

              आगामी हंगामात माझ्या देशातील शेतकऱ्यांना युरियाचा आणखी नवा लाभ. मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो, चुकून जरी तुम्हाला नीम कोटींग नसलेला युरिया आढळला तर विरोध करा, कारण तो सरकारने अधिकृत केलेला नाही. कोणी तुम्हाला पिवळ्या रंगाची पावडर दिली, तर त्याला हात लावू नका.

              बंधू-भगिनींनो,  मी गेल्या काही दिवसांपासून सांगत आहे, जर भारताचा विकास साधावयाचा असेल तर पूर्व भारताच्या विकासाशिवाय हे शक्य नाही. भारताचा फक्त पश्चिम प्रदेश जर प्रगती करत राहिला तर भारत कधीच पुढे जाणार नाही. भारत तेंव्हाच प्रगतीपथावर जाईल, जेंव्हा आमचा पूर्व उत्तर प्रदेश सशक्त होईल, आमचा बिहार सशक्त होईल, आमचा पश्चिम-बंगाल सशक्त होईल, आमचा आसाम, आमचा ओडिशा, आमचा पूर्वोत्तर भाग, देशाचा हा भाग सशक्त झालाच पाहिजे. आणि यासाठी पायाभूत संरचनांचा विषय असो,  रेल्वेमार्गाच्या जाळ्याचा विषय असो, डिजीटल कनेक्टीविटीचा विषय असो आम्ही प्रत्येक गोष्टीत पूर्व भारतावर लक्ष केंद्रीत केले आहे. आम्ही पूर्व भारतात गॅस पाईपलाईन सुरू करत आहोत. कधीकाळी कोणी विचार तरी केला असेल का, ज्या राज्यांमध्ये स्वयंपाकगृहात नळाने पाणी यायची मारामार, तिथे गॅस पाईपलाईन पोहचवण्यासाठी आम्ही काम करत आहोत. युरिया निर्मितीचे चार कारखाने पूर्व भारतात बंद पडले होते, तेथील युवकांवर बेरोजगारीची वेळ आली होती, तेथील शेतकरी चिंतेत होता. आम्ही नवे युरिया धोरण निर्माण केले, आम्ही गॅस पाईपलाईनची योजना तयार केली, आणि त्याचा परिणाम असा दिसून येत आहे की, गोरखपूर, बरेली, तालचेर, सिंदरी, जे सर्व पूर्व भारताशी जोडलेले आहेत, यांच्या कारखान्यांचे पुनरुज्जीवन करुन तरुणांना रोजगार देता येईल, शेतकऱ्यांना खत देता येईल, त्या दिशेने आम्ही काम करत आहोत.

              बंधु-भगिनींनो,  देशातील सैन्यात सैनिकांच्या कल्याणासाठी एक विभाग आहे. मात्र, या देशात सैनिकाचे जेवढे महात्म्य आहे, तेवढेच महात्म्य शेतकऱ्याचे आहे. 60 वर्षात आम्ही काय केले, आम्ही कृषीच्या आर्थिक पैलूकडे लक्ष पुरवले. आपली शेती चांगली झाली पाहिजे, कृषीविकास झाला पाहिजे, आणि सरकारच्या मंत्रालयाचे नावही कृषी मंत्रालय असे होते.

              बंधू-भगिनींनो,  कृषी मंत्रालयाचे जेवढे महत्व आहे, तसेच वेळेची गरज आहे की शेतकऱ्यांच्या कल्याणाचेही महत्व आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाची याला जोड दिल्याशिवाय कृषी विकास हा मुद्दा, ग्रामीण जीवनासाठी, कृषी जीवनासाठी अपूर्ण आहे. शेतकऱ्यांच्या कल्याणाची जोड दिल्यानंतरच हा मुद्दा पूर्ण होईल. आणि म्हणून,  बंधु-भगिनिंनो, आतापर्यंत केंद्र सरकारचे जे मंत्रालय कृषी मंत्रालय म्हणून ओळखले जात होते, ते आता कृषी मंत्रालय व शेतकरी कल्याण मंत्रालय या नावाने ओळखले जाईल आणि आगामी काळात कृषीसाठी जशा योजना राबवल्या जातील, तशाच शेतकरी कल्याणासाठीही निर्माण करण्यात येतील, जेणेकरुन माझ्या शेतकऱ्याला वैयक्तिक आयुष्यात ज्या समस्यांना सामोरे जावे लागते, ज्या संकटांचा सामना करावा लागतो, त्यावर एक कायमस्वरुपी व्यवस्थेच्या रुपाने मदत करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात येतील.

              बंधू-भगिनींनो,  आगामी काळात एक बाब तुमच्या लक्षात आणून देवू इच्छितो,  स्वातंत्र्यानंतरच्या इतक्या काळातही आपल्या देशातील सुमारे 18 हजार 500 गावं अशी आहेत जेथे अजूनही विजेची तार पोहचली नाही, विजेचा खांब पोहचला नाही. स्वातंत्र्याचा सूर्य,  स्वातंत्र्याचा प्रकाश,  स्वातंत्र्याच्या विकासाच्या किरणांपासूनही 18 हजार 500 गावं वंचित आहेत. जुन्या पद्धतीने काम सुरू राहिले तर या 18 हजार 500 गावांमध्ये विजेचा खांब पोहचण्यासाठी, विजेची तार पोहचण्यासाठी 10 वर्षे लागतील. देश 10 वर्षे थांबण्यासाठी तयार नाही. मी सरकारी अधिकाऱ्यांची एक बैठक घेऊन विचारले, काय करता येईल, कोणी म्हणतो साहेब 2019 पर्यंत पूर्ण करु, कोणी म्हणतो 2022 पर्यंत पूर्ण करू. दाट अरण्ये आहे, अमक्या जागी आहे, पहाडांवर आहे, बर्फाळ प्रदेशात आहे, तेथे आम्ही कसे पोहचू  ? 

              सव्वाशे कोटी देशवासियांच्या टीम इंडियाचा संकल्प आहे की, या 18 हजार 500 गावांमध्ये 1000 दिवसांच्या आता विजेचा खांब, विजेची तार व वीज पोहचली पाहिजे, आणि मी राज्यांना आग्रह करतो की, त्यांनी हे करुन दाखवावे. सर्व राज्यांमध्ये ही परिस्थिती नाही, काही राज्यांमध्येच असे आहे.   मी राज्यांची नावे जाहीर केली तर याला राजकीय तराजूत मोजले जाईल, राजकीय खडाजंगी होईल व मला या गोष्टींमध्ये पडायचे नाही. म्हणून म्हणतो की, सव्वाशे कोटी देशवासियांची टीम इंडिया, लाल किल्ल्यावरुन हा संकल्प करत आहे की, राज्यांच्या सहकार्याने, स्थानिक घटकांच्या सहकार्याने आगामी 1000 दिवसात 18 हजार 500 गावांमध्ये वीज पोहचवण्याचं काम करेल.

 

आपल्या देशात जसा शेतकऱ्यांचे कल्याण या एका काळजी करावयास भाग पाडणाऱ्या विषयाला मी हात घातला आहे, तसाच देशाला ज्यापासून शक्ती मिळते, खनिजसंपत्ती मिळते, कोळसा असो, बॉक्साईट असो वा इतर खनिज संपत्ती असो, हे जे क्षेत्र आहे त्याच्या विकासाप्रती उदासिनतेची भावना दिसून येते. त्या परिसरातील लोकांचे आयुष्य पाहा, आपल्या देशाच्या समृद्धीसाठी ते घाम गाळतात पण त्या क्षेत्राचा विकास होत नाही. म्हणून आम्ही ज्या भागातून खनिजसंपत्ती काढतो, तेथील मजूरांच्या विकासासाठी,  शेतकऱ्यांच्या विकासासाठी एक विशेष योजना तयार केली आहे. दरवर्षी या भागासाठी सहा हजार कोटी रुपये खर्च करण्यात येतील. यात आदिवासी बांधवांचे प्रमाण मोठे आहे, कोळसा कुठे आहे, आदिवासी भागात आहे. या भागाचा विकास करण्यासाठी आम्ही काम सुरू केले आहे.

              बंधू आणि भगिनिंनो,   21 व्‍या शतकात देशाला प्रगतीपथावर नेण्‍यासाठी युवा शक्‍तीचे महत्‍व आहे आणि आज मी घोषित करु इच्छितो की, जर जगाच्‍या तुलनेत आपल्‍याला पुढे जायचे असेल तर आपल्‍याला युवकांना प्रोत्‍साहित करणे गरजेचे आहे, त्‍यांना संधी दिली पाहिजे, आपले युवक नवे उद्यमी-उद्योजक कसे बननार, नवे उत्‍पादक कसे बनणार, या देशात या नव्‍या उद्योजकांव्‍दारे  ‘स्‍टार्ट-अप’ चे एक जाळे कसे निर्माण होईल  ?   भारतातील असा कोणताच जिल्‍हा किंवा कोणताच ब्‍लॉक असा नसेल, जेथे येणाऱ्‍या दिवसामध्‍ये स्‍टार्ट-अप सुरू होणार नाहित. भारत देश  ‘स्‍टार्ट-अप’ च्‍या विश्‍वात प्रथम क्रमांकावर, जो सध्‍या-(आज) नाही आहे, पोहचु शकण्‍याचे स्‍वप्‍न बघु शकत नाही  ?  बंधू आणि भ‍गीनिंनो या ‘स्‍टार्ट-अप’ ला मला बळ दयायचे आहे आणि यासाठीच येणा-या दिवसामध्‍ये माझा संकल्‍प असेल  ‘स्‍टॅंड-अप इंडिया’, !  स्‍टार्ट-अप इंडिया’,!  स्‍टॅंड-अप इंडिया’. या कार्याला जेव्‍हा मी पुढे घेऊन जाण्‍याचे इच्छितो तेव्‍हा माझ्या बधू-भगिनींनो गेल्‍या वर्षभरात आपल्‍या देशात बँक कर्मचाऱ्‍यांनी केलेल्‍या माठया पराक्रमाची मला आठवण येते. आणि जेव्‍हा तुम्‍ही चांगले कार्य करता तेव्‍हा माझ्या अपेक्षा पण जरा वाढतात. माझ्या बँकेतील बंधुनो/मित्रांनो, बाबासाहेब आंबेडकरांच्‍या सव्‍वाशेव्‍या, जयंतीचे वर्ष, 125 व्‍या जयंतीचे वर्ष, सव्‍वालक्ष बँक शाखेचे आहे. या बँकेच्‍या शाखा, हा जो माझा ‘स्‍टार्ट-अप इंडिया’ कार्यक्रम आहे, त्‍यासाठी कोणत्‍या अजून योजना बनवणार आहेत?  परंतु, प्रत्‍येक शाखेने हा संकल्‍प केला पाहिजे व येणाऱ्‍या कालावधीत हा पूर्ण केला पहिजे की, आपल्‍या बँकेच्‍या प्रत्‍येक शाखेमधल्‍या प्रत्‍येक क्षेत्रात, जेथे आदिवासी वस्‍ती असेल तेथे माझ्या आदिवासी बंधूना, जेथे आदिवासी वस्‍ती नसेल तेथे माझ्या दलित बंधूना आणि प्रत्‍येक शाखेने एका दलित किंवा एका आदिवासी व्यक्तींला स्‍टार्ट-अप साठी कर्ज देऊन आर्थिक सहकार्य करावे आणि एकाचवेळी या देशात सव्‍वालक्ष दलित उद्योजक निर्माण करावेत. या देशातील आदिवासी वस्‍त्‍यांमध्‍ये माझे आदिवासी उद्योजक निर्माण व्‍हावेत. हे कार्य आपण करू शकतो, स्‍टार्टअप ला एक नवी दिशा देऊ शकतो आणि दुसरे हया सव्‍वालाख  बँकेच्‍या शाखा महिला उद्योजकांसाठी विशेष योजना बनवू शकतात का? सव्‍वालाख शाखांनी सव्‍वा लाख महिला उद्योजकांना त्‍यांच्‍या स्‍टार्ट-अप ला प्रोत्‍साहन देऊन त्‍यांची मदत केली पाहिजे, तुम्‍ही बघा, पाहता-पाहता सर्व भारत भर स्‍टार्ट-अप चे जाळे पसरवेल. नवे उद्योजक तयार होतील. कोणी एकाला, कोण दोन जणांना कोणी चार जणांना नोकरी मिळवून देईल आणि देशाच्‍या आर्थिक जीवनामध्‍ये परिवर्तन घडेल.

              बंधू आणि भगिनींनो, देशात जेव्‍हा भांडवल गुंतवणूक होते तेव्‍हा आमचा आग्रह असतो की  ‘उत्पादन क्षेत्रात’ काम व्‍हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त निर्यात व्हायला पाहिजे शिवाय त्‍यासाठीच भांडवल गूंतवणूक करण्‍यासाठी सरकारचा आर्थिक विभाग अनेक नव-नव्‍या योजना देत असतो. याचे आपले महत्‍व आहे. आणि आम्‍हाला ते कायम ठेवायचे आहे. पण, आज मी एक नवी गोष्‍ट घेऊन पुढे जाणार आहे.

              आपल्‍या देशात जी भांडवल गुंतवणूक होते, ती उत्पादन क्षेत्रात झाली पाहिजे, त्‍यामध्‍ये सरकारच्‍या सहकार्याचा जो मापदंड आहे,  त्‍यातील महत्‍वपूर्ण  मापदंड असा असेल की जे उद्योग तुम्‍ही आणणार त्‍यामध्‍ये  जास्‍तीत जास्‍त लोकांना जर रोजगार देणार असाल तर तुम्‍हाला वेगवेगळया प्रकारचे आर्थिक पॅकेज मिळेल. आता सरकारची मदत रोजगारासोबत जोडून नव्‍या कंपन्‍यासाठी योजनाही सरकारच बनवेल. देशातील रोजगाराच्‍या संधी वाढल्‍या पाहिजे, आम्‍ही त्‍यावर जोर देणार आहेत.  ‘स्किल इंडिया, डिजिटल इंडिया’ या स्‍वप्‍नांची पूर्तता करण्‍याच्‍या दिशेने आम्‍ही खूप पुढे निघालो आहे. बंधु आणि भगिनींनो भ्रष्‍टाचाराचे एक क्षेत्र आहे. गरीबातील गरीब व्‍यक्‍तीला वाटते की त्‍यांच्‍या मुलाला नोकरी मिळाली पाहिजे. आणि आपण हे पाहिले आहे की, जेव्‍हा नोकरीसाठी मुलाखतीला बोलावले जाते तेव्‍हा युवकांना असे वाटते की मला रेल्‍वेच्‍या मुलाखतीला, शिक्षकाच्‍या मुलाखतीला, टुलच्‍या मुलाखतीला,  ड्रायव्‍हरच्‍या मुलाखतीला बोलावले आहे तर मी कोणाकडे शिफारस करू?  विधवा आईला सुद्धा कोणाकडे शिफारस मागावी असा प्रश्‍न पडतो? कारण आपल्‍याकडे गुणवत्‍तेपेक्षाही मुलाखतीमुळे व्‍यक्‍तीसोबत न्‍याय अन्‍यायाचे खेळ खेळले जातात आणि मुलाखतीमध्‍ये नापास झाले असे सांगितले जाते.  मी आजपर्यंत असे मानसशास्‍त्रज्ञ नाही बघितले जे दोन मिनिटांच्या मुलाखतीच्‍या आधारे माणसाला पारखू शकतील. बंधु आणि भगिनींनो, माझ्या मनात हे बऱ्‍याच दिवसापासून आहे की, एक गरीब मातेचा पुत्र, कमी शिक्षण झालेला व्‍यक्‍ती ज्‍याला लहान सहान नोकरीची गरज आहे त्‍याला मुलाखत देण्‍याची आवश्‍यकता आहे का  ?  त्‍याला मुलाखतीशिवाय नोकरी मिळू शकत नाही का  ?  ऑनलाइन गुणपत्रिकेच्‍या आधारे हे ठरवता येणार नाही का, की आम्‍हाला 500 लोकांची गरज आहे तर प्रथम 500 लोक कोण आहे आम्‍हाला 2000 लोकांची गरज आहे तर पहिले 2000 लोक कोण आहे.  हो, परंतु जेथे शारीरिक क्षमतेची परिक्षा असते किंवा उच्‍च स्‍तरावरील नोकऱ्‍या जेथे व्‍यक्‍तीमत्‍वाचे, पेहरावाचे महत्‍व असते त्‍या ठिकाणी वेगळे मापदंड असले पाहिजे, त्‍यांची पध्‍दती वेगळी असली पाहिजे परंतु अगदी छोटया छोटया नोक-या,  मला तर  असे दिसते की, रेल्‍वेच्‍या नोकरीसाठी नागालॅंड, मिझोराम मधून बिचारे लोक मुलाखत देण्‍यासाठी परीक्षा देण्‍यासाठी मुंबई पर्यंत धडपडत येतात ही पध्दत मला बंद करायची आहे.      

              मी सर्व सरकारांना सरकारच्‍या सर्वं साथीदारांना आग्रह करतो की, आपण लहान सहान नोक-यांमधून हया मुलाखती त्‍वरीत बंद केल्‍या पाहिजे.  गुणवत्‍तेच्‍या आधारावर नोकऱ्‍या दिल्‍या पाहिजे. देशातील भ्रष्‍ट्राचार जो गरीब व्‍यक्‍तीला त्रास देतो त्‍यापासून सुटका मिळावी व ते पूर्ण करण्‍याच्‍या दिशेने आपण प्रयत्न करायला हवा असा माझा आग्रह आहे.

माझा देश निश्चिंतपणे झोपतो. सव्वाशे कोटी देशबांधव सुखाने झोपत आहेत. याचे कारण म्हणजे देशाचे जवान सीमेवर स्वत:च्या प्राणाची आहुती देण्यासाठी क्षणाक्षणाला तयार असतात. कोणताही देश आपल्या सैन्याचे मूल्यांकन कमी लेखू शकत नाही. सव्वाशे कोटी देशबांधवांच्या टिम इंडियासाठी सुध्दा माझ्या देशाचा प्रत्येक जवान, प्रत्येक सैनिक राष्ट्राची एक शक्ती आहे, राष्ट्राची संपत्ती आहे, राष्ट्राची ऊर्जा आहे.

              कित्येक वर्षात अनेक सरकारे आली आणि गेली. एक पद, एक निवृत्तीवेतन हा विषय प्रत्येक सरकारसमोर आला आहे. प्रत्येक सरकारपुढे प्रस्ताव ठेवले गेले. प्रत्येक सरकारने लहान-मोठी वचने दिली, आश्वासने पण दिली, पण समस्येचे समाधान झाले नाही. मी आल्यानंतरसुध्दा आतापर्यंत ही गोष्ट नाही करू शकलो. मी आज पुन्हा एकदा माझ्या सैनिकांना विश्वास देतो, आणि ही गोष्ट एक व्यक्ती नाही तर सव्वाशे कोटी टीम इंडियाच्या वतीने तिरंग्याच्या छत्रछायेखाली, ऐतिहासिक लाल किल्ल्यावरुन, मी सांगतो की माझ्या सैनिकांनो आम्ही एक पद एक निवृत्तीवेतन याचा तत्त्वत: स्विकार केला आहे. मात्र यासंदर्भातील संगटनांबरोबर चर्चेची प्रक्रिया सुरू आहे. संपूर्ण राष्ट्राचा विकास लक्षात घेऊन सर्वांना न्याय मिळाला पाहिजे असे आम्हाला वाटते. या गोष्टी लक्षात ठेवून आम्हाला 20-20, 25-25 वर्ष प्रलंबित समस्यांवर तोडगा काढायचा आहे. ज्या विश्वासाने चर्चा सुरू आहे त्यावरुन यासंदर्भात चांगले निर्णय होतील असा मला विश्वास आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला पुन्हा विश्वास देतो की एक पद एक निवृत्तीवेतनाचा सरकारने तत्वत: स्विकार केला आहे. यासंदर्भातील निटीग्रिटी लक्षात घेऊन ते कसे लागू करता येईल याबाबत संबंधित लोकांशी चर्चा करून आमचे म्हणणे पुढे नेणार आहोत.

              बंधु-भगिनींनो,  2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. 15 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्ष साजरी करून गप्प नाही बसायचे, आज याच 15 ऑगस्टच्या दिनी 15 ऑगस्ट 2022 साठी आपल्याला संकल्प करायचा आहे. भारताच्या 6 लाख गावांनी, प्रत्येक गावांनी एक स्वप्न ठरवायचे, असे स्वप्न ठरवायचे की 2022 पर्यंत आमचे गाव या समस्येतून आम्ही मुक्त करू.

सव्वाशे कोटी देशबांधवांनी आपल्या आयुष्यात 2022 मधील भारताच्या स्वातंत्र्याच्या 75 वर्षासाठी एक संकल्प केला पाहिजे, प्रत्येक नागरिकाने एक संकल्प केला पाहिजे की देशाच्या हितासाठी, समाजाच्या हितासाठी मी हे काम करेन. एकदा की माझ्या सव्वाशे कोटी देशवासियांनी एक संकल्प करून त्या दिशेने वाटचाल केली की 15 ऑगस्ट 2022 ची जी पहाट उजाडेल तेव्‍हा हा संकल्प पूर्ण केल्याचे स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या सैनिकांना त्यांच्या आत्म्याला ते दिसेल. 6 लाख गावांनी 6 लाख स्वप्ने पूर्ण केलेली असतील. शहरांनी, महानगरांनी, सरकारच्या प्रत्येक विभागाने, प्रत्येक सरकारी संस्थेने एक एक संकल्प करून आतापासूनच प्रयत्न सुरू केले पाहिजेत आणि आता आमच्या प्रत्येक साहित्यामध्ये, प्रत्येक गोष्टीत 15 ऑगस्ट 2022 चा उल्लेख असायला पाहिजे, त्या प्रत्येक गोष्टीत स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या संकल्पाचा पुनरुच्चार व्हायला हवा. एक चळवळ उभारली गेली पाहिजे.

बंधू-भगिनींनो,   स्वातंत्र्याचे आंदोलन दहा वर्ष चालले. स्वातंत्र्य समोर दिसत नव्हते पण तरीही 1910 मध्ये, 20 मध्ये, 30 मध्ये स्वातंत्र्याबद्दल बोलले जात होते. दहा वर्ष स्वातंत्र्याबद्दल पुन्हा पुन्‍हा बोलले गेले तेव्हा स्वातंत्र्य प्राप्त झाले. स्वाभिमानी, गौरवशाली, समृध्द राष्ट्रासाठी आपल्याला सक्षम भारत निर्माण करायचा आहे,  समृध्द भारत निर्माण करायचा आहे, स्वस्थ भारत निर्माण करायचा आहे, सुसंस्कृत भारताचे स्वप्न आपल्याला पूर्ण करायचे आहे. स्वाभिमानी भारत निर्माण करायचा आहे, श्रेष्ठ भारत निर्माण करायचा आहे. 2022 पर्यंत देशातील कुठलाही गरीब घराशिवाय रहाता कामा नये. 24 तास वीजपुरवठा करण्याच्या दिशेने यश प्राप्त झाले पाहिजे. आपला शेतकरी सक्षम झाला पाहिजे, आपला श्रमिक संतुष्ट झाला पाहिजे, आपला महिलावर्ग सशक्त झाला पाहिजे, आपला युवावर्ग स्वावलंबी झाला पाहिजे, आपले वरिष्ठ सकुशल झाले पाहिजेत आणि गरीब संपन्न झाला पाहिजे, समाजातील कोणीही दुर्लक्षित, वंचित राहू नये. आपल्या प्रत्येकाचे अधिकार समान असले पाहिजेत आणि संपूर्ण भारतीय समाजात समरसतेचे वातावरण असले पाहिजे. या स्वप्नाबरोबरच मी पुन्हा एकदा स्वातंत्र्याच्या या पवित्र पर्वानिमित्त आपल्याला सांगतो की, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्धापन दिनाच्या निश्चित भूमिकेच्या दिशेने आपल्याबरोबर वाटचाल करीन. पुन्हा एकदा सव्वाशे कोटी देशवासियांना मनापासून खूप खूप शुभेच्छा!

              सर्वजण पूर्ण ताकदीने माझ्याबरोबर बोला...

              भारत माता की जय, भारत माता की जय,  भारत माता की जय।

              वंदे मातरम्, वंदे मातरम्, वंदे मातरम्।

              जय हिंद, जय हिंद, जय हिंद।

PIB Release/DL/1319

No comments:

Post a Comment