अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे दर्शनासाठी वारकऱ्यांची मांदियाळी आषाढी एकादशीला पंढरपुरी भरते. विविध संतांच्या पालख्या विविध ठिकाणांहून प्रस्थान ठेवतात.


संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी ज्येष्ठ पौर्णिमेला त्र्यंबकेश्वरहून प्रस्थान ठेवते. ह्या वर्षी अधिक आषाढ असल्याने पालखी अधिक आषाढ पौर्णिमेला निघाली. सर्व वारकरी ‘जय जय राम कृष्ण हरि’ आणि ‘ज्ञानोबा तुकाराम’ च्या घोषात, टाळमृदुंगाच्या गजरात पंढरपुराकडे पायी वाटचाल करतात.
वारी मध्ये विविध गावांच्या दिंड्या असतात. आमची दिंडी कुंदेवाडी (सिन्नर )येथील ह.भ.प. एकनाथ महाराज गोळेसर ह्यांची होती. दिंडीत समाजातील सर्व स्तरातील स्त्री पुरुषांच्या सहभाग असतो. वारीत कोणताही भेदभाव नसतो. ही दिंडी नाशिक, श्रीरामपूर, अहमदनगर, कर्जत, करमाळा, टेंभूर्णी मार्गे २६ दिवसांच्या पायी प्रवासा नंतर पंढरपूरला पोहोचते.
दिंडीच्या मार्गावर रस्त्यांवर विवध गावांतील गावकरी मंडळी वारकऱ्यांची सेवा करतांना दिसतात. चहा, फराळ, अन्नदान तर असतेच, शिवाय वैद्यकीय सेवा देखील पुरविली जाते. ह्या वारकऱ्यांमध्ये जणु त्यांना विठू माऊलीच दिसत असते.

गेल्या तीन वर्षांपासून मी पायी दिंडीत जात आहे. मी स्वतःला भाग्यवान समजतो की ह्या वर्षी पण मला वारीत सहभागी होता आले. पंढरपूरला पोहोचल्यावर वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदी भाव बघायला मिळतो. विठू माउलीच्या दर्शनाची ओढ लागलेल्या भक्तांना पांडुरंगाचे दर्शन झाल्यावर अगदी कृतकृत्य झाल्या सारखे वाटते! अशा भक्तीमय वातावरणात महिन्याभराचा थकवा कधी पळून जातो ते समजत देखील नाही!
पंढरपूरची वारी म्हणजे एक साधना आहे, ह्यात भक्ती आहे, अध्यात्म आहे, परमार्थ आहे. वारी केल्यानंतर आपल्यातील दुजाभाव, अहंकार दूर होतो. हरिपाठानंतर वारकरी एकमेकांचे पाया पडतात. थोडक्यात काय तर...“देव पाहण्यासाठी गेला..देव होऊनी आला!”
लेफ्ट कर्नल किशोर पेटकर (निवृत्त)
No comments:
Post a Comment