Sunday 14 January 2018

सुरक्षाकवच देणारे पाऊल - लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर (निवृत्त)

 

युद्धशास्रामध्ये शत्रूवर कडाडून हल्ला करण्याची क्षमता जितकी महत्त्वाची असते, तितकीच आपल्यावरील हल्ला थोपवण्याची आणि या हल्ल्यामुळे होणारे नुकसान नगण्य पातळीवर आणण्याची क्षमताही महत्त्वाची मानली जाते. भारत शासनातर्फे नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर बांधण्यात येणाऱ्या 14 हजार बंकर्सकडे यादृष्टीने पाहावे लागेल. हे पाऊल स्वागतार्ह आहे. आजवर पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्रसंधीच्या उल्लंघनामध्ये अनेक स्थानिक निष्पाप नागरिकांचा बळी गेला आहे. त्यांच्या सुरक्षिततेसाठी बंकर्स उभारण्याचा निर्णय महत्त्वाचा आहे.

अलीकडील काळात उत्तर कोरियाच्या क्षेपणास्र चाचण्यांमुळे आणि अणुपरीक्षणामुळे आशिया प्रशांत क्षेत्रावर युद्धाचे ढग दाटले आहेत. अमेरिकेने उत्तर कोरियावर कारवाईचीही तयारी चालवली आहे. अशी परिस्थिती उद्भवल्यास त्यापासून बचाव करण्यासाठी उत्तर कोरियामध्ये जमिनीखाली अतिसंरक्षक न्युक्‍लियर बंकर्स तयार करण्यात येत आहेत. या बंकर्सवर अणुबॉम्ब पडला तरीही आतमध्ये कोणतेही नुकसान होणार नाही, अशी रचना करण्यात येत आहे. या बंकर्समधूनच युद्धकाळात शासनव्यवस्था चालवता यावी अशी तयारी करण्यात येत आहे. हे बंकर्स मोठ्याल्या इमारतींसारखे असतील. तेथे अगदी एसीपासून खाण्यापिण्यापर्यंतच्या सर्व सोयी सुविधा असतात. अशी तयारी अनेक राष्ट्रांमध्ये आहे.

 जम्मू-काश्‍मिरातील नियंत्रण रेषा आणि आंतरराष्ट्रीय सीमेवर 14 हजार बंकर्स बांधण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. पूंछ आणि राजौरी जिल्ह्यातील नियंत्रण रेषेवर 7298 बंकर्स बांधण्यात येणार असून उर्वरित 7162 बंकर्स जम्मू, कठुआ आणि सांबा जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय सीमेवर बांधण्यात येणार आहेत. यासाठी सुमारे 415.73 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. हे बंकर्स सैन्याच्या वापरासाठी नसून सीमावर्ती भागातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी उभारण्यात येणार आहेत. पाकिस्तानकडून होणाऱ्या शस्रसंधीच्या उल्लंघनादरम्यान नियंत्रण रेषेजवळ राहणाऱ्या निष्पाप लोकांचा अनेकदा बळी जातो. या नागरिकांचा युद्धाशी काहीही संबंध नसतो. सीमावर्ती भागातील अनेक मुले, महिला, वृद्ध तरुण तेथील शेतात कामासाठी किंवा अन्य कामांसाठी जात असतात. युद्धबंदीच्या उल्लंघनाचा सर्वाधिक परिणाम त्यांच्यावर होत असतो.

पाकिस्तानने युद्धबंदीचे उल्लंघन केल्यास आपण त्यांना उत्तर देतो. यानंतर ते पुन्हा प्रत्युत्तरादाखल गोळीबार करतात किंवा तोफा डागतात. त्याचा मारा नेमका कुठे होणार हे आपण सांगू शकत नाही. काही वेळा सैन्यावरही हल्ला होतो तर काही वेळा गावांवरही होतो. अशा वेळी या नागरिकांचे संरक्षण करणे हे आपल्यापुढे आव्हान असते. 1965, 1971 त्यानंतर कारगील युद्धाचा अनुभव घेऊन आपल्याला हे लक्षात आले की ही गावे पूर्णतः रिकामी करता येत नाहीत. अनेक लोक आपल्या गावातून बाहेर पडत नाहीत. ते तिथेच घरात राहातात. कारण त्यांची शेती, घरे, जनावरे तिथे असतात. हे सर्व सोडून देऊन अन्यत्र जाऊन उदरनिर्वाह करणे त्यांना शक्‍य नसते. ही सर्व सत्यपरिस्थिती तसेच पाकिस्तानकडून गेल्या काही वर्षांत होणारे शस्रसंधीचे उल्लंघन आणि दहशतवाद्यांमार्फत होणारे हल्ले लक्षात घेऊन या स्थानिक लोकांच्या सुरक्षिततेकरिता बंकर्स बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या बंकर्समुळे अचानक गोळीबार सुरु झाला तरीही लोकांना आपल्याच गावात शेताजवळ बंकर्समध्ये लपून राहता येणे शक्‍य होणार आहे.
मागील काळात म्हणजे 1971 च्या युद्धाच्या वेळी आपण असे बंकर्स तयार केले होते. नियंत्रण रेषेजवळील गावांमधील लोकही असे बंकर्स तयार करतात. काही वेळा लष्करही गावकऱ्यांना आपल्या बंकर्समध्ये लपण्यास सांगते. तेथे त्यांना जेवणही दिले जाते. पण आता करण्यात येणारी नवी व्यवस्था कायमस्वरुपी असेल. कारण पाकिस्तान कधी गोळीबार सुरु करेल, कधी चकमक सुरु होईल याचा अंदाज आपण लावू शकत नाही.

हे बंकर्स उभारण्यासाठी सैन्याधिकाऱ्यांचा सल्ला घेतला जाईल. त्यांच्या सल्ल्यातून सुरक्षित आणि लपण्यास सुलभ अशा काही जागा निवडल्या जातील. आपल्याकडे पंजाब प्रातांत अनेक ठिकाणी सीमेच्या पलीकडेही लोकांची शेती आहे. सीमा सुरक्षा दलाची परवानगी घेऊन हे लोक कुंपण ओलांडून शेत नांगरतात, शेती करतात आणि सायंकाळी परत येतात. शस्त्रसंधीच्या उल्लंघनावेळी असे लोक बळी पडण्याची शक्‍यता असते. त्यांना लपण्यासाठी असे बंकर्स उपयुक्‍त ठरणारे आहेत. प्रस्तावित योजनेनुसार सीमेजवळील प्रत्येक गावात असे बंकर्स तयार करण्याचा विचार सुरु आहे. यामध्ये एखाद्या गावातील शाळेजवळ बंकर्स करावे लागतील. जेणेकरून अचानक उद्भवणाऱ्या प्रसंगात शाळा जरी बंद झाली तरी विद्यार्थी या बंकर्समध्ये लपून राहू शकतील.

शासनातर्फे जम्मू ते उरी या सातत्याने गोळीबार होणाऱ्या क्षेत्रात बांधण्यात येणारे बंकर्स हे कॉंक्रिटचे असणार आहेत. त्यावर तोफेचा गोळा जरी पडला तरीही आतमध्ये लपलेल्या लोकांचे जराही नुकसान होणार नाही अशी त्यांची मजबूत रचना असणार आहे. बंकर्स हे घराप्रमाणे असतात. चारही बाजूंनी भिंती उभ्या करून वर कॉंक्रिटचे छत असते. घरासाठीच्या छतावरील स्लॅब हा साधारणपणे 4 इंच जाडीचा असतो; मात्र या बंकर्सवरील छत हे 8-9 इंच जाडीचे असेल. जेणेकरून आतमध्ये लपलेल्यांचे पूर्ण संरक्षण होणार आहे. या बंकर्समध्ये वारा येण्यासाठी, हवा खेळती राहण्यासाठीची सोय असते. तसेच आतमध्ये पाण्याची व्यवस्था असते. मागील काळात लाईन ऑफ कंट्रोलनजीक सैन्याने असे बंकर्स उभे केले होते; पण त्यांची संख्या खूप कमी होती. आता बनवण्यात येणारे बंकर्स हे पूर्णतः शासकीय व्यवस्थेनुसार केले जाणार आहेत.

आता महत्त्वाचा प्रश्‍न येतो तो म्हणजे असे बंकर्स बांधण्याची वेळ आपल्यावर का आली? याचे कारण भारताने कितीही चर्चेच्या फेऱ्या केल्या, गुप्तबैठका घेतल्या, त्यांच्या पंतप्रधानांना शपथविधीला बोलावले, आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर त्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली तरीही पाकिस्तानचा घातकी स्वभाव हा बदलत नाहीये. कुत्र्याच्या शेपटाप्रमाणे पाकिस्तानची स्थिती आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरून दबाव आणला तरीही पाकिस्तान भारताविरुद्धच्या कुरघोड्या, आगळिकी आणि भ्याड हल्ले चालूच ठेवणार आहे. त्यामुळे पाकिस्तानच्या धोरणात बदल होईल हा विचार करून शांत बसणे मूर्खपणाचे ठरेल. म्हणूनच या शासनाने एका बाजूला पाकिस्तानच्या कुरापतींना जशास तसे उत्तर देण्याचे धोरण अवलंबतानाच दुसऱ्या बाजूला या गोळीबारापासून, हल्ल्यांपासून आपल्या नागरीकांची कमीत कमी जीवितहानी कशी होईल यासाठी हे पाऊल उचलले आहे. आपल्या लोकांच्या सुरक्षिततेसाठी हे करणे अपरिहार्य आहे.

नियंत्रण रेषेवर भारतीय सैन्य जेव्हा प्रत्युत्तरादाखल गोळीबार करते तेव्हा पाकिस्तानी लष्कर पळून जाऊन गावांमध्ये आश्रय घेतात. यामागे एक रणनीती असते. गावांमध्ये लपल्यानंतर आपल्या सैन्याकडून त्यांना टिपण्यासाठी हल्ला झाला तर त्याचा फटका तेथील काही नागरिकांना बसू शकतो. काही वेळा त्यांचे काही नागरिक मारले जाऊ शकतात. किंबहुना, असे घडण्यासाठीच ही लपण्याची चाल खेळलेली असते. भारतीय सैन्याच्या गोळीबारात एक-दोन पाकिस्तानी नागरिक जरी मारले गेले तरी पाकिस्तान ती गोष्ट आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडतो आणि भारतीय लष्कराला बदनाम करण्याचा प्रयत्न करतो. भारत आमच्या देशातील निष्पाप नागरिकांचे बळी घेत आहे, असा कांगावा करतो. आपण अशा प्रकारची रणनीती आखू शकत नाही. कारण आपल्यासाठी देशातील प्रत्येक नागरीकाचे प्राण लाखमोलाचे आहेत. पाकिस्तानी सैन्याला तेथील नागरिकांच्या प्राणाची पर्वा नसते.

अशा प्रकारचा शेजारी आपल्याला लाभला आहे ही दुर्दैवाची गोष्ट आहे; मात्र आपण त्याला टाळू शकत नाही. आपण नियंत्रण रेषा बदलू शकत नाही. अशा वेळी स्थानिक लोकांची सुरक्षा करणे एवढेच आपल्या हाती उरते. कारण शेवटी हे सीमावर्ती भागातील लोक जाणार कुठे? अशी योजना करणारा भारत हा एकमेव देश नाही. जगभरात अनेक देशांत असे बंकर्स तयार केले जातात. उत्तर कोरिया, दक्षिण कोरिया या देशांमध्येही असे बंकर्स बनवण्यात आले आहेत. पाकिस्तान- अफगाणिस्तान सीमेवरही ते आहेत . सर्वसाधारण ज्या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती असते तिथे असे बंकर्स तयार केले जातात. आत्तापर्यंत काश्‍मिरमध्ये जितकी सरकारे आले त्यांनी याबाबत कधीही विचार केला नाही. पण आता काश्‍मीरमधील राज्य सरकार आणि केंद्र सरकार या दोहोंनी मिळून सामान्य जनतेचा विचार करून घेतलेला हा निर्णय निश्‍चितच कौतुकास्पद आहे. हे बंकर्स बांधल्यामुळे युद्ध होणार नाही असे नाही; पण युद्ध झाल्यास अथवा युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास जीवितहानी टाळणे शक्‍य होणार आहे. भविष्यात या भागातील जनावरांना वाचवण्यासाठीही अशी व्यवस्था करावी लागण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

https://m.dailyhunt.in/news/india/marathi/dainik+prabhat-epaper-dailypra/surakshakavach+denare+paul-newsid-79877368

 

No comments:

Post a Comment