Friday, 19 May 2017

तब्बल तीन दशकांनंतर भारतीय लष्कराला मिळणार नव्या तोफा नव्या तोफांची आज पोखरणमध्ये चाचणी होणार

तब्बल तीन दशकांनंतर भारतीय लष्कराला नव्या तोफा (आर्टिलरी गन्स) मिळणार आहेत. अमेरिकेहून दोन अल्ट्रा लाईट हॉवित्झर तोफा भारतात आणण्यात आल्या आहेत. आज (गुरुवारी) राजस्थानमधील पोखरणमध्ये या तोफांची चाचणी घेण्यात येणार आहे.

अमेरिकेकडून एम ३७७ तोफांच्या खरेदीसाठी २०१० पासून बातचीत सुरु होती. अखेर मागील वर्षी २६ जून रोजी याबद्दलची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाली. आता भारत अमेरिकेकडून १४५ तोफा खरेदी करणार आहे. यासाठी २,९०० कोटींचा करार करण्यात आला आहे. फॉरेन मिलिटरी सेल्सच्या माध्यमातून भारत आणि अमेरिका या दोन देशांमध्ये हा करार करण्यात आला आहे.

१९८० च्या दशकात भारतीय लष्करासाठी स्वाडिश बोफोर्स तोफांची खरेदी करण्यात आली होती. मात्र या व्यवहारात अपहार झाल्याचा आरोप झाला होता. त्यामुळे पुढील काळात लष्करी साहित्याची आणि शस्त्रात्रांची खरेदी अतिशय संशगतीने झाली. याचा मोठा फटका लष्कराच्या आधुनिकीकरणाला बसला. २०२० पर्यंत लष्कराच्या १६९ रेजिमेंट्सकडे ३ हजार ५०३ तोफा असतील, अशी योजना आहे. यामध्ये भारतात तयार करण्यात आलेल्या तोफांचा समावेश असेल. मात्र या योजनची अंमलबजावणी कासवगतीने होत असल्याने ती प्रत्यक्षात येणे अवघड आहे.

भारतीय वातावरणात भारतीय दारुगोळ्यासह मारा करण्याची क्षमता एम ३७७ तोफांमध्ये आहे. सध्या एम ३७७ तोफांचा वापर अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या लष्कराकडून केला जातो. इराक आणि अफगाणिस्तानमध्ये तैनात असलेल्या अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा एम ३७७ तोफांचा वापर करतात.

आज पोखरणमध्ये दोन एम ३७७ तोफांची चाचणी करण्यात आल्यानंतर सप्टेंबर २०१८ मध्ये आणखी तीन तोफा भारतात आणल्या जाणार आहेत. या तोफांचा वापर जवानांना प्रशिक्षण देण्यासाठी करण्यात येणार आहे. यानंतर मार्च २०१९ ते जून २०२१ या कालावधीत दर महिन्याला पाच एम ३७७ तोफा भारतीय लष्करात दाखल होणार आहेत. २४ ते ४० किलोमीटरपर्यंत मारा करण्याची एम ३७७ तोफांची क्षमता आहे.

भारत अमेरिकेकडून एकूण १४५ एम ३७७ तोफांची खरेदी करणार आहे. यातील पहिल्या २५ तोफा थेट अमेरिकेहून भारतात आणल्या जाणार आहेत. तर उर्वरित १२० तोफांची निर्मिती भारतात करण्यात येणार आहे. महिंद्रा डिफेन्सकडून या तोफांची निर्मिती केली जाणार आहे. अरुंद रस्ते असलेल्या डोंगराळ भागात एम ३७७ महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहे.

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: May 18, 2017 8:22 AM 

No comments:

Post a Comment