Tuesday, 16 May 2017

हुतात्मा जवानांच्या नातेवाइकांना विवेक ओबेरॉयकडून 25 फ्लॅट

नवी दिल्ली - सिनेस्टार अक्की ऊर्फ अक्षयकुमारच्या पावलांवर पाऊल टाकत बॉलिवूडचा 'चॉकलेट बॉय' विवेक ओबेरॉय यानेही केंद्रीय राखीव पोलिस दलातील (सीआरपीएफ) हुतात्मा जवानांच्या नातेवाइकांना ठाणे येथील आपल्या गृहप्रकल्पातील 25 सदनिका देत त्यांना हक्काचे घर उपलब्ध करून दिले आहे. "सीआरपीएफ'च्या एका अधिकाऱ्याने माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात नक्षलवाद्यांच्या हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या 'सीआरपीएफ'च्या तीन जवानांच्या नातेवाइकांना चार सदनिका देण्यात आल्या असून, उर्वरित 21 सदनिका लवकरच निमलष्करी दलास हस्तांतरित करण्यात येतील. ओबेरॉय यांचा प्रकल्प महाराष्ट्रात असल्याने महाराष्ट्रातील जवानांना यासाठी प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. "सीआरपीएफ'ने आज ओबेरॉय यांचे ट्‌विटरवरून आभारही मानले.

महाराष्ट्रातील अन्य 21 हुतात्मा जवानांची नावे ओबेरॉय यांच्या कंपनीकडे लवकरच दिली जातील, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले. मुंबईजवळील ठाणे परिसरामध्ये "कर्मा रेसिडन्सी' आणि "कर्मा पंचतत्त्व' हे दोन गृहप्रकल्प ओबेरॉय यांच्या कंपनीकडून उभारले जात आहेत.

अक्षयचाही मदतीचा हात
तत्पूर्वी अभिनेता अक्षयकुमारने छत्तीसगडमधील नक्षलवादी हल्ल्यामध्ये हुतात्मा झालेल्या बारा "सीआरपीएफ' जवानांच्या नातेवाइकांना प्रत्येकी नऊ लाख रुपयांची मदत जाहीर केली होती. बॅडमिंटनपटू सायना नेहवालनेही हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत केली होती. हुतात्मा जवानांच्या नातेवाइकांना लोकांनी सढळ हातांनी मदत करावी म्हणून गृहमंत्रालयाकडून
www.bharatkeveer.gov.in हे संकेतस्थळ सुरू करण्यात आले आहे.

वृत्तसंस्था रविवार, 14 मे 2017

No comments:

Post a Comment