नवी दिल्ली - काश्मीरमधील परिस्थिती पूर्वपदावर यावी, यासाठी आवाहन करणारा आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक आहे, या वज्रनिर्धाराचा पुनरुच्चार करणारा ठराव एकमुखाने मंजूर करून लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनाची आज सांगता झाली. काश्मीरच्या मुद्द्यावर भारत कोणताही तडजोड करणार नाही, असेही संसदेने पुन्हा एकदा स्पष्टपणे बजावले.
राज्यसभेमध्ये दोन दिवसांपूर्वी काश्मीरप्रश्नी प्रदीर्घ चर्चा होऊन एकसुरात काश्मीरच्या अविभाज्यतेचा ठराव मंजूर करण्यात आला होता. आज लोकसभेमध्ये कॉंग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी असा ठराव मांडण्याची सूचना केली. संपूर्ण सभागृहाने पाठोपाठ गृहमंत्री राजनाथसिंह यांनीही या सूचनेला संमती दर्शविली. लोकसभाध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी या प्रस्तावाचे वाचन केल्यानंतर एक आवाजात ठराव मंजूर करण्यात आला.
लोकसभेने या प्रस्तावाद्वारे काश्मीरमध्ये दीर्घकाळापासून सुरू असलेली संचारबंदी आणि हिंसाचाराबद्दल चिंता व्यक्त केली. तसेच तेथील परिस्थिती सुरळीत होण्यासाठी त्वरित पावले उचलण्यासाठी सरकारला आवाहनही केले. देशाची एकता, अखंडता आणि राष्ट्रीय सुरक्षा सर्वोच्च आहे. त्यावर कोणत्याही प्रकारची तडजोड मान्य केली जाणार नाही; परंतु काश्मीरमधील तणाव निवळण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, जेणेकरून तेथे शांतता प्रस्थापित होईल आणि सामान्य जनतेला सोसाव्या लागणाऱ्या अडचणी दूर होतील. जम्मू-काश्मीरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर येण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे यावे. तसेच तेथील तरुणाईमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करण्याचा संकल्पही लोकसभेने सोडला.
सलग दुसऱ्यांदा सहमती
जम्मू-काश्मीरवरील ठराव एकमुखाने मंजूर झाल्यामुळे संपूर्ण सभागृहाचे एकाच मुद्द्यावर एकमत होण्याचा एका आठवड्यात हा दुसरा प्रसंग असल्याची टिप्पणी तृणमूल कॉंग्रेसचे नेते सुदीप बंदोपाध्याय यांनी केली. या ठरावाआधी मालमत्ता आणि सेवाकराबाबतचे (जीएसटी) घटना दुरुस्ती विधेयक दोन्ही सभागृहांनी सर्वसंमतीने मंजूर केले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
-- सकाळ न्यूज नेटवर्क
No comments:
Post a Comment