Monday, 15 August 2016

पराक्रमी हंगपान दादांना अशोकचक्र

नवी दिल्ली - उत्तर काश्‍मीरमधील तेरा हजार फूट उंचीवर हिमालयाच्या पर्वतराजीमध्ये रक्त गोठविणाऱ्या थंडीत पाकिस्तानी घुसखोरांना कंठस्नान घालत देशासाठी प्राणार्पण करणारे हवालदार हंगपान दादा यांना मरणोत्तर अशोकचक्र जाहीर झाले आहे. पठाणकोट हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांना सडेतोड प्रत्त्युत्तर देणारे लेफ्टनंट कर्नल निरंजन आणि कार्पोरल गुरूसेवक सिंह यांच्यासह संरक्षण आणि निमलष्करी दलांमधील 82 कर्मचाऱ्यांना शौर्यपदके प्रदान करून त्यांचा गौरव केला जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपतींकडून अशोकचक्रासमवेत, 14 शौर्यचक्रे, 63 सेनापदके, दोन नौसेना पदके आणि दोन वायूसेना पदकांची घोषणा करण्यात आली.

मागील वर्षी गोव्यामध्ये अपघातग्रस्त झालेल्या डॉर्नियर विमानामधून दोन जवानांचे मृतदेह बाहेर काढणारे नौदलाचे खलाशी वीर सिंह आणि लेफ्टनंट कमांडर विकासकुमार नरवाल यांना नौसेना पदक जाहीर झाले आहे. स्क्वाड्रन लीडर अभिषेकसिंह तन्वर आणि स्क्वाड्रन लीडर भावेशकुमार दुबे यांची वायू सेना मेडलसाठी निवड झाली. भारतीय तटरक्षक दलाचे कमांडंट राधाकृष्ण राजेश नांबिराज आणि कुलदीप प्रधान यांत्रिक यांना तटरक्षक पदक बहाल केले जाणार आहे. लष्कराला एक अशोकचक्र (मरणोत्तर) 11 शौर्यचक्रे (यातील 6 मरणोत्तर) आणि 63 सेनापदके जाहीर झाली असून, यातील 12 ही मरणोत्तर बहाल केली जाणार आहेत. "ऑपरेशन मेघदूत‘, "ऑपरेशन रक्षक‘ आणि "ऑपरेशन ऱ्हिनो‘ यांसारख्या मोहिमांमध्ये उल्लेखनीय कामगारी करणाऱ्या जवानांसाठीही 28 शौर्यपदके जाहीर झाली आहेत.

पराक्रमाचे दादा

यंदा मे महिन्यामध्ये उत्तर काश्‍मीरमधील शामसाबरी भागातून घुसखोरी करणाऱ्या चार दहशतवाद्यांना हंगपान दादांनी कंठस्नान घातले होते. हंगपान दादा हे मूळचे अरुणाचल प्रदेशचे. त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये ते "दादा‘ नावाने परिचित होते. मागील वर्षी त्यांची येथील डोंगराळ भागामध्ये नियुक्ती झाली होती. दादांच्या लष्करी करिअरला 1997 मध्ये आसाम रजिमेंटमधून सुरवात झाली होती. त्यानंतर त्यांची 35 राष्ट्रीय रायफल्समध्ये नियुक्ती झाली होती. मे महिन्यातील शेवटच्या आठवड्यामध्ये त्यांच्या पथकाला सीमावर्ती भागामध्ये संशयास्पद हालचाली आढळून आल्या होत्या. दादांच्या नेतृत्त्वाखालील पथकाने दहशतवाद्यांशी चोवीस तास झुंज देत त्यांना रोखून धरले. तीन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर दादांनी अन्य एका दहशतवाद्याशी थेट दोन हात करून त्याला ठार मारले. या संघर्षामध्ये दादा गंभीर जखमी झाले होते.

पोलिस, राज्यसेवेचाही सन्मान

केंद्रीय आणि राज्य पोलिस दलांमधील 948 कर्मचाऱ्यांना आज शौर्यपदके जाहीर झाली, भारत तिबेट सीमा पोलिस दलातील तीन कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिस पदक जाहीर झाले. केंद्रीय राखीव पोलिस दलाचे निरीक्षक गुलाम नबी भट यांच्यासह तेलंगणमधील तीन पोलिस कर्मचाऱ्यांचाही राष्ट्रपती पदकाने गौरव होणार आहे. "सीआरपीएफ‘ने यंदाही सर्वाधिक म्हणजे 43 शौर्यपदके पटकावली असून, यातील बहुसंख्य पदके ही नक्षलविरोधी कारवायांमधील सरस कामगिरीबद्दल बहाल करण्यात आली आहे. मागील सात वर्षांपासून "सीआरपीएफ‘ सर्वाधिक शौर्यपदके पटकावत आहे. मागील वर्षी 27 जुलै रोजी पंजाबच्या दिनानगर भागामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या तीन गृहरक्षक दलाच्या जवानांना शौर्यपदके प्रदान केली जाणार आहेत.

यावर्षी मुंबईतील अग्नितांडवामध्ये कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या अग्निशामक दलाच्या चौघा कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती शौर्यपदके जाहीर झाले आहेत. सात कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिसपदक, 170 कर्मचाऱ्यांना पोलिस शौर्य पदक, 88 कर्मचाऱ्यांना उल्लेखनीय सेवेसाठीचे राष्ट्रपती पदक तर, 683 कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण कामगिरीसाठीचे पोलिसपदक जाहीर झाले आहे. राष्ट्रपतींचे शौर्यपदक जाहीर झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये तेलंगणमधील 24, ओडिशातील 16, महाराष्ट्रातील दहा, झारखंडमधील आठ, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडमधील नऊ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

सीबीआय कर्मचाऱ्यांचाही गौरव

केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) कार्यरत असलेल्या 31 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना राष्ट्रपतींचे पोलिसपदक जाहीर झाले आहे. विशेष आणि गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ही पदके त्यांना बहाल केली जाणार आहेत. सहा अधिकाऱ्यांना विशेष सेवेसाठी राष्ट्रपतींचे पोलिसपदक दिले जाणार असून, 25 कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पोलिसपदक बहाल केले जाणार आहे. अग्निशामक दलातील 67 कर्मचाऱ्यांचाही सेवा पदके बहाल करून सन्मान केला जाणार आहे.

पीटीआय

No comments:

Post a Comment