पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली देशाच्या विकासाला आणि
अर्थव्यवस्थेला गती लाभली आहे असे केंद्रीय अर्थ, कंपनी व्यवहार आणि माहिती
आणि प्रसारण मंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ते गुजरातमधील वडोदरा
जिल्ह्यातील करनाली या गावात बोलत होते. जिल्ह्यातील पिपलिया, वाडिया आणि बदलीपुरा गावांचा समावेश असलेली करनाली गट पंचायत जेटली यांनी
दत्तक घेतली. ते म्हणाले की संपूर्ण जग भारताकडे वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था
म्हणून पाहत आहे. केवळ गुजरात राज्यातील नव्हे तर संपूर्ण देशातले आदर्श गाव
म्हणून करनालीचा विकास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
करनाली येथे आयोजित एका कार्यक्रमात त्यांनी लाभार्थ्यांना किसान क्रेडिट
कार्ड, मृदा आरोग्य कार्ड, रुपे कार्ड तसेच गुजरात
सरकारच्या मुख्यमंत्री अमृतम् आणि मुख्यमंत्री अमृतम् वात्सल्य योजनेची आरोग्य
योजना प्रमाणपत्रे वितरित केली. दारिद्रय रेषेखालील जनता सहज बळी पडेल अशा भीषण
रोगांसाठी या वैद्यकीय सेवा योजना आहेत. रुग्णवाहिनी आणि घन कचरा व्यवस्थापन
वाहनाचे लोकार्पण यावेळी करण्यात आले. गावकरी आणि पर्यटकांना त्यांच्या समस्या
संबंधित अधिकाऱ्यांपर्यंत थेट पोहोचवता याव्यात यासाठी एक मोबाईल ॲप देखील
केंद्रीय मंत्र्यांनी सुरू केले. जेटली यांनी
बायपास रस्त्याचे भूमीपूजन केले तसेच पिपलिया आणि वाडिया येथे पाण्याच्या टाकीचे
भूमिपूजन केले. या कार्यक्रमाला खासदार रामसिंह राठवा, आमदार बाळकृष्ण पटेल आणि जिल्हा प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
पार्श्वभूमी : करनाली हे
गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील दाभोई तालुक्यातील एक छोटे गाव आहे. येथे एकूण 470 कुटुंब राहतात. 2011 च्या जनगणनेनुसार करनाली गावाची लोकसंख्या 2084 आहे. त्यापैकी 1068 पुरुष तर 1016 महिला आहेत. करनाली गावात 0-6 वयोगटातील 280 मुले आहेत. जी एकूण लोकसंख्येच्या 13.44 टक्के आहे. करनाली गावाचे सरासरी लिंग गुणोत्तर 951 आहे जे गुजरात राज्याच्या 919 गुणोत्तरापेक्षा अधिक आहे. बाललिंग गुणोत्तर 1121 असून गुजरात राज्याच्या 890 गुणोत्तरापेक्षा अधिक आहे. करनाली गावाचा
साक्षरता दर गुजरातच्या तुलनेत कमी आहे. वर्ष 2011 मध्ये करनालीच्या
साक्षरता दर 73.67 टक्के होता तर गुजरातच्या 78.03 टक्के होता. करनालीमध्ये 80.88 टक्के पुरुष साक्षर आहेत तर 65.90 टक्के महिला साक्षर आहेत. भारतीय घटना आणि पंचायती राज कायद्यानुसार
करनाली गावचा कारभार सरपंच पाहतात.
No comments:
Post a Comment