Monday, 15 June 2015

मणिपूरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर


मणिपूरमध्ये चार जूनला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात लष्कराचे अठरा जवान हुतात्मा झाले होते. या हल्ल्याचा निषेध, बाह्या सरसावून केलेल्या गर्जना आणि इशारेबाजी हा नेहेमीचा क्रम बाजूला ठेवून थेट कृतीचा मार्ग स्वीकारण्यात आला आणि केवळ पाचच दिवसांत हल्लेखोरांना चोख प्रत्युत्तर देण्यात आले.  अपारंपरिक युद्धात भारताला सतत नामोहरम करता येईल, फुटीरतावाद्यांना चिथावणी देऊन आपले मतलब साधता येतील, अशा भ्रमात असलेल्या शक्तींना सणसणीत इशारा देणारी कारवाई भारताने केली आहे. लष्कराने सरहद्द ओलांडून म्यानमारमधील दहशतवादी तळ उद्‌ध्वस्त केले. या यशस्वी मोहिमेमागे गुप्तचरांनी दहशतवादी तळांची मिळविलेली नेमकी माहिती, लष्करी व राजकीय नेतृत्वाने वेगाने घेतलेले निर्णय आणि लष्कराच्या तुकडीने योजनेबरहुकूम केलेली कारवाई या गोष्टी तर आहेतच; पण त्याशिवाय इतर अनेक अर्थांनी या धडक कारवाईचे महत्त्व आहे. वेळ पडलीच तर भारत चाकोरीबाहेर जाऊन कृती करू शकतो, तो आपल्या जवानांच्या जीविताला सर्वोच्च महत्त्व देतो आणि या देशाची सहिष्णुता म्हणजे दुर्बलता झाकण्यासाठी शोधलेली सबब नाही, हा संदेश यानिमित्ताने दिला गेला. लष्कराचे शौर्य आणि सरकारची इच्छाशक्ती यांचा समन्वय दिसून आला. अतिरेक्‍यांचा बीमोड करण्यासाठी भारताने म्यानमारशी बोलणी करून या संदर्भात एक करारही केला असल्याने लष्कराला म्यानमारमध्ये जाऊन कारवाई करणे सोपे झाले.

ईशान्य भागात अलीकडे अतिरेकी संघटनांना स्थानिक जनतेतून मिळणारा पाठिंबा काही प्रमाणात ओसरत चालल्याची चिन्हे आहेत. शिवाय इतर देशांकडून त्यांना मिळणारी मदत रोखण्यासाठी राजनैतिक पातळीवर भारत प्रयत्न करीत आहे. या सर्वच प्रयत्नांना मंगळवारच्या लष्करी कारवाईमुळे बळ मिळेल, यात शंका नाही.

पाकिस्तान गेल्या काही वर्षांत छुप्या युद्धाच्या माध्यमातून राजकीय उद्दिष्टे साध्य करण्याचा प्रयत्न करीत आला आहे. काश्‍मीरमधील व देशाच्या इतरही भागातील हिंसाचारामागे या "पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादाचा‘ वाटा मोठा आहे. याबाबतीत भारताने पाकिस्तानला उघडे पाडण्यात बऱ्यापैकी यश मिळविले. त्यातून निर्माण झालेला आंतरराष्ट्रीय दबाव वाढवणे आणि चर्चेत पाकिस्तानला गुंतविणे याला सध्यातरी प्राधान्य द्यावे लागेल. अण्वस्त्रधारी देशाबरोबरचे संबंध हाताळताना विशेष जबाबदारी येते, याचेही भान विसरता कामा नये. या सर्वच बाबतीत भारतीय नेतृत्वाच्या मुत्सद्देगिरीची कसोटी लागणार आहे. त्यामुळे पूर्वेकडच्या या यशस्वी मोहिमेचे योग्य ते महत्त्व लक्षात घेऊन पुढची पावले सावधानतेने टाकायला हवीत. म्यानमारमधील कारवाईने लष्कराचे मनोबल वाढण्यास मदत होणार आहे, हे निःसंशय.

जवानांवरील हल्ल्यांच्या बाबतीत सारा देश अत्यंत संवेदनशील आहे आणि सरकारही पूर्णपणे लष्कराच्या पाठीशी आहे, याचा संदेश यानिमित्ताने दिला गेला, ही या सगळ्यातील कळीची बाब. भारताला सर्व बाजूंनी वेढण्याच्या आणि दडपणाखाली ठेवण्याच्या आकांक्षेने पछाडलेल्या चीनसह जगासाठीच हा संदेश आहे. भारताची तलवार कायम म्यानातच राहील, असे गृहीत धरता कामा नये, हेच म्यानमारमधील धडक कृतीतून भारताने दाखवून दिले आहे.  हा प्रहार म्हणजे देशाच्या नव्याने वाढलेल्या आत्मविश्‍वासाचेही एक सुचिन्ह आहे, यात शंका नाही. मात्र, अखंड सावधानता ही स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्वाची किंमत असते, हे कधीही विसरता येणार नाही.

जय जवान ! जय भारत !! जयहिंद !!!

No comments:

Post a Comment