दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चर्चा
प्रिटोरिया - संरक्षणसामग्री, उत्पादन, खाणकाम व खनिज क्षेत्रातील संबंध दृढ करण्यासोबत दहशतवादाशी लढण्यासाठी कृतिशील पाऊल उचलण्यावर भारत आणि दक्षिण आफ्रिका यांनी परस्पर सहमती दर्शविली. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर असून, त्यांनी शुक्रवारी दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष जेकब झुमा यांची भेट घेतली.
मोदी आणि झुमा यांच्यात सविस्तर चर्चा झाली. संरक्षणसामग्रीचे उत्पादन करण्यासाठी भारत हे अतिशय योग्य ठिकाण असून, प्रादेशिक व जागतिक मागणी पूर्ण करण्यासाठी दोन्ही देश एकत्रितपणे काम करू शकतील, यावर मोदी यांनी चर्चेत भर दिला. जागतिक पातळीवर संरक्षणसामग्री उत्पादनात दक्षिण आफ्रिका आघाडीवर आहे. या बैठकीदरम्यान मोदी यांनी अणुपुरवठादार देशांच्या गटाचे सदस्यत्व भारताला मिळावे यासाठी दक्षिण आफ्रिका देत असलेल्या पाठिंब्याबाबत आभार मानले. व्यापार आणि गुंतवणुकीमध्ये दोन्ही देशांना खूप वाव असून, विशेषतः खनिजे व खाणकाम, रसायने, औषधे आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचा यात प्रामुख्याने समावेश करावा लागेल, असे मोदी यांनी या वेळी नमूद केले.
दहशतवादाशी लढण्याच्या मुद्द्यावर बोलताना मोदी म्हणाले, ‘समाजाच्या पायावर दहशतवादी हल्ला करीत आहेत. दोन्ही देश दहशतवादाला सामोरे जाण्यासाठी कृतिशील सहकार्य करणार आहेत. आपल्या लोकांची सुरक्षितता दहशतवाद्यांमुळे धोक्यात आली आहे. याचा मुकाबला करण्यासाठी विभागात आणि जागतिक पातळीवर दोन्ही देश एकमेकांना मदत करतील.‘‘
दोन्ही देशांतील कंपन्यांना संधी
‘दोन्ही देशांतील कंपन्या एकत्र येऊन संरक्षणसामग्री उत्पादनाचे नवे व्यासपीठ निर्माण करतील. यामुळे या क्षेत्रात कंपन्यांना नव्या संधीची कवाडे खुली होणार आहेत. भारतातील संरक्षण सामग्री उत्पादन क्षेत्रात मोठे फेरबदल होत असून, अनेक नव्या संधी निर्माण होत आहेत. या कंपन्या परस्पर सहकार्याने आपल्या क्षमतांचा विकास करू शकतील,‘‘ असे नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.
जगातील दोन महापुरुष महात्मा गांधी आणि नेल्सन मंडेला ज्या भूमीवर वावरले तेथे त्यांना आदरांजली वाहण्याची ही माझ्यासाठी संधी आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
No comments:
Post a Comment