Sunday, 31 July 2016

हुतात्म्याच्या पैशांसाठी कुटुंबाचे न्यायालयीन युद्ध

 

जवानाची आई व पत्नी न्यायालयात
केंद्रपाडा (ओडिशा) - कारगिल युद्धात भारताने "ऑपरेशन विजय‘च्या माध्यमातून पाकिस्तानी सैन्याचा पाडाव केला. या विजयाचा उत्सव दरवर्षी 26 जुलै रोजी साजरा केला जातो. याच युद्धात शौर्य गाजवीत धारातीर्थ पडलेल्या एका जवानाची पत्नी व आईमध्ये मात्र आर्थिक मदतीच्या वादावरून 16 वर्षांपासून न्यायालयीन लढाई सुरू आहे.

लान्स नाईक सच्चिदानंद मलिक यांनी कारगिल युद्धात शत्रूला धूळ चारीत शौर्य गाजविले. लढता लढताच त्यांना 28 जुलै 1999 मध्ये वीरमरण आले, अशी माहिती जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांनी नोंदी तपासून दिली. हुतात्मा मलिकच्या कुटुंबाला लष्कर, केंद्र व राज्य सरकारतर्फे 22.70 लाख रुपये देण्यात आले. पत्नी निवेदिता मलिक यांना सरकारी नोकरी व कुटुंबासाठी निवृत्तिवेतनही मंजूर करण्यात आले. अन्य संघटना व व्यक्तींनीही त्यांना मदत केली.

सरकारची 22.70 लाखांची मदत निवेदिताच्या नावे मिळाली. यातील काही हिस्सा आपल्याला मिळावा, यासाठी मलिकची आई मालतीलता (वय 75) यांनी 2000 मध्ये न्यायालयात धाव घेतली. हिंदू वारस कायद्यानुसार मलिकच्या विधवा आई एकूण मदतीपैकी एकतृतीयांश रक्कम मिळण्यास पात्र असल्याचा निकाल केंद्रपाडा येथील दिवाणी न्यायाधीशांनी (वरिष्ठ विभाग) 2007 मध्ये दिला. निवेदिता व तिचा लहान मुलगा सौम्यरंजन मलिक यांनी दोन तृतीयांश वाटा मिळेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. मात्र, या निकालाला निवेदिताने अपिली न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायालयाने अद्याप याबाबत सूचना दिल्या नसल्याने ही रक्कम बॅंक खात्यात पडून आहे. त्या वेळी अल्पवयीन असलेला सौम्य आता प्रौढ झाला आहे, असे वकील विचित्रनंद मोहंती यांनी सांगितले. 

-- पीटीआय

No comments:

Post a Comment