Wednesday, 6 July 2016

'खंबापीडित ते राज्यमंत्री' - - सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली - सत्ताधारी भाजपमधील मितभाषी आणि उच्चविद्याविभूषित खासदार डॉ. सुभाष भामरे यांची लोकसभेतील आतापर्यंतची ओळख ही खांबाच्या आड त्यांचे आसन असल्यामुळे "खंबापीडित सांसद‘ अशी होती. परंतु त्यांना अनपेक्षितरीत्या मिळालेल्या राज्यमंत्रिपदामुळे प्रथमच धुळे मतदारसंघाचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोचले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्षमतेचा आढावा घेऊन दिलेला न्याय, अशा शब्दांत डॉ. भामरे राज्यमंत्री पदासाठी झालेल्या निवडीबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली.
राज्यमंत्रिपदी शपथ घेतल्यानंतर "सकाळ‘शी बोलताना डॉ. सुभाष भामरे म्हणाले, ""पंतप्रधान नरेंद्र मोदींची काम करण्याची खास अशी पद्धत आहे. आपल्या पद्धतीने ते खासदारांच्या कार्यक्षमतेचा आढावा घेऊन योग्य तो न्याय देतात. माझ्यासाठी ही अत्यंत गौरवाची बाब आहे. मंत्रिपद महत्त्वाचे आहेच; पण सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वोच्च नेतृत्वाने माझ्यावर दाखविलेला विश्‍वास ही महत्त्वाची गोष्ट आहे.‘‘
डॉ. सुभाष भामरे हे धुळ्यातील नामांकित कर्करोग तज्ज्ञ म्हणून ओळखले जातात. मंत्रिपदाच्या जबाबदारीमुळे आता रुग्णसेवेवर परिणाम होणार असला तरी
त्यांनी त्यांच्या मुलाकडे ही रुग्णसेवेची जबाबदारी सोपविली आहे. डॉ. भामरे म्हणाले, ""रुग्णसेवा आणि मंत्रिपद या दोन्हीही जबाबदाऱ्या पूर्णवेळ करण्याच्या आहेत. साहजिकच मंत्रिपदाच्या कामाला न्याय देण्यामध्ये रुग्णसेवेवर नक्कीच परिणाम होणार आहे. परंतु, माझा मुलगाही कर्करोग तज्ज्ञ झाला आहे, तो रुग्णसेवेतील माझी कमतरता भरून काढेल.‘‘
आता आसन बदलणार!
545 खासदारांची आसनव्यवस्था असलेल्या लोकसभेमध्ये 12 खांब आहेत. शेवटून तिसऱ्या रांगेत असलेल्या या खांबांमुळे, एका खांबाआड दोन याप्रमाणे तब्बल 24 खासदारांची आसने झाकोळली जातात. त्यामुळे प्रश्‍नोत्तरे किंवा चर्चेच्या वेळीही पिठासीन अधिकाऱ्यांनी नाव पुकारल्यानंतरही हे लोकप्रतिनिधी चटकन दिसत नाहीत. त्यामुळे टीव्हीवर पूर्ण प्रतिमा झळकावी यासाठी बऱ्याचदा खांबाआडची मंडळी आपली बोलण्याची वेळ असेल तेव्हा पुढील आसनांवर येऊन बसतात. असेच खांबाआड आसन असलेले डॉ. सुभाष भामरे हे गेल्या वर्षी पावसाळी अधिवेशनात खनिजांच्या आयातनिर्यातीबाबतचा प्रश्‍न मांडण्यासाठी आपली जागा सोडून पुढे (सहाव्या रांगेत) येऊन बसले होते. या आसन बदलावर लोकसभाध्यक्षांनी विचारले असता डॉ. भामरे यांनी "मै खंबापीडित सांसद हूँ‘ असे म्हणत बदललेल्या जागेवरून प्रश्‍न विचारण्याची परवानगी मागताच, सभागृहामध्ये जोरदार हशा पिकला होता. मंत्रिपदी वर्णी लागल्याने आता भामरे यांचे आसन बदलले जाणार आहे.

No comments:

Post a Comment