श्रीनगर: जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यात झालेल्या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तब्बल 56 तास चाललेल्या चकमकीमध्ये सुरक्षा जवानांनी या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
उत्तर काश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातल्या बाबागुंड भागात दहशतवादी असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहिम सुरु केली होती.
शुक्रवारी सकाळी सुरु झालेल्या त्या शोधमोहिमेदरम्यानच ही चकमक सुरु झाली होती. हे दहशतवादी संबंधित असलेली संघटना आणि त्यांची ओळख पटवली जात आहे, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. मात्र या दहशतवाद्यांसंदर्भात अधिक तपशील अधिकाऱ्यांनी दिला नाही.
या चकमकीदरम्यान 2 पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलाचे दोघेजण शहिद झाले होते. यामध्ये 'सीआरपीएफ'च्या एका निरीक्षकाचाही समावेश होता. या चकमकीमध्ये एक नागरिकही मरण पावला होता. यासंदर्भातील अधिक तपशील उपलब्ध होणे बाकी आहे.
No comments:
Post a Comment