वृत्तसंस्था
अमेठी ः उत्तर प्रदेशातील अमेठी येथील कलाश्निकोव्ह रायफल निर्मिती युनिटमध्ये तयार झालेल्या 'एके-203' रायफली आता आमच्या सैनिकांच्या हाती येणार असून, या माध्यमातून ते दहशतवादी आणि नक्षलवाद्यांशी दोन हात करू शकतील. बंदूक निर्मितीचा कारखाना ही अमेठीची नवी ओळख असेल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज येथे सभेत बोलताना केले. पंतप्रधानांच्या हस्ते या वेळी रायफल निर्मिती कारखान्याचा शुभारंभही झाला.
'एके-203' ही जगातील अत्याधुनिक बंदूक असून, भारत आणि रशियाच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या कोरवा दारूगोळा कारखान्यात ती तयार होणार आहे. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्या सहकार्यामुळे कमी वेळेत हा कारखाना उभा राहू शकला असे सांगत त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही कठोर शब्दांत टीका केली. राहुल यांनी 2007 मध्ये या कारखान्याची पायाभरणी केली होती, तेव्हा त्यांनी येथील काम 2010 मध्ये सुरू होईल असे जाहीर केले होते. पण त्यांचे सरकार या कारखान्यामध्ये नेमके कोणत्या प्रकारची शस्त्रे निर्मिती होणार हे निश्चित करू शकले नाही.
काही मंडळी मते मिळाल्यानंतर लोकांना विसरून जातात, लोकांना गरिबीतच ठेवण्यात त्यांना रस असतो, कारण त्यांच्या प्रत्येक पिढीला "गरिबी हटाओ'ची घोषणा देता येते. आता भविष्यामध्ये अमेठी ही येथे येणाऱ्या नेते मंडळींसाठी नाही, तर विकासकामांसाठी ओळखली जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
No comments:
Post a Comment