पीटीआय
नवी दिल्ली : काश्मीरच्या मुद्द्यावर पाकिस्तानचे समर्थन करणाऱ्या ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशनच्या (ओआयसी) ठरावावर भारताने आज परखड प्रतिक्रिया व्यक्त केली. जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य घटक असून, येथील समस्या ही पूर्णपणे देशांतर्गत बाब असल्याचे भारताने ठणकावून सांगितले.
"ओआयसी' या इस्लामिक देशांच्या संघटनेची बैठक नुकतीच अबुधाबी येथे पार पडली. या बैठकीचा समारोप काश्मीरप्रश्नी पाकिस्तानला पाठिंबा दर्शविणाऱ्या ठरावाने झाला. काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकाराचे उल्लंघन होत असल्याचा ठपका ठेवत दक्षिण आशियात शांतता प्रस्थापित करण्यासाठी या समस्येचे निराकरण महत्त्वाचे असल्याचे "ओआयसी'ने ठरावात म्हटले आहे; तसेच संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या ठरावाची अंमलबजावणी करण्याची आठवण आंतरराष्ट्रीय समुदायाला करून देण्याचा उल्लेखही यात असल्याचा दावा पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने केला आहे. यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रतिक्रिया व्यक्त करत काश्मीर भारताचा अविभाज्य घटक असल्याचे स्पष्ट केले.
दरम्यान, या बैठकीला प्रथमच भारताला निमंत्रित करण्यात आले होते. ही बाब न रुचल्याने पाकिस्तानने या बैठकीकडे पाठ फिरवली होती.
No comments:
Post a Comment