'भारत माता की जय...', 'वंदे मातरम...', 'अमर रहे, अमर रहे, निनाद अमर रहे...' या घोषणांनी आणि अतिशय भावपूर्ण वातावरणात स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांना अखेरचा निरोप देण्यात आला. डीजीपीनगरमधील घरापासून ते गोदातिरावरील अमरधामपर्यंत सर्वत्र निनाद यांना सॅल्यूट केला जात होता. प्रचंड जनसमुदायाच्या साक्षीने आणि हवाई दलाच्या मानवंदनेने निनाद यांच्या पार्थिवाला अग्निडाग देण्यात आला.
काही दिवसांपूर्वीच निनाद यांचा काश्मिरमध्ये हेलिकॉप्टर कोसळून मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थिव नाशिकला आणण्यात आले. डीजीपीनगर परिसरातील घरी सकाळी ९ वाजता निनाद यांचे पार्थिव आणण्यात आले. सर्वप्रथम मांडवगणे कुटुंबीय आणि त्यांच्या आप्तेष्टांसाठी वेळ देण्यात आली होती. त्यानंतर काही वेळाने घरासमोरील मोकळ्या मैदानात पार्थिव ठेवण्यात आले. तेथील वातावरण हेलावून टाकणारे होते. नागरिकांसह मान्यवरांनी निनाद यांना तेथे श्रद्धांजली अर्पण केली. त्यानंतर लष्कराच्या वाहनातून निनाद यांच्या अंत्ययात्रेस प्रारंभ झाला. चहूबाजूंनी नागरिकांची गर्दी असलेल्या रस्त्यावरुन निनाद यांची अंत्ययात्रा मार्गस्थ झाली. पार्थिवाचे पंचवटी अमरधाममध्ये आगमन होताच विविध घोषणांनी परिसर दणाणून गेला. याठिकाणी पालकमंत्री गिरीश महाजन, महापौर रंजना भानसी, पोलिस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, ओझर हवाई दल केंद्राचे प्रमुख समीर बोराडे आदींनी पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर हवाई दलाच्या जवानांनी हवेत बंदुकीच्या २१ फैरी झाडून मानवंदना दिली. बँड पथकाने धून सादर करीत अभिवादन केले. याप्रसंगी निनाद यांच्या पत्नी विजेता, दोन वर्षांची कन्या निया, भाऊ नीरव, वडील अनिल, आई सुषमा आणि अन्य कुटुंबीय उपस्थित होते. निनादच्या वडिलांनी यावेळी मुखाग्नी दिला. त्याचवेळी 'भारत माता की जय' आणि 'निनाद अमर रहे' या घोषणांनी अमरधामचा परिसर निनादून गेला. शहरातील अनेक लोकप्रतिनिधींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. गोदावरीचा संपूर्ण तीर, पूल आणि अमरधामचा परिसर नागरिकांनी गच्च भरला होता. विशेष म्हणजे, काही शाळांचे विद्यार्थी गणवेशातच निनाद यांना निरोप देण्यासाठी आले होते. माजी सैनिक संघटना, वीर माता आणि पत्नी संघटना यांच्यासह अनेक क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होते.
निनाद हे अतिशय हुशार आणि धाडसी होते. त्यांनी देशसेवा करतानाच आपले प्राण अर्पण केले. त्यांचे योगदान कुणीही विसरू शकत नाही. आम्ही सर्वजण त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठिशी आहोत.
- गिरीश महाजन, पालकमंत्री
No comments:
Post a Comment