‘फायटर जेट‘च्या कॉकपीटवर तिचा ताबा
हैदराबाद - सर्वच क्षेत्रांमध्ये आघाडी घेणाऱ्या सावित्रीच्या लेकींनी आज इतिहास घडवित लढाऊ विमानांच्या कॉकपीटमध्ये प्रवेश केला. अवनी चतुर्वेदी, भावना कंठ आणि मोहना सिंह या तीन रणरागिणींनी लढाऊ विमानांच्या पहिल्या महिला वैमानिक होण्याचा मान मिळवला आहे. विशेष म्हणजे या तिन्ही महिला वैमानिकांकडे आणीबाणीच्या स्थितीमध्येही विमानाची सूत्रे सोपविण्यात येतील.
या तिघींचे यश हे भारतीय हवाईदलाच्या इतिहासातील "माईलस्टोन‘ असल्याचे गौरवोद्गार संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काढले.
"एअरफोर्स अकादमी‘च्या दीक्षान्त संचलनप्रसंगी बोलताना पर्रीकर यांनी लष्करातील लिंगसमानतेचा जोरदार पुरस्कार केला. आजचा दिवस हा भारतीय हवाईदलासाठी सुवर्ण अक्षरांत लिहून ठेवावा असा आहे. आगामी काळामध्ये टप्प्याटप्प्याने लष्करात पूर्ण लिंगसमानता आणली जाईल, असा निर्धार त्यांनी या वेळी बोलून दाखविला. काही बाबतींमध्ये आज प्रशासकीय आणि तांत्रिक अडथळे कायम असून, टप्प्याटप्प्याने लिंगभेद संपुष्टात आणला जाईल, आणखी कितीजणांना प्रशिक्षण द्यायचे, हे सर्व पायाभूत सुविधांवर अवलंबून असेल असेही पर्रीकर यांनी नमूद केले.
खडतर प्रशिक्षण
लढाऊ वैमानिकांचा पूर्ण दर्जा मिळण्यापूर्वी या तिघी जणींना खडतर प्रशिक्षणास सामोरे जावे लागले. आता या तिघींनी दीडशे तासांच्या उड्डाणाचे प्रशिक्षण पूर्ण केले असून, पुढील वर्षभर त्यांना कर्नाटकातील बिदरमध्ये ब्रिटिश बनावटीचे "हॉक‘ विमान उडविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना प्रत्यक्ष तुकडीमध्ये सामावून घेतले जाईल.
सवलत नाही
या तिघी जणींना पूर्णपणे लढाऊ विमानाचे वैमानिक बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाणार असून, या खडतर प्रशिक्षणामध्ये त्यांना कोणतीही सवलत दिली जाणार नाही, असे हवाईदलाचे प्रमुख एअरचीफ मार्शल अरूप राहा यांनी म्हटले आहे. पुढील वर्षभराच्या काळामध्ये या तिघींना पूर्ण फायटर पायलट बनविण्याचा संकल्प हवाई दलाने केला आहे.
आनंद, उत्साहाचे भरते
संरक्षणमंत्री पर्रीकर यांनी तिन्ही महिला वैमानिकांना विंग प्रदान करताच उपस्थितांनी एकच जल्लोष केला. पर्रीकर यांच्या हस्ते आज आडिबातला येथील टाटा बोइंग केंद्राचा पायाभरणी समारंभ पार पडला. या वेळी तेलंगणचे मुख्यमंत्री के. तारका रामाराव यांच्यासह बडे अधिकारी उपस्थित होते. या केंद्राच्या उभारणीवर दोनशे कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
दुसऱ्या "सोलो फ्लाइंग‘ वेळी काही मिनिटांतच मला टेकऑप रद्द करावा लागला होता. वैमानिकास केवळ एका क्षणामध्ये निर्णय घ्यायचा असतो. पहिल्यांदा इशारा ऐकताच मी गोंधळून जायचे, पण आता प्रशिक्षण घेतल्यानंतर मला तो त्रास होत नाही. विमानाची यंत्रणा ऑपरेट करताना थोडीजरी त्रुटी राहून गेली तरी सगळं काही नष्ट होऊ शकते.
- अवनी चतुर्वेदी
पहिल्या "सोलो स्पिन फ्लाइंग‘चे प्रशिक्षण सुरू असताना माझ्या डोक्यात अनेक विचार यायचे. अचानक विमानाने प्रतिसाद देणेच सोडले तर काय होईल, अशी भीती मला सतावत असे. "रिकव्हरी ऍक्शन ड्रिल‘मुळे मला आत्मविश्वास मिळाला. विमानाबरोबरच माझा आत्मविश्वासदेखील रिकव्हर झाला.
- भावना कंठ
पहिल्याच उड्डाणाच्या वेळी मला प्रतिकूल हवामानाचा सामना करावा लागला. नाइट फ्लाइंगचे प्रशिक्षण घेत असताना आकाशातील तारे आणि जमिनीवरील दिवे यांच्यात भेद करता येत नव्हता. त्यामुळे एवढ्या उंचीवर विमानाचा ताबा सांभाळणे मला शक्य होत नव्हते. यावेळीच विनाकारण डोक्याची हालचाल करू नये, असा धडा मला मिळाला.
- मोहना सिंह
Share Link: http://www.esakal.com/Tiny.aspx?K=A9SRIM
No comments:
Post a Comment