मुंबई : देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी सैनिक कायम कार्यरत असतात. या सैनिकांच्या मदतीसाठी ध्वज दिन निधी संकलन करणे हे एक मोठे देशकार्य आहे. त्यामुळे मुंबईतील शाळांच्या मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचून सैनिकांसाठी भरघोस निधी जमा करावा, असे आवाहन उद्योगमंत्री तथा मुंबई शहराचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी केले.
माजी सैनिक कल्याण विभागाच्या वतीने सेंट झेवियर्स कॉलेज येथे सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त निधी संकलन केलेल्या शाळांच्या मुख्याध्यापकांचा श्री. देसाई यांच्या हस्ते सनद व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार राज पुरोहित, मुंबई शहर जिल्हाधिकारी ए. शैला, संचालक कर्नल (नि) सुहास जतकर, थेट भरती केंद्राचे कर्नल परमजित सिंह, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कमांडर मीनल पाटील, दक्षिण मुंबईचे शिक्षण निरीक्षक व्ही. बी. चव्हाण, विविध शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक आदी उपस्थित होते. श्री. देसाई म्हणाले, मुंबईतील शाळांनी सैनिकांसाठी निधी संकलन करणे हे समाजकार्यातील मोठे योगदान आहे. प्रत्येक मुंबईकरांपर्यंत पोहोचून जास्तीत जास्त निधी संकलनासाठी प्रयत्न करावेत. ध्वज दिन निधीसाठी सहकार्य करणाऱ्या शाळांचे आभार मानून श्रीमती शैला म्हणाल्या, सैनिकी ध्वज दिन दरवर्षी पालकमंत्री महोदयांच्या हस्ते साजरा करण्यात येणार आहे. ध्वजनिधीसाठी पैसे संकलन करणे हे मोठे समाजकार्य आहे. श्री. जतकर म्हणाले, सैन्यामधील 90 टक्के सैनिक हे 35 ते 40 या वयात सेवानिवृत्त होतात. त्यांचे देशाच्या संरक्षणामध्ये मोठे योगदान आहे. तसेच हा संकलित केलेला निधी सैनिक, माजी सैनिक, सैनिकांच्या विधवा आणि मुलांच्या शिक्षणासाठी खर्च करण्यात येणार आहे. महाराष्ट्र शासनातर्फे सन 2014 ध्वजदिन निधी संकलनाकरीता मुंबई शहर जिल्ह्यास 2 कोटी 47 लाख 50 हजार रूपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. दक्षिण विभागातील शाळांच्या मार्फत यावर्षी 1 कोटींपेक्षा जास्त इतक्या मोठ्या रकमेचा निधी संकलन केला आहे. जास्त निधी संकलन केलेल्या 23 शाळांच्या मुख्याध्यापकांचा यावेळी गौरव करण्यात आला.
'महान्यूज' बुधवार, २८ ऑक्टोंबर, २०१५
|
Wednesday, 28 October 2015
सशस्त्र सेना ध्वज दिन संकलन केलेल्या मुख्याध्यापकांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment