Wednesday, 15 April 2015

भारताचे राष्ट्रीय शिल्पकार : डॉ. बाबासाहेब आंबेडकर



आधुनिक भारताच्या कल्पनेमागील माणूस 

आधुनिक भारताची कल्पना मांडणाऱ्या महामानव डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची 125 वी जयंती 14 एप्रिल 2015. कालपरत्वे डॉ. आंबेडकरांच्या कार्याची उंची व त्यांची प्रतिमा उंचावतच चालली आहे, त्यांच्या अष्टपैलू व्यक्तीमत्वातील प्रकर्षाने लक्षात राहणारा गुण म्हणजे दलितांच्या सक्षमीकरणासाठी लढणारे भारतातील अग्रगण्य वकील.डॉ. आंबेडकर हे एक उत्तम अर्थशास्त्री होते. या क्षेत्रातील त्यांचे मोलाचे कार्य म्हणजे देशाच्या मध्यवर्ती ‘रिझर्व बँके’ची स्थापना डॉ. आंबेडकरांनी केली. वीज निर्मिती आणि जलसिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी देशातील पहिला नदी-खोरे प्रकल्प तयार केला. देशाच्या संविधान निर्मितीमध्ये त्यांचे योगदान मोलाचे आहे ते घटना मसुदा समितीचे अध्यक्ष होते. आपल्या देशातील महिलांना समान हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी हिंदू संहिता विधेयक तयार केले आणि जेव्हा संसदेत या विधेयकाला मंजुरी मिळाली नाही तेव्हा अखेरीस त्यांनी आपल्या केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला.डॉ. आंबेडकरांसाठी राष्ट्र हे एक तात्विक अस्तित्व आहे जिथे सर्वांची स्वप्ने साकार करणे ही मुख्य संकल्पना असेल.डॉ. आंबेडकरांच्या मते राष्ट्राची कल्पना म्हणजे फक्त नकाशा आणि झेंड्यासह राजकीय व भौगोलिक अस्तित्व नव्हे. केंब्रिज शब्दावलीत नमूद केलेली राष्ट्राची प्रसिध्द व्याख्या त्यांना मान्य नव्हती. डॉ. आंबेडकरांसाठी तात्विक व अध्यात्मिक लक्षीतार्थासह कल्याण, समानता व मैत्री ही मुख्य संकल्पना असणे म्हणजे राष्ट्र.बाबासाहेबांनी संपूर्ण आयुष्यभर राष्ट्रवादाचे ध्येय साध्य करण्यासाठी प्रयत्न केले. बळकट राष्ट्रनिर्मितीसाठी जात विरहित समाजाची आवश्यकता आहे असे त्यांचे ठाम मत होते. हीच कल्पना समोर ठेवून त्यांनी पिण्याच्या पाण्याच्या समान हक्कासाठी महाडचा सत्याग्रह, मंदिर प्रवेश हक्क, मनुस्मृतीची होळी यासारख्या अनेक सामाजिक चळवळी केल्या. बाबासाहेबांनी नेहमीच सामाजिक व आर्थिक समानतेचा आग्रह धरला.तळागाळातील लोकांना आरक्षण देण्याच्या बाबासाहेबांच्या मताला भारतीय राज्य घटनेने देखील मान्यता दिली. कुटुंबातील स्त्रीला समान हक्क प्रदान करण्याच्या उद्देशाने डॉ. आंबेडकरांनी तयार केलेल्या विधेयकाला विरोध झाला, परंतु नंतर हे विधेयक पारित झाले. बाबासाहेब नेहमी म्हणायचे, ‘मी एखाद्या समाजाचा विकास हा त्या समाजातील स्त्रियांच्या विकासावरून ठरवतो’

फ्रेंच तत्वज्ञ अर्नेस्ट रेनान यांनी सांगितल्याप्रमाणे राष्ट्राने नेहमी भूतकाळातल्या वाईट आठवणी विसरुन भविष्यातील स्वप्ने पूर्ण करण्यासाठी एकत्र आले पाहिजे. भारताच्या राज्यघटनेमध्ये सामाजिक समानता आणि मैत्रीचे रंग आहेत. भारताचे महान सुपूत्र म्हणून जेव्हाआपण त्या महामानवाच्या स्मृतींना उजाळा देऊ तेव्हा त्यांनी आपल्यासाठी दिलेला हा वारसा देखील नेहमी आपल्या स्मरणात राहिल.भारत एक महान राष्ट्र म्हणून उदयाला येण्यासाठी आधुनिक भारताचे राष्ट्रीय शिल्पकार डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांनी जे स्वप्न पाहिले होते त्या स्वप्नांना उजाळा देत त्यांचे हे जयंती वर्ष आपण सर्व देशवासियांनी साजरे करूया.


No comments:

Post a Comment