Wednesday, 15 April 2015

निवृत्ती वेतनधानकांच्या लाभासाठी योजना व उपक्रम



पेंशनरांच्या क्षमतेचा वापर करण्यासाठी संकल्प योजना

केंद्र सरकारच्या नागरी कार्यालयातून दरवर्षी सुमारे 40 हजार कर्मचारी निवृत्ती होतात. रेल्वे, सेनादले, टपाल व दूरसंचार या विभागांची निवृत्तींची संख्या हिशेबात घेतली तर दरवर्षी सुमारे 2 लाख कर्मचारी, अधिकारी निवृत्त होतात. पण सेवा निवृत्ती म्हणजे कार्य निवृत्ती नव्हे. आता भारतातील सरासरी आयुष्यमान 69.2 वर्षे असे वाढले आहे. निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य, आणखी 10-15 वर्षे चांगल्या स्थितीत असते. तसेच त्यांच्यात परिपक्वता, अनुभव, स्थैर्य असे चांगले गुणही असतात. त्यांचा वापर देशातील स्वयंसेवी किंवा इतर काही संघटनांना करता येतो. अशा संस्थांना, अशा अनुभवी परिपक्तव, दूरदृष्टी असलेल्या व्यक्तींची गरज असते. ती निवृत्त कर्मचाऱ्यांना सहज भागवता येणे शक्य आहे. याशिवाय काही मंत्रालये निवृत्तीधारकांच्या गटाकडून विकास योजनांचे मूल्यमापन करणे, पुन्हा लेखापरीक्षण करून घेणे अशी कामे करून घेण्याची शक्यता अजमावून पहात आहे. या उपक्रमाला 'संकल्प' असे नांव दिले असून त्यासाठी याच नावाने एक वेब पोर्टल आणि   http://pensionersportal.gov.in/sankalp  ही वेबसाईट आहे. स्वारस्य असणाऱ्या व्यक्ती, संघटना, एनजीओ यांना तेथे नोंदणी करता येईल. तामिळनाडू राज्यातील काही निवृत्त वेतन धारकांनी तेथील अरविंद आय केयर हॉस्पिटलसोबत काम सुरू केले आहे व डोळ्यांची काळजी व आजार याबाबत गरजूंना मार्गदर्शन केले जाते. 


टीच इंडिया

बरेच निवृत्ती वेतनधारक 'टीच इंडिया' अर्थात भारतातील गरीब गरजू विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. तामिळनाडूमधील 'प्रथम' या नावाच्या संघटनेने तेथील निवृत्त वेतन धारकाला सामील करून तेथे शिक्षण प्रसाराचे काम जोरात सुरू केले आहे. तीन निवृत्त व्यक्तींना 'मास्टर ट्रेनर्स' अर्थात प्रभावी प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. लखनौ या उत्तर प्रदेशाच्या राजधानीतही साक्षरता कार्यक्रमात तेथील 118 निवृत्त झालेल्या व्यक्ती सहभागी झाल्या आहेत. ग्लोबल ड्रिम्स ही एनजीओ त्यांच्या कौशल्याचा उपयोग समाजासाठी करून घेत आहे. हे पेंशनवर तेथील निरक्षरांना लिहायला, वाचायला शिकवतात. 


निवृत्त होणाऱ्यांना मार्गदर्शन

निवृत्तीच्या उंबरठ्यावरील कर्मचाऱ्यांची मनोवृत्तीत बदल करणे आवश्यक असते. यासाठी निवृत्ती वेतनधारकांच्या विभागातर्फे पूर्वनिवृत्ती समुपदेशन कार्यशाळांचे आयोजन केले जाते. ज्यांना निवृत्त होण्यास एक ते दिडवर्ष शिल्लक आहे, अशा कर्मचाऱ्यांना या कार्यशाळेत सहभागी केले जाते.  त्यात पुढील विषयावर मार्गदर्शन केले जाते. 1) निवृत्तीनंतर मिळणारे पैसे, लाभ वेळेवर मिळावे यासाठी त्यात करावयाच्या बाबींची पुर्तता कशी करावी, 2) निवृत्तीनंतर मिळणाऱ्या मोठ्या रकमेचे योग्य नियोजन कसे करावे. 3) इच्छापत्र तयार करणे, 4) निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सरकारी आरोग्य सुविधा. 5) निवृत्तीनंतर 'संकल्प' योजनेतून मिळू शकणाऱ्या संधी. इ.


भविष्य-ऑनलाईन पेंशन मंजूरी

सध्याचे युग हे संगणकाचे व डिजिटायझेशन या कार्यपध्दतीचे आहे. म्हणून पेंशन ऑनलाईन मंजूर व्हावे व त्याची प्रगती करावी यासाठी 'भविष्य' ही प्रणाली सुरू केली आहे. त्यात निवृत्तीवेतन मंजूरीपूर्वी करावयाची कृतीची सोय आहे. याद्वारे कर्मचाऱ्यांचे निवृत्ती वेतन सर्व संबंधित कार्यालये म्हणजे कार्यालयप्रमुख, लेखा कार्यालये, पेंशन अधिकारी यांच्याद्वारे नियंत्रित केले जाते. ही प्रणाली निवृत्ती वेतन मिळण्याच्या एक वर्ष आधी सुरू करता येते त्यामुळे निवृत्ती वेतन मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर होऊन विलंब टाळता येईल. पेंशनचे फॉर्मस ऑनलाईन मिळविता येतात व ते ऑनलाईन सादर करता येतात. पेंशनरांची व्यक्तिगत माहिती, मोबाईल नंबर आदि माहितीही त्यात देता येते. त्यामुळे निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच्या अर्जाच्या प्रगतीची माहिती एसएमएस/ईमेलने कळविली जाते. प्रारंभी केंद्र सरकारच्या 25 मंत्रालयात/विभागात ही पथदर्शक स्वरुपात राबविली जात आहे.

No comments:

Post a Comment