Thursday 30 April 2015

राहत मोहिमेचे यशस्वी सूत्रधार : जनरल व्ही. के. सिंग

     येमेनमधल्या युद्धाच्या वणव्यातून आपण ४६४0 भारतीय आणि ९६0 विदेशी नागरिकांची सहीसलामत सुटका केली. अमेरिका आणि ब्रिटनसह ४१ देशांनी येमेनमधील नागरिकांच्या स्थलांतरणासाठी भारताची मदत घेतली. या 'ऑपरेशन राहत' मोहिमेचं आंतरराष्ट्रीय समुदायानंही कौतुक केलं आहे. खरे तर परराष्ट्र खात्यानं जानेवारीतच येमेनमधील भारतीय नागरिकांना धोक्याची सूचना दिली होती आणि येमेनमधून बाहेर पडण्याचं आवाहन केलं होतं. पण तरीही मार्चअखेरीस सुमारे चार हजार भारतीय येमेनमध्येच अडकून पडले होते. हवाई हल्ले सुरू झाल्यावर परराष्ट्र खात्याचे अधिकारी आणि येमेनमधील भारतीय दूतावासातील कर्मचार्‍यांनी सुटकेचे प्रयत्न सुरू केले. याच मोहिमेचं ऑपरेशन राहत असं नामकरणही झालं. परराष्ट्र राज्यमंत्नी जनरल व्ही. के. सिंग यांनीही जातीनं ऑपरेशन राहतवर लक्ष केंद्रित केलं आणि सर्व भारतीयांना येमेनमधून बाहेर काढण्यात यश आलं आहे. जनरल व्ही. के. सिंह हे परराष्ट्र राज्यमंत्नी लष्करप्रमुख असल्यामुळे त्यांना युद्धजन्य परिस्थितीत कोणते निर्णय अचूक घ्यावेत याचा अनुभव आहे. तो यावेळी कामी आला. जनरल व्ही. के. सिंह हे परराष्ट्र राज्यमंत्नी असल्याने दिल्लीच्या पातळीवरून निर्णय घेण्यात मदत झाली. सिंह हे जिबुटीला रवाना झाले आणि मग सुरू झाले ऑपरेशन राहत. १ एप्रिलला सुरू झालेली ही बिकट मोहीम दहा दिवसात संपली. पहिले विमान जिबुटीहून उडाले तेव्हा विमानातील लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अनेकांच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहत होत्या.
     राहतच्या यशामुळे जनरल सिंहांच्या कामगिरीची आपण चर्चा करीत होतो त्याच वेळी प्रसारमाध्यमांच्या वरच्या त्यांच्या शेरेबाजीमुळे त्यांना टीकेलाही सामोरे जावे लागत होते. मुळातच सिंहांना टीका नवी नाही. भारताचे लष्करप्रमुख म्हणून सेवानवृत्त होताना देखील त्यांच्या संदर्भात चर्चा झाली ती त्यांनी आपल्या जन्मतारखेच्या संदर्भात त्यांनी निर्माण केलेला वाद आणि त्यावरून त्यांनी न्यायालयात दाखल केलेल्या खटल्याचीच. जनरल सिंह हे एक नावाजलेले लष्करी अधिकारी आहेत. परमविशिष्ट सेवा मेडल, अतिविशिष्ट सेवा मेडल, युद्धसेवा मेडल असे लष्करी गौरव त्यांनी छातीवर धरण केलेले आहेत. हरियाणातल्या भिवानी जवळच्या बोपारा गावचे सिंह कुटुंब हे लष्करी बाण्याचे म्हणून ओळखले जाते.
     आज पासष्टीच्या घरात असणार्‍या जनरल सिंहांच्या घरातल्या तीन पिढय़ा लष्करी सेवेत होत्या. त्यांचे वडील जगतसिंह हे कर्नल होते आणि आजोबा मुखराम हे रिसालदार मेजर होते. १९७0 मध्ये लष्करात कमिशन मिळवून विजयकुमार सिंह लष्करातल्या काली चंडी म्हणून ओळखल्या जाणार्‍या दुसर्‍या राजस्थान बटालियनमध्ये दाखल झाले. पुढे भारत पाकच्या सीमेवर प्रत्यक्ष ताबा रेषेवर काम करताना याच बटालियनचे प्रमुख म्हणून सूत्ने हातात घेण्याचे भाग्यही त्यांना लाभले होते. तामिळनाडूच्या प्रसिद्ध वेलिंग्डन कॅन्टोन्मेंटच्या डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेजमध्ये त्यांचे प्रशिक्षण झाले आहे. अमेरिकेतल्या युनायटेड स्टेट आर्मी इन्फन्ट्री स्कूल आणि यूएस स्टेट आर्मी वॉर कॉलेजमध्येही त्यांचे लष्करी शिक्षण झाले आहे. त्यात कॉम्बॅट ऑपरेशन्समध्ये ते सर्वोच्च स्थानावर आले होते. १९७१च्या बांगला देशच्या युद्धात त्यांनी अतुलनीय कामगिरी केलेली आहे. लष्कराच्या मुख्यालयात मिलिटरी ऑपरेशन्सचे संचालक म्हणूनही त्यांनी यशस्वीपणाने काम केलेले आहे. भूतानमधल्या भारतीय लष्कराच्या प्रशिक्षणाचे प्रमुख म्हणूनही त्यांनी महत्त्वाची कामगिरी केलेली आहे. आपली जन्मतारीख चुकीची लागलेली आहे असा त्यांचा दावा होता आणि त्यावरून ते सरकारच्या विरोधात न्यायालयातही गेले होते अशी न्यायालयाची पायरी चढणारे ते पहिले लष्करप्रमुख ठरले होते आणि यावरून त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. आदर्श सोसायटी आणि सुकुना जमीन हडपण्याचे प्रकरण अशा उघडउघड भ्रष्टाचाराच्या ठरलेल्या प्रकरणांमध्ये त्यांनी अत्यंत स्पष्ट आणि कडक भूमिका घेतली होती.
     काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या नेत्यांना शासनच पैशाचा खुराक देते अशी सनसनाटी माहिती त्यांनी बिनिदक्कतपणाने जाहीर केली होती. आजही परिणामांची फारशी पर्वा न करता आपली मते अत्यंत परखडपणाने व्यक्त करण्यात त्यांचा नंबर बराच वरचा आहे. २0१२मध्ये सेवानवृत्ती घेतल्यावर ते स्वस्थ बसणार नाहीत असाच अंदाज होता. त्यानुसारच ते सामाजिक कामात आले. सुरुवातीला अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनाशी ते जोडले गेले आणि त्यातूनच ते काहीकाळ किरण बेदी आणि केजरीवाल यांच्या इंडिया अगेन्स्ट करप्शनशीदेखील जोडले गेले.
     स्वामी रामदेवांच्या काळ्या पैश्याचा विरोधातल्या आंदोलनाशीही हे जोडले गेले होते. शेवटी ते भाजपात दाखल झाले.  लोकसभा निवडणुकीतील प्रचाराच्या सुरुवातीचीच माजी सैनिकांची  सभा  हरियाणातल्या  भिवानी मध्ये   मोदिनी घेतली होती , तिचे सूत्र जनरल  व्ही. के. सिंग यांनी  सांभाळली होती.  निवडणुकीत ते निवडून आले आणि मोदींच्या मंत्रिमंडळात परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री झाले.  मंत्री मंडळातील मंत्री नक्की काय काम करतात हे जनतेसमोर कधी येताच नाही. तसेच जनरल सिंघ याचेही  झाले असते, ऑपरेशन राहत ने त्यांनी आपले नाणे खणखणीत पने  वाजवून आपले कर्तृत्व सिद्ध केले आणि राहत मोहिमेचे खरे सूत्रधार बनले.  

No comments:

Post a Comment