वृत्तसंस्था बुधवार, 21 फेब्रुवारी 2018
नवी दिल्ली - परराष्ट्र मंत्रालयाने पासपोर्ट काढण्याच्या नियमांमध्ये बदल केले असून, यामुळे पासपोर्ट काढणे सोपे होणार आहे. यामध्ये आई-वडिलांची माहिती, जन्म प्रमाणपत्र, विवाहित किंवा घटस्फोटितांसाठीच्या नियांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
जन्म प्रमाणपत्र
ज्यांचा जन्म 26 जानेवारी 1989 किंवा त्यानंतर झाला, त्यांच्यासाठी जुन्या नियमांनुसार जन्माचे प्रमाणपत्र देणे अनिवार्य होते. नव्या नियमांनुसार यामध्ये बदल करण्यात आला आहे. आता कोणतीही स्थानिक ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका, जन्म-मृत्यू रजिस्ट्रार किंवा संबंधित प्राधिकरणाने नोंद केलेली जन्म तारीख वैध धरण्यात येईल. याशिवाय मान्यताप्राप्त शिक्षण मंडळाकडून जारी करण्यात आलेला शाळेचा दाखलाही ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय पॅन कार्ड, आधार किंवा इ-आधारच्या मदतीने देखील अर्ज करता येणार आहे. वाहन परवाना, मतदान कार्ड यांसारखे ओळखपत्र देखील वैध ठरणार आहे.
आई-वडिलांचे नाव देणे अनिवार्य नाही
नव्या नियमांनुसार, पासपोर्टच्या अर्जामध्ये आई किंवा वडिलांचे नाव देणे अनिवार्य नाही. अर्जदार आता कायदेशीर पालकाचे नाव देऊ शकतो. या नियमामुळे सिंगल पॅरेंट किंवा अनाथ व्यक्तींना दिलासा मिळाला आहे. याशिवाय साधू किंवा संन्यासी त्यांच्या आध्यात्मिक गुरुचे नाव देता येणे शक्य होणार आहे.
कॉलमची संख्या कमी केली
कॉलमची संख्या कमी करण्यात आली असून, ती 15 वरुन 9 करण्यात आली आहे. यामध्ये A, C, D, E, J आणि K कॉलम हटवण्यात आले आहेत.
प्रत सांक्षांकित करण्याच्या प्रक्रियेत बदल (अटेस्टेशन)
जुन्या नियमांनुसार, प्रत्येक कागद नोटरी, कार्यकारी मॅजिस्ट्रेट, प्रथम श्रेणी न्यायिक मॅजिस्ट्रेट यांच्याकडून सांक्षांकित करणे बंधनकारक होते. आता अर्जदार एका साध्या कागदावर स्वयं घोषणापत्र (सेल्फ डिक्लेरेशन) देऊ शकतो.
विवाहित किंवा घटस्फोटित व्यक्ती
विवाह प्रमाणपत्राची अट रद्द करण्यात आली आहे. याशिवाय घटस्फोटित व्यक्तींना पती किंवा पत्नीचे नाव देण्याची गरज नाही.
No comments:
Post a Comment