नवी दिल्ली - पठाणकोट येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर येथून जवळच असलेल्या लष्कराच्या तुकड्यांना तातडीने पाचारण करण्याऐवजी राष्ट्रीय सुरक्षा संस्थेच्या (एनएसजी) कमांडोंना थेट दिल्लीहून येथे आणण्याच्या सरकारच्या निर्णयावर लष्कर व सुरक्षा अधिकाऱ्यांच्या वर्तुळांमधून विषादपूर्ण आश्चर्य व्यक्त करण्यात येत असल्याचे वृत्त आज (बुधवार) सूत्रांनी दिले.
"आमच्यापैकी कोणाचाही सरकारच्या या निर्णयावर प्रथमदर्शनी विश्वास बसला नाही. पठाणकोट भागामध्येच लष्कराच्या दोन इन्फंट्री डिव्हिजन्स आणि दोन आर्मर्ड ब्रिगेड्स तैनात आहेत. शिवाय लष्कराच्या उत्तर विभाग मुख्यालयाशिवाय लष्कराच्या तीन मुख्य तुकड्यांची मुख्यालयेही येथून अवघ्या दोन तासांच्या अंतरावर आहेत. या सर्व तुकड्यांना दहशतवादविरोधी मोहिमेचा चांगला अनुभव आहे. मात्र लष्करास पाचारण करण्याऐवजी काही एनएसजी कमांडो बोलाविण्यामध्ये सरकारने महत्त्वपूर्ण वेळ वाया घालवला,‘‘ असे कठोर मत लष्करातील पठाणकोटपासून जवळच तैनात असलेल्या एका ब्रिगेडियर अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.
पॅराकमांडो दलामधील निवृत्त अधिकारी आणि सुरक्षा तज्ज्ञ लेफ्टनंट जनरल प्रकाश कटोच यांनीही पठाणकोटमधील दहशतवादी हल्ल्यानंतर करण्यात आलेल्या उपाययोजनेवर टीका केली आहे.
एनएसजी दल हे विशिष्ट लक्ष्याचा भेद करण्यासाठी वापरले जाते. एका भागामधील लक्ष्य हुडकून काढून ते नष्ट करण्यासाठी एनएसजी वापरात आणले जात नाही. पठाणकोटसारख्या ठिकाणी प्रथम दहशतवाद्यांना हुडकून काढून ठार मारण्यासंदर्भातील मोहिम राबविणे आवश्यक होते. अशा कामासाठी लष्कर हाच सर्वोतम पर्याय आहे. एनएसजी पाठविण्यात काही गैर नाही; मात्र अशा वेळी नेमक्या आज्ञा असणे आवश्यक आहे. बीएसएफ, एनएसजी, लष्कर यांना एकाचवेळी एकाच लक्ष्याचा भेद करण्यासाठी आज्ञा देणे योग्य नाही. पठाणकोटसंदर्भातील उपाययोजनेबात अधिक नियोजन आवश्यक होते,‘‘ असे कटोच म्हणाले.
याखेरीज, लष्कर व हवाई दलाशी संबंधित अनेक अधिकाऱ्यांनी सरकारच्या या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले आहे.
[वृत्तसंस्था]
No comments:
Post a Comment