Monday 23 May 2016

महाराष्ट्रमुंबई महाराष्ट्राच्या सुपुत्राला काश्मिरात वीरमरण

श्रीनगर कुपवाडा जिल्ह्यातील ड्रगमुला भागात जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत जखमी झालेले नायक पांडुरंग महादेव गावडे यांना वीरमरण आलं आहे. गावडे यांचं रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाल्याची माहिती आज संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली. 

पांडुरंग गावडे हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली येथील सुपुत्र होते. आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांचं पार्थिव सिंधुदुर्गातील त्यांच्या मूळगावी पाठवण्यात येणार आहे. जम्मू-काश्मीरच्या सीमाभागात असलेल्या कुपवाडा जिल्ह्यात शनिवारी तब्बल नऊ तास चाललेल्या चकमकीत भारतीय जवानांनी सडेतोड प्रत्युत्तर देत पाच दहशतवाद्यांना यमसदनी धाडले होते. ४७ राष्ट्रीय रायफल्स, ४१ राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली होती. या चकमकीत दहशतवाद्यांशी लढताना ४१ राष्ट्रीय रायफल्सचे पांडुरंग महादेव गावडे, ४७ राष्ट्रीय रायफल्सचे अतुल कुमार व अन्य एक जवान गंभीररीत्या जखमी झाले होते. पांडुरंग यांच्या चेहऱ्यावर गोळी लागली होती तर अतुल यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली होती. या दोघांनाही गंभीर जखमी अवस्थेत प्रथम ड्रगमुला येथील लष्कराच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यानंतर श्रीनगर येथील रुग्णालयात त्यांना हलवण्यात आले होते. तिथे उपचार घेत असतानाच आज पांडुरंग गावडे यांची प्राणज्योत मालवली. 


पाच वर्षापूर्वी झाले होते भरती :

 पांडुरंग हे सावंतवाडी तालुक्यातील आंबोली-मुळवंदवाडीतील होते. पाच वर्षांपूर्वीच ते लष्करात भरती झाले होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांचा एक मुलगा अवघा दोन ते तीन महिन्यांचा आहे. पांडुरंग यांच्या निधनाने गावडे कुटुंब तसेच संपूर्ण आंबोलीवरच शोककळा पसरली आहे. 

मटा ऑनलाइन वृत्त 

No comments:

Post a Comment