Wednesday, 23 January 2019

समस्या सुटेनात, व्यथा कुणी ऐकेनात!

अनेक दिवस झाले चकरा मारतोय पण काम होत नाही, कार्यालयात अधिकारीच भेट नाहीत, केवळ सिक्युरिटीचीच नोकरी दिली जाते, बँकांकडून कर्ज मिळत नाही, मोठा पत्रव्यवहार करूनही बांधकामाची परवानगी मिळत नाही, या आणि अशा कितीतरी तक्रारींनी मंगळवारचा जिल्हा सैनिक मेळावा गाजला.

भारतीय सैन्यातील वीर जवानांच्या कुटुंबातील वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी, विधवा, पाल्य यांच्यासाठी मंगळवारी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय नाशिकच्या वतीने माजी सैनिक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. त्र्यंबकरोडवरील मुलांचे सैनिक वसतिगृह येथे हा मेळावा झाला. उद्घाटन उपजिल्हाधिकारी दीपमाला चौरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा कौशल्य विकास अधिकारी संदीप गायकवाड, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कॅप्टन विद्या रत्नपारखी, कर्नल खडसे, पोलिस निरीक्षक अशोक रत्नपारखी आदी उपस्थित होते. यावेळी भारतीय युद्धात वीरमरण प्राप्त झालेल्या सैनिकांच्या वीरमाता, वीरपत्नी यांचा सत्कार चौरे यांच्या हस्ते करण्यात आला. चौरे यांनी देशासाठी सैनिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगितले. त्यांच्या कुटुंबाची काळजी घेणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असल्याचे त्या म्हणाल्या. गायकवाड यांनी अण्णासाहेब आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज परतावा योजना, बचतगट कर्ज व्याज परतावा योजना, शेतकरी गट कर्ज योजना, अपंग वित्त व आर्थिक विकास महामंडळाच्या योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण योजना या विविध योजनांची माहिती दिली. विद्या रत्नपारखी यांनी प्रास्ताविक केले.

...

जिल्हाधिकाऱ्यांची अनुपस्थिती

मेळाव्याचे अध्यक्षस्थान जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी भूषविणार होते. पण कामाच्या व्यापामुळे ते येणार नाहीत आणि ऐनवेळी उपजिल्हाधिकारी चौरे यांना मेळाव्यास जाण्याचा निरोप देण्यात आला. त्यातच चौरे यांनाही कामाचा व्याप होता. त्यामुळे या मेळाव्याला येण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत त्यांनी काही मिनिटांतच कार्यक्रम सोडला. या साऱ्यामुळे उपस्थित माजी सैनिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

....

व्यथांना वाचा

मेळाव्यात माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष फुलचंद पाटील, उपाध्यक्ष विजय पवार, मालेगावचे अध्यक्ष लोटन शेवाळे, भाजप सैनिक महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष निर्मला पवार आदींनी मनोगत मांडून माजी सैनिकांच्या व्यथांना वाचा फोडली.

...


अधिकाऱ्यासमोरच तक्रारी

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारीच आम्हाला भेटत नाहीत. आम्ही ग्रामीण भागातून येतो आणि समस्या जैसे थेच राहतात. मग, या कार्यालयाचा फायदा काय. मालेगाव येथेही कार्यालय करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे परिसरातील माजी सैनिकांना दिलासा मिळेल, असे दिलीप हिरे यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विद्या रत्नपारखी यांच्यासमोरच या तक्रारी मांडल्या जात होत्या.

...

बहिष्कार टाकणार होतो...

जिल्हाधिकारी आले नाहीत. त्यांच्या जागी आलेल्या अधिकारीही थांबल्या नाहीत. ही म्हणजे माजी सैनिकांची चेष्टा आहे. त्यामुळे आम्ही बैठकीवर बहिष्कार टाकणार होतो. पण, अनेक वर्षांनंतर हा मेळावा होत असल्याने आम्ही बहिष्कार न टाकण्याचा निर्णय घेतल्याचे माजी सैनिकांनी जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांसह अन्य अधिकाऱ्यांना परखड शब्दांत सुनावले.


No comments:

Post a Comment