Sunday, 13 August 2017

सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत हा निशब्द करणारा अनुभव - चंद्रकांत पाटील

सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत चित्रफीतचे पाटील यांच्या हस्ते प्रकाशन

कोल्हापूर - विकलांग मुलांसमवेत मा. अमिताभ बच्चन यांचे सांकेतिक परिभाषेत (साईन लॅंग्वेजमध्ये) सादर केलेले राष्ट्रगीत पाहताना आपण एका वेगळ्याच वातावरणात पोहचतो साईन लॅंग्वेजमधील हे राष्ट्रगीत पाहिल्यानंतर आपण निशब्द झाल्याची भावना पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.

वुई केअर फिल्म फेस्ट व ब्रदरहूड दिल्ली, चेतना अपंगमती विकास संस्था कोल्हापूर, कर्न्सन्ड ×क्‍शन दिल्ली, स्वयंम ग्लोबल सेंटर दिल्ली, आरुशी भोपाल, सामाजिक न्याय मंत्रालय मध्यप्रदेश, एपीजी सत्या युनिव्हर्सिटी गुडगाव यांची निर्मिती असलेल्या विकलांग मुलांसमवेत मा. अमिताभ बच्चन यांचे सांकेतिक परिभाषेत (साईन लॅंग्वेजमध्ये) राष्ट्रगीत, चित्रफीत प्रकाशन समारंभ दिल्ली आणि मध्यप्रदेश याठिकाणी झाला असून महाराष्ट्रात हा समारंभ कोल्हापूर येथे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते केशवराव भोसले नाट्यगृहात झाला. यावेळी खासदार धनंजय महाडिक, महापौर हसिना फरास, चेतना संस्थेचे प्राचार्य पवन खेबुडकर, अध्यक्ष नरेश बगरे, उपाध्यक्ष डॉ. सुनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत सादर होत असताना संपूर्ण सभागृह भारावून गेले होते. राष्ट्रगीतानंतर बोलण्यासाठी उभारलेले पालकमंत्री निशब्द झाले होते. सांकेतिक परिभाषेतील राष्ट्रगीत आणि विकलांग मुला मुलींनी सादर केलेले गीत-नृत्य पाहून आपल्या भावना व्यक्त करताना गहिवरलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पाहताना संपूर्ण नाट्यगृह ही स्तब्ध झाले होते. यावेळी पालकमंत्री यांनी दोन्ही खासदारांसह सर्व लोकप्रतिनिधींनी या जिल्ह्यात कोणतेही दुख: राहू नये यासाठी एकत्र येवून काम करुया असे आवाहन केले. चेतना अपंगमती विकास संस्था कोल्हापूर या संस्थेला लवकरच भेट देवून सर्व अडचणी समजून घेवून सोडविल्या जातील अशी ग्वाही त्यांनी दिली.

खासदार धनंजय महाडिक यांनी विकलांग मुलांची विविध क्षेत्रातील भरारी अभिमानास्पद आहे. त्यांच्या सक्षमीकरणाबाबत समाजाने संवेदनशिल असणे आवश्‍यक असल्याचे सांगून चेतना संस्थेला त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठील सर्वतोपरी मदत करु. विकलांगांना सहजपणे वावरता येईल अशा सुविधा असल्या पाहिजेत त्यासाठी प्रयत्न केले जातील असे सांगून, अवयवदानाबद्दलही समाजात मोठ्या प्रमाणावर जनजागृतीचा उपक्रम हाती घेण्यात येईल, असे सांगितले.

महापौर हसिना फरास यांनी विकलांग मुलेही सामान्य क्षमतेच्या मुलांपेक्षा अधिक जिद्दी व कष्टाळू असतात. त्यांच्यासाठी गेली 32 वर्षे करत असलेले चेतना संस्थेचे कार्य कौतुकास्पद असून या कार्याला मदत करण्यासाठी सर्व कोल्हापूरकरांनी पुढे यावे. अवयवदान, नेत्रदान याबाबतही समाजात सजगता निर्माण व्हावी, असे सांगितले.

संस्थेचे प्राचार्य पवन खेबुडकर यांनी सांकेतिक परिभाषेत राष्ट्रगीत या चित्रफीतीत अमिताभ बच्चन यांच्यासह चेतना संस्थेतील आठ मुलांचा सहभाग आहे ही बाब संपूर्ण कोल्हापूर वासियांनसाठी अभिमानास्पद असून या मुलांच्या जीवनात अधिकाधिक आनंद फुलवावा यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची गरत व्यक्त केली.

यावेळी रवींद्रनाथ टागोर यांच्या प्रतिमा पुजानाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. प्राचार्य पवन खेबुडकर यांनी लिहिलेल्या गीतावर चेतनाच्या विद्यार्थ्यांनी सादरीकरण केले. मुकबधीर विद्यार्थ्यांनी या चला शरदेला वंदुया ही प्रार्थना गायली. ज्ञान प्रबोधन भवन संचालित अंध शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत गायीले. हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप संस्थेच्या विद्यार्थ्यांनी व्हील चअर्स वरील नृत्य सादर केले. याप्रसंगी सांकेतिक परिभाषेत राष्ट्रगीत या चित्रफीतीत सहभागी असणारे सुशांत कुंदे, पद्मश्री करकरे, निखिल ढाकणे, अमिता सुतार, विशाल मोरे, आंम्रपाली कांबळे, विनम्र खटावकर, प्रतिक्षा कराळे यांच्यासह आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य पवन खेबुडकर यांनी तर आभार डॉ. सुनिल पाटील यांनी मानले तर सुत्रसंचालन सोनाली नवांगुळ यांनी केले.

Dailyhunt

1 comment: