वृत्तसंस्था
श्रीनगर - दक्षिण काश्मीरमधील शोपियां जिल्ह्यामध्ये दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे दोन जवान हुतात्मा झाले आहेत. या कारवाईत एका दहशतवाद्यासही कंठस्नान घालण्यात आले आहे. त्याचबरोबर एका कॅप्टन दर्जाच्या अधिकाऱ्यासह एकूण तीन जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी दहशतवाद्यांबरोबरील संघर्ष अद्यापी सुरु आहे.
शोपियां जिल्ह्यामधील झैनपुरा भागामधील अवनीरा या गावामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराकडून या भागात मोठी शोधमोहिम हाती घेण्यात आली होती. ही शोधमोहिम सुरु असतानाच दहशतवाद्यांकडून अचानक हल्ला चढविण्यात आला. सुरक्षा दलांकडूनही या हल्ल्यास त्वरित तीव्र प्रत्युत्तर देण्यात आले. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना लष्करी तळावरील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी सविस्तर माहितीची अद्यापी प्रतीक्षा आहे.
No comments:
Post a Comment