Saturday, 21 January 2017

भारताच्या एकसंघतेसाठी सरदार पटेल यांनी दिलेले योगदान महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याची आवश्यकता- राज्यपाल

मुंबई, 20-1-2017 : भारताच्या एकसंघतेसाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिक, विद्यार्थी, शिक्षकांपर्यंत अगदी कानाकोपऱ्यांत पोहोचवण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी गुरुवारी मुंबईत केले. नेहरु विज्ञान केंद्रामध्ये  “युनाइटिंग इंडिया : रोल ऑफ सरदार पटेल” या सरदार पटेल यांच्या कार्यावरील डिजिटल प्रदर्शनाचे उद्‌घाटन काल त्यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. एकसंघ भारत आणि त्यासाठी सरदार पटेल यांनी दिलेले योगदान या प्रदर्शनातून दाखवले आहे. पंतप्रधानांच्या प्रेरणेतून ते तयार करण्यात आले आहे.
   
   हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतल्या नेहरु विज्ञान केंद्रात पटेल यांच्या जयंतीनिमित्त 31 ऑक्टोबर 2016 रोजी उद्‌घाटन केलेल्या प्रदर्शनाची धावती झलक आहे. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाचा प्रकल्प असून स्वत: पंतप्रधानांनी यात लक्ष घातले आहे. 31 ऑक्टोबर रोजी औपचारिकरित्या प्रदर्शनाचे राष्ट्रार्पण होण्यापूर्वी पंतप्रधानांनी 27 ऑक्टोबरला नेहरु विज्ञान केंद्रात प्रदर्शन पाहण्यात 90 मिनिटे व्यतीत केली होती.

   त्रीमिती चित्रपट तंत्रज्ञानासह अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने प्रदर्शनात एकसंघ भारत निर्माण करण्यात सरदार पटेलांची भूमिका उलगडून दाखवण्यात आली आहे. एकसंघ भारतात सहभागी होण्यासाठी विविध संस्थानांनी स्वाक्षरी केलेले दस्तऐवजही प्रदर्शनात आहेत.
 
   यापूर्वी हे धावते प्रदर्शन जुनागढ इथे भरले होते. 9 नोव्हेंबर 2016 ला त्याचे उद्‌घाटन झाले होते. तिथे मिळालेल्या प्रचंड यशानंतर प्रदर्शन मुंबईत भरवण्यात आले आहे

No comments:

Post a Comment