Saturday, 21 January 2017

पाककडून जवान चंदू चव्हाणांची सुटका

मुंबई - पाकिस्तानच्या हद्दीत नजरचुकीने गेलेले भारतीय जवान चंदू बाबूलाल चव्हाण यांची आज (शनिवार) पाकिस्तानकडून सुटका करण्यात आली. वाघा बॉर्डरवर पाक सैन्याकडून भारतीय हद्दीत त्यांना सोडण्यात आले.

पाकिस्तानच्या ताब्यातील चंदू चव्हाण लवकरच मायदेशी येतील. पाकिस्तानी लष्कराच्या महासंचालकांशी (डीजीएमओ) सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यांची तेथील सर्व चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे ते लवकरच मायदेशी येतील, अशी माहिती संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी नुकतीच दिली होती. अखेर चंदू चव्हाण यांची सुटका करण्यात भारत सरकारला यश आले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये चंदू चव्हाण हे राजस्थानमध्ये कर्तव्य बजावत असताना पाकिस्तानी हद्दीत गेले होते. त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतले होते. त्यांची तेव्हापासून चौकशी सुरु होती. पाकिस्तानने आज त्यांना वाघा बॉर्डरवरून भारतीय हद्दीत सोडण्यात आले. भारतीय लष्करात 37 राष्ट्रीय रायफल्समध्ये ते कार्यरत आहेत.

चंदू चव्हाण हे महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील बोरवीर गावचे आहेत. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांचा लोकसभा मतदारसंघात हे गाव येत असल्याने त्यांनी त्यांच्या सुटकेसाठी विशेष प्रयत्न केले. चंदू चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी नुकतीच भामरे यांच्यासह परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांची भेट घेतली होती. चंदू चव्हाण यांचे भाऊही लष्करातच आहेत.

वृत्तसंस्था 

No comments:

Post a Comment